राज्यात आजपासून तूर खरेदीला सुरुवात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यात आजपासून (ता. ५) किमान आधारभूत दराने तूर खरेदी सुरू होणार आहे. केंद्र सरकारने तुरीला ५८०० रुपये क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. नाफेड आणि पणन महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत खरेदी सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. 

सध्या बाजारात तुरीला मिळत असलेले दर अपेक्षेपेक्षा कमी आहेत. त्यामुळे सरकारने खरेदी केंद्रांच्या माध्यमातून तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी गेले काही दिवस शेतकरी करीत होते. त्याआधी १ जानेवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यंदा तूर खरेदी ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांची ज्या तालुक्यात शेतजमीन आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रांवर त्यांना नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीसाठी आधारकार्डची प्रत, तूर पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्डशी संलग्न असलेल्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत ही कागदपत्रे नोंदणीवेळी सादर करायची आहेत. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमानुसार तूर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना एसएमएस आल्यानंतर नोंदणी केलेल्या केंद्रांवरच तूर विक्रीसाठी न्यायची आहे. तसेच तूर खरेदीसाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी तुरीची उत्पादकता निश्चित केली आहे, त्याचाही विचार तूर खरेदीवेळी केला जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मोजणी झाल्यानंतर तुरीची वजनासह नोंद करून एनईएमएल पोर्टलवरील ऑनलाइन खरेदी बिल शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

खरेदी केलेल्या तुरीची एनईएमएल पोर्टलवर त्याच दिवशी नोंद करण्याचे बंधन खरेदी संस्थेवर असणार आहे. तसेच पोर्टलवरील नोंदविलेल्या पिकाखालील क्षेत्राची सातबारा आणि स्थळ पाहणी करून महसूल आणि कृषी विभाग पडताळणी करणार आहे. तूर खरेदीत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्य शासन सतर्क आहे.  

‘एफएक्यू दर्जाची तूर विक्रीसाठी आणावी’ शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाची म्हणजेच काडीकचरा नसलेली, चाळणी केलेली व १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसलेली तूर आणावी, असे आवाहन पणन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com