राज्यात कोल्हापूर विभागात सर्वाधिक ऊसगाळप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर  : राज्यात जानेवारीच्या पहिल्या सप्ताहाअखेर २१३.८१ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. सरासरी १०.२७ टक्के उताऱ्याने २१९.५७ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. या कालावधीअखेर १४२ साखर कारखाने सुरू होते. कोल्हापूर विभागाने सर्वाधिक सरासरी ११.३५ टक्के उतारा मिळवत राज्यात अग्रस्थान मिळविले आहे. या विभागात सर्वाधिक ७१. ६७ लाख टन उसाचे गाळप झाले असून ८१.३८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

त्या खालोखाल पुणे विभागात ५६.६२ लाख टन ऊस गाळप झाले असून, सरासरी १०.४४ टक्के उताऱ्याने ५९.१२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हे दोन विभाग वगळता अन्य विभागात ऊसगाळप स्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर व पुणे विभाग वगळता अन्य विभागांत जानेवारीनंतर साखर कारखाने उसाअभावी बंद होण्यास प्रारंभ होण्याची शक्‍यता असल्याचे साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.

आत्तापर्यंत झालेल्या गाळप हंगामात एकूण साखरेच्या उत्पादनात कोल्हापूर व पुणे विभागातच साठ टक्के साखर उत्पादित झाली आहे. सोलापूर, नगर औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत धीम्या गतीने हंगाम सुरू आहे. नांदेड, अमरावती, नागपूर या विभागात तर नाममात्रच हंगाम सुरू असल्याची स्थिती आहे. सोलापूर, नगर, नांदेड, अमरावती विभागाचा सरासरी साखर उतारा ९ टक्के आहे. औरंगाबाद, नागपूरचा सर्वांत कमी म्हणजे सरासरी ८ टक्के साखर उतारा आहे. पुणे, कोल्हापूर वगळता इतर सर्व ठिकाणी उसाची चणचण, तसेच खराब झालेला ऊस गाळप होत असल्याने उताऱ्यात घट होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.    दूधगंगा वेदगंगा कारखान्याचा साखर उतारा ११.८५ टक्के कोल्हापूर जिल्ह्यात बिद्रीच्या दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याचा सरासरी उतारा सर्वाधिक म्हणजे ११.८५ टक्क्यांच्या आसपास आहे. या खालोखाल गुरुदत्त टाकळीवाडी, वारणा या कारखान्यांचा क्रमांक आहे. अनेक ठिकाणी अद्यापही पूरबाधित उसाचे गाळप सुरू असल्याने प्रत्येक वर्षी उताऱ्यात आघाडीवर असणाऱ्या कारखान्यांना यंदा जानेवारीच्या पहिल्या सप्ताहाअखेर पिछाडीवर जावे लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com