दूध उद्योगासाठी राज्यस्तरीय शिखर समिती

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या दूध उद्योगासाठी शासनाने राज्यस्तरीय शिखर समिती स्थापन केली आहे. 

दूध व्यवसायातील स्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन शासनाला धोरणात्मक सल्ला देणे, दर दोन महिन्यांतून एकत्र येऊन दूध उद्योगातील स्थिती जाणून घेणे, राज्यातील दुधाचे उत्पादन वाढावे, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळावा, खासगी व सहकारी प्रकल्पांमधील हितसंबंधांची जपणूक व्हावी, असे उद्देश या समितीचे असतील.

राज्याच्या दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांकडे अध्यक्षपद दिलेल्या या समितीत सहकाराबरोबरच आता खासगी डेअरी उद्योजकांचा समावेश केला गेला आहे. यात खासगी दूध उद्योगातून कुतवळ फुडस् कंपनीचे (ऊर्जा दूध) अध्यक्ष प्रकाश कुतवळ, इंदापूरच्या सोनाई दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथदादा माने, चितळे डेअरी समूहाचे अध्यक्ष श्रीपादराव चितळे, पराग (गोवर्धन) मिल्क उद्योगाचे अध्यक्ष प्रीतम शहा यांना संधी देण्यात आली आहे. खासगी प्रकल्पांचा सल्ला घेतल्याशिवाय दूध उद्योगाचे नियोजन करता येणार नाही, ही भूमिका अखेर सरकारने स्वीकारली आहे. 

दुधाचा व्यवसाय शेतकरी वर्गासाठी अतिशय मोलाचा असताना मंत्रालय किंवा विविध सरकारी यंत्रणा परस्पर काहीही तुघलकी निर्णय घेत होत्या.“नव्या शिखर समितीमुळे दूध उद्योगाबाबत उलटसुलट निर्णय घेणे किंवा परस्पर धोरण बदलण्याची पद्धत बंद होईल. यापूर्वी अनेकदा उलटसुलट धोरणांमुळे शेतकरी व डेअरीचालकांना मोठा फटका बसला होता. शासन आणि दूध संघांमध्ये अजिबात समन्वय नव्हता,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यस्तरीय दूध समन्वय स्थापन करण्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तसेच कॉंग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. राज्य सहकारी दूध महासंघाचे एमडी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त, एनडीडीबीचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासह दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ, सहकार विभाग, राष्ट्रीय सहकारी विकास महासंघाचाही सदस्य म्हणून समावेश असेल. या समितीमुळे दूध व्यवसायातील शासकीय अनागोंदीला चाप लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.   सहकारातील पदाधिकाऱ्यांना समितीत प्राधान्य राज्यातील नामांकित सहकारी दूध संघांमधील पदाधिकाऱ्यांना यापूर्वी डावलले जात होते. नव्या शिखर समितीत मात्र, पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. राजारामबापू सहकारी दूध संघाचे (ब्रॅण्ड-कृष्णा दूध) अध्यक्ष विनायकराव पाटील, संगमनेर दूध संघाचे (राजहंस) अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, कोल्हापूर दूध संघाचे (गोकुळ) कार्यकारी संचालक दत्तात्रय घाणेकर, औरंगाबाद दूध संघाचे (देवगिरी महानंद) अध्यक्ष हरिभाऊ बागडे, नागपूर जिल्हा नूतन दूध संघाचे अध्यक्ष सुनील केदार या पदाधिकाऱ्यांना समितीत आवर्जून स्थान दिले गेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com