नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?

नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?

नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा झालेल्या पावसाचा उताऱ्यावर परिणाम झाला आहे. नगर, नाशिकमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा एका टक्क्याने साखर उतारा कमी आहे. त्याचा फटका पुढील वर्षातील साखरेच्या दरावर होणार आहे. पुढच्या वर्षी उस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीच्या दरात प्रती टनाला प्रत्येक टक्क्यानुसार साधारण पावणे तीनशे रुपये फटका सोसावा लागेल, अशी  शक्यता व्यक्त केली जात आहे. 

नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये यंदा ३२ पैकी केवळ पंधरा कारखाने सुरू आहेत. नगर, नाशिक जिल्ह्यांसह अनेक भागांत ऊसटंचाई असल्याने सुरू असलेले साखर कारखाने साधारण महिनाभराच्या आत बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या हद्दीतील सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी आतापर्यंत सुमारे तीस लाख टन उसाचे गाळप केले आहे. अजून साधारण वीस लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांनी उसाला दर द्यावा, यासाठी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी आंदोलने होतात. शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर मिळावा अशी मागणी असते.

अनेक कारखाने एफआरपीनुसारही दर देत नसल्याची बाब सातत्याने पुढे येत आहे. मुळात उसाला मिळणाऱ्या उताऱ्यावरच एफआरपीची रक्कम ठरवली जाते. त्यातून ऊस वाहतूक वजा करून उर्वरित रक्कम उसाचा प्रतिटन दर म्हणून दिली जाते. साखर उताऱ्याच्या प्रती टक्‍क्याला २७५ रुपये दर आहे. मागील वर्षाच्या साखर उताऱ्यावर पुढील वर्षाची एफआरपी काढली जाते आणि त्यानुसारच दर दिला जात असल्याचे येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून सांगण्यात आले. 

नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदा एक ते दोन टक्क्यांनी साखर उतारा घसरला आहे. गेल्यावर्षी सरासरी सव्वा अकरा टक्के साखर उतारा होता. यंदा आतापर्यंत झालेल्या ऊस गाळपानुसार सरासरी ९.३० टक्के साखर उतारा आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत दीड टक्‍क्याने साखर उतारा कमी आहे. उशिराने झालेल्या पावसाचा उताऱ्यावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी यंदाच्या साखर उताऱ्यावर पुढील वर्षी एफआरपीचा दर निश्चित होणार आहे. त्यामुळे यंदा साखर उतारा घसरला असल्याने पुढील वर्षी उस उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी प्रती टनाला पावणे तीनशे रुपयांपासून पुढेच फटका सोसावा लागणार असल्याचे दिसत आहे.

कारखान्यांचा यंदाचा आतापर्यंतचा सरासरी साखर उतारा (कंसात गतवर्षीचा उतारा, टक्के) ः अगस्ती ः १०.२६ (११.७६), अशोक ः ९.१५ (११.३२), ज्ञानेश्वर ः ९.४२ (११.४२), डॉ. विखे पाटील ः १०.०३ (१२.५०), शंकरराव काळे कोपरगाव ः ९.७८ (१०.९२), मुळा ः ८.८ ( ११.०९),  भाऊसाहेब थोरात ः ९.८७ (११.८५), संजीवनी ः ८.८५ ( ११.००), वृद्घेश्वर ः ७.८७ (१०.९०), अंबालिका ः ९.०० (११.८४), गंगामाई ः ९.०३ (११.०४), क्रांती शुगर (पारनेर) ः १०.०० (११.४०), युटेक शुगर ः ६.३४ (१०.७५), कादवा (नाशिक) ः  १०.८८ (१२.२०) द्वारकादीश ः १०.११ (११.५७),    साखर उताऱ्यात कादवा, अगस्ती कारखाना पुढे  नगर जिल्ह्यात साखर उताऱ्यात आतापर्यंत अगस्ती (अकोले) तर नाशिकमध्ये कादवा कारखाना पुढे आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार सर्वात कमी साखर उतारा यंदा युटेक शुगरचा आहे. गतवर्षी साखर उताऱ्यात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखाना पुढे होता. त्यामुळे त्यांची एफआरपी यंदा सर्वाधिक आहे. यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत सगळ्याच कारखान्यांचा साखर उतारा खालावला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com