सांगलीत तूर खरेदी ठप्प

२० एकरांत ३५ पोती तुरीचे उत्पादन मिळाले आहे. आता तूर विक्रीसाठी घेऊन आल्यानंतर खरेदीची मर्यादा सांगितली. त्यामुळे आम्ही तूर विक्री केली नाही. जोपर्यंत तूर खरेदीची मर्यादा वाढविली जात नाही, तोपर्यंत आम्ही तूर विक्री करणार नाही. — मायाप्पा देवर्षी, मुचंडी, ता. जत, जि. सांगली.
शेतकऱ्यांनी तूर विक्रीस नकार देत माल ट्रक मध्येच ठेवला आहे.
शेतकऱ्यांनी तूर विक्रीस नकार देत माल ट्रक मध्येच ठेवला आहे.

सांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी करण्याच्या सूचना असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत तूर विक्रीस नकार दिला. सांगली बाजार समितीच्या विष्णूअण्णा पाटील खरेदी-विक्री संघात ४०० पोती म्हणजेच २०० क्विंटल तूर दाखल झाली असून, जोपर्यंत तूर खरेदीची मर्यादा वाढविली जाणार नाही, तोपर्यंत तुरीची विक्री केली जाणार, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

सांगली येथील केंद्रावर सोमवारपासून (ता. २४) तूर खरेदी सुरू झाली. तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ‘तूर विक्रीसाठी घेऊन या’ असा संदेश मोबाईलद्वारे देण्यात आला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून जत तालुक्यातील ३० शेतकऱ्यांनी ४०० पोती तूर बाजार समितीत विक्रीसाठी आणली. मात्र  हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी होणार त्यापेक्षा जास्त खरेदी करता येणार नाही, असे समजताच तूर उत्पादक शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विक्री न करण्याचा निर्णय घेत बाजार समितीतील खरेदी केंद्रासमोर ठाण मांडले आहे. तूर खरेदीची मर्यादा वाढवा; अन्यथा आम्हाला भरपाई द्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.  

जत तालुक्यातील शेतकरी चार ट्रकमध्ये तूर घेऊन विक्रीस आले; परंतु शासनाच्या सूचनेमुळे तूर खरेदी मर्यादा कमी असल्याने तूर विक्री न करण्याचा निर्णय घेतल्याने पोती ट्रकमध्येच आहेत. एका ट्रकची भाडेपट्टी सरासरी ३ ते साडेतीन हजार रुपये असून १२ ते १४ हजार रुपये अशी एका दिवसाची भाडेपट्टी शेतकऱ्यांच्या अंगावर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. 

‘नाफेड’कडून तूर खरेदीची मर्यादा ठरवली जाते. त्यानुसार तूर खरेदी केली जाते. वास्तविक पाहता २०१७-१८ मध्ये हेक्टरी १० क्विंटल तूर खरेदीची मर्यादा होती. गेल्या वर्षी हेक्टरी ५ क्विंटल; तर यंदा हेक्टरी २५७ किलोच खरेदीची मर्यादा केली. त्यामुळे दरवर्षी खरेदीची मर्यादा कमी होत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. तुरीची हमीभावाने विक्री करण्यासाठी आम्ही नोंदणी केली; पण नोंदणी करताना हेक्टरी किती तूर खरेदी केली जाणार, याची माहिती सांगितली गेली नाही. त्यामुळे शेतात उत्पादित झालेली सर्व तूर विक्रीसाठी घेऊन आलो आहे. केंद्रावर आल्यानंतर खरेदीची मर्यादा सांगितली. त्यामुळे जादा आणलेल्या तुरीचे करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यापुंढे निर्माण झाला.

कृषी विभाग दरवर्षी पीककापणीचा प्रयोग घेतो. त्यानुसार तूर खरेदीची मर्यादा ठरवली जाते; परंतु जिरायती तुरीची उत्पादकता एकरी ४ ते ५ क्विंटल; तर बागायती तुरीची उत्पादकता १० ते १२ क्विंटल मिळते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. याचाय अर्थ कृषी विभागाने कोणत्या पद्धतीने पीककापणी प्रयोग केला, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागात तूर पिकते का, असा प्रश्न उपस्थित करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तुरीची हेक्टरी ३१८.६० किलो; तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी हेक्टरी ४११ किलो अशी खरेदीची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे शासनाच्या अजब फतव्यामुळे ज्या भागात तुरीचे उत्पादन होते, त्याच भागातील शेतकऱ्यांना फटका बसतो आहे.  

प्रतिक्रिया

तूर खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल. — विक्रम सावंत, आमदार, जत.

तूर खरेदीची मर्यादा कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण तूर विक्री करता येत नसून तूर खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. — सुधीर गाडगीळ आमदार, सांगली.

आम्ही शासनाच्या सूनचेनुसार तूर खरेदी केंद्र सुरू केले आहे. शेतकरी तूर विक्रीसाठी आले असून खरेदी मर्यादा कमी असल्याने त्यांनी तूर विक्री केली नाही. त्यामुळे तूर खरेदीची मर्यादा हेक्टरी पाच ते १० क्विंटल अशी करावी.  — सूर्यकांत शिंदे, अडत शाखा व्यवस्थापक, विष्णूअण्णा पाटील खरेदी-विक्री संघ.

आमच्याकडे पाऊस कमी असल्याने नगदी पीक म्हणून तूर घेतो. त्यातून आमचा प्रपंच चालतो; परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका आम्हाला बसल्याने आम्ही दाद कुणाकडे मागायची.  — रामा खिलारे, संख, ता. जत, जि. सांगली. 

आम्ही तूर खरेदीसाठी नोंदणी करताना किती तूर खरेदी करणार आहे, याबाबत शेतकऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांना तुरीची विक्रीचे मोबाईलद्वारे संदेश पाठविले आहे. — डी. आर. पाटील, जिल्हा पणन अधिकारी, सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com