सोलापूर जिल्हा दूध संघाच्या आर्थिक व्यवहारात त्रुटी

 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघातील (दूध पंढरी) आर्थिक व्यवहारात निदर्शनास आलेल्या त्रुटींमुळे पुण्याच्या दुग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दूध संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, सोमवारपर्यंत (ता. १७) खुलासा करण्याची मुदत दिली आहे. खुलासा न केल्यास अथवा असमाधानकारक खुलासा असल्यास संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून संघावर प्रशासक नियुक्त करण्याचा इशाराही त्यांनी या नोटिशीमध्ये दिला आहे. 

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, निविदा प्रक्रिया, दूध संघाच्या संकलनात सातत्याने होणारी घट, दूध संघाच्या वतीने देण्यात आलेल्या अनामत रक्कम, संघाच्या सहा विद्यमान संचालकांकडे असलेली थकबाकी, दूध संस्थांकडे असलेली थकबाकी, दूध संघाला झालेला तोटा, करमाळा शीतकरण केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने पशुखाद्य आवक विक्रीमध्ये केलेला अपहार, सेवकांच्या बदल्या पदोन्नतीमध्ये योग्य ते धोरण न ठरवणे, प्राथमिक दूध संस्थांकडून करारनामा न करणे, २४० दिवसांपेक्षा कमी दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांवर पोट नियमानुसार कारवाई न करणे यासह १० मुद्द्यांवर विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी या नोटिशीत संघाला जाब विचारला आहे. 

दूध संघाच्या सभासदांच्या हितासाठी बाधा आणणारे कृत्य संघाकडून होत असल्याचा ठपका ठेवत दूध संघाचे संचालक मंडळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७८ अ अन्वये तरतुदीनुसार कारवाईस पात्र असल्याचेही त्यांनी या नोटिशीमध्ये म्हटले आहे. याबाबतची नोटीस १ फेब्रुवारीला दूध संघाला व संचालकांना बजावण्यात आली आहे. या नोटीसवर १५ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याची सूचनाही दूध संघाला करण्यात आली आहे.   कारण की राजकारण सोलापूर जिल्हा दूध संघावर सध्या भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक हे अध्यक्ष आहेत. वास्तविक, दूध संघाबाबतच्या या  तक्रारी पूर्वीही होत्याच. पण तत्कालीन भाजप सरकारच्या काळात याबाबत काहीच कारवाई झाली नाही. पण आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मात्र तत्काळ याबाबत कारवाईची मोहीम सुरू झाली आहे. अर्थात, या सगळ्यामागे खरेच आर्थिक व्यवहारातील त्रुटीचे कारण आहे की राजकारण हे लवकरच स्पष्ट होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com