महिला शेतकरी कंपनीने सुरू केला पहिला डेअरी प्रकल्प !

महिला स्वावलंबी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी ही महिलांची फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केली आहे. या माध्यमातून डेअरी प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी टाटा पॉवरने मदत केली आहे. आगामी काळात हा प्रकल्प वाढीस नेण्याचा आमचा मानस आहे. - राधा जगताप, उपाध्यक्ष, मावळ डेअरी फार्मर सव्हिसेस प्रोड्युसर कंपनी, मावळ
 मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनीने सुरू केलेल्या मावळ डेअरी प्रकल्पाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सोमवारी (ता. १६) उद्‍घाटन झाले.
मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनीने सुरू केलेल्या मावळ डेअरी प्रकल्पाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सोमवारी (ता. १६) उद्‍घाटन झाले.

पुणे  : राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे विस्तारत आहे. या कंपन्या शेतीमालविक्रीत मोलाचा सहभाग नोंदवत आहेत. या प्रक्रियेत मावळ तालुक्यातील महिला शेतकरी उत्पादक कंपनीने दुग्धप्रकल्पाची स्थापना करून एक पाऊल पुढे टाकले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘क्रेयो’ या ब्रँडने दुधाची विक्री केली जाणार आहे. महिलांनी सुरू केलेला हा राज्यातील पहिलाच दुग्धप्रकल्प आहे.  पुढील लिंकला क्लिक करा... शेती करायची? मुक्त गोठा बांधायचा? अॅग्रोवन अॅप आजच डाऊनलोड करा... 

दुग्धोत्पादन वाढावे, यासाठी मावळ तालुक्यातील मावळ डेअरी फार्मर सव्हिसेस प्रोड्युसर या महिलांनी स्थापन केलेल्या कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून टाकवे खुर्द (ता. मावळ) येथे मावळ डेअरी या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून ग्राहकांना गाय, म्हशींच्या दुधाची विक्री केली जाणार आहे. कंपनीने दुधाचा ‘क्रेयो’ हा ब्रॅँड विकसित केला आहे. या प्रकल्पामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून भर पडणार आहे. महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत टाटा पॉवरने या प्रकल्पाच्या स्थापनेत सहयोग दिला आहे. 

या प्रकल्पासाठी तालुक्यातील सुमारे १२३१ महिला एकत्र आल्या आहेत. त्यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांचे शेअर्स जमा केले आहेत. त्यातून सुमारे बारा लाख ५० हजार रुपयांचे भागभांडवल जमा झाले आहे. याशिवाय बचतीतून दर महिना ५० रुपये याप्रमाणे साडेतीन लाख रुपयांची रक्कम झाली असून, ही रक्कम या प्रकल्पात गुंतविण्यात आली आहे. टाटा पॉवरने सीएसआर फंडातून सुमारे तीन कोटी ७० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. 

२०१५ मध्ये फक्त ३३४ सदस्यांपासून या कंपनीची सुरुवात झाली आणि आज यामध्ये सदस्यसंख्या १२३१ वर जाऊन पोहोचली आहे. येत्या जानेवारी २०२० पर्यंत दोन हजारांपर्यंत महिला सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. ही कंपनी पूर्णपणे महिलाच चालवत असल्यामुळे या ठिकाणी त्यांना महत्त्वाच्या पदांवर नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. या कंपनीमध्ये बारा महिला संचालक असून, भारती शिंदे या अध्यक्ष, तर राधा जगताप या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. दुग्धोत्पादनांच्या विक्रीला चालना देण्यासाठी या कंपनीने मुंबई व पुण्यातील ग्राहकांना ही उत्पादने केवळ क्लिकवर म्हणजेच आॅनलाइन उपलब्ध करून दिली आहेत. 

या प्रकल्पाने १५ आधुनिक सुसज्ज दूधसंकलन केंद्रे विकसित केली असून, त्यामध्ये २६ गावांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे. प्रकल्पाच्या संचालनात व व्यवहारांमध्ये संपूर्ण पारदर्शकता ठेवली जात आहे. कंपनीशी संलग्न शेतकऱ्यांना दुधाची वाजवी किंमत मिळते. सध्या या प्रकल्पात विविध गावांमधून जवळपास ६००० लिटर दूध दरदिवशी संकलन केले जाते.

महिलांनी सुरू केलेल्या मावळ डेअरी प्रकल्पाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सोमवारी (ता. १६) उद्‍घाटन झाले. या वेळी आमदार सुनील शेळके, टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीर सिन्हा, मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष भारती, उपाध्यक्ष राधा जगताप आदी उपस्थित होते. 

या वेळी प्रवीर सिन्हा म्हणाले की, स्थानिकांना स्वयंपूर्ण होण्यात मदत करण्यासाठी टाटा पॉवरतर्फे केल्या जात असलेल्या प्रयत्नांमधून मावळ डेअरी प्रकल्प उभा राहिला आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय स्थानिक महिलांना जाते, त्यांनी आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सहकाराचा मार्ग निवडला. आज त्या स्वतः स्वयंपूर्णतेचे आदर्श उदाहरण ठरल्या आहेत. या वेळी अश्विनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. राधा जगताप यांनी आभार मानले.   पशुखाद्यविक्रीही करतात महिला महिलांनी कंपनी स्थापन केल्यानंतर उत्पन्नवाढीसाठी पशुखाद्यविक्रीचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये एका खासगी कंपनीकडून खरेदी करून ते पशुखाद्य शेतकऱ्यांना दिले जाते. साधारणपणे पंधरा दिवसाला सुमारे १५ टन पशुखाद्याची विक्री केली जाते. या व्यवसायातून मुद्दलसोडून वीस ते पंचवीस हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते, त्यासाठी सुमारे ७० महिला काम करतात. ही आहेत वैशिष्ट्ये

  • मावळ डेअरी फार्मर सव्हिसेस प्रोड्युसर कंपनीत सुमारे १२३१ महिलांचा सहभाग
  • दुधाची क्रेयो ब्रँडने पुणे, मुंबईत होणार विक्री
  • प्रकल्पाअंतर्गत १५ आधुनिक सुसज्ज दूधसंकलन केंद्रे 
  • दररोज सहा हजार लिटर दुधाचे संकलन
  • एकूण १९ कोटी रुपयांचा डेअरी प्रकल्प खर्च
  • साडेदहा कोटी रुपयांचे घेतले कर्ज
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com