लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करा ः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचे गंभीर दृश्य काही शहरांमध्ये होते. पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांची गर्दीही होणार नाही आणि सुरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई  : अर्थचक्र सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली. पण याचा अर्थ लॉकडाउनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा. पण अंमलबजावणीत कुचराई करू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील यात कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. यावेळी श्री. ठाकरे म्हणाले, की विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस हे ज्या पद्धतीने कोरोनाबाबतची परिस्थिती हाताळत आहेत. त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. मात्र मला येत्या काही दिवसांत ठोस रिझल्ट दिसला पाहिजे. लॉकडाउन करणे सोपे होते. पण आता त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरु झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाउनचे योग्य पालन होत नाही अशा तक्रारी येत आहेत. आपण प्रयत्न करीत आहात. पण मे अखेरपर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आपण उद्योग- व्यवसाय काही प्रमाणात सुरु केले. मात्र याठिकाणी रेड झोन मधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये ही काळजी घ्यावी लागेल. लक्षणे दिसत नसल्याने अनेक व्यक्ती या कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हेही आपल्याला पाहावे लागेल.

काही वैद्यकीय कर्मचारी, पोलीसांना संसर्ग झाला आहे हे चिंता वाढवणारे आहे. आत्तापर्यंत आर्थिक आघाडीवर जे नुकसान व्हायचे ते होतेच आहे पण आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली ही साथ आता कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: रोखून पुढील नुकसान होऊ न देणेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळूनच होईल हेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री. टोपे म्हणाले, की रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कोविड आणि नॉन कोविड रुग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. आपापल्या भागातील डॉक्टर्सना, वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या लोकांना याकामी सहभागी करून घ्यावे.

मुख्य सचिव अजोय मेहता म्हणाले, की शहरी भागात असलेला कोरोना राज्याच्या ग्रामीण भागात शिरकाव होऊ न देणे महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांनी कोरोनाविषयक रुग्णांची सर्व माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच चाचण्यांचे अहवाल वेळेत मिळतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे.आयसीएमआरचा डाटा हाच प्रमाण मानला जाईल. यात कुठेही चूक होता कामा नये.

प्रधान सचिव भूषण गगराणी म्हणाले, की कोविड योद्धा म्हणून सहभागी झालेल्यांचे प्रशिक्षण दोन तीन दिवसांत संपेल. मग हे सर्व त्या त्या जिल्ह्यांत वैद्यकीय सेवेसाठी जाऊ शकतील. प्रथमोपचार प्रशिक्षण घेऊन गिर्यारोहक महासंघाचे कार्यकर्ते देखील नगर, ठाणे, सांगली इथे प्रशासनास मदतीसाठी तयार आहेत.

प्रधान सचिव राजीव जलोटा यांनी यावेळी कोरोना बाबतीत जिल्ह्यांची आकडेवारी आणि निष्कर्ष यांचे संगणकीय विश्लेषण केले. प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनीही याला अनुसरून माहिती दिली. देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या ३१ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तसेच देशातील एकूण मृत्यूच्या ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. बरे होऊन घरी जाण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून ९.३ दिवस इतका झाला आहे. देशात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ११.३ दिवस इतका आहे. देशात मृत्यू दर ३.२३ टक्के आहे. महाराष्ट्रात देखील तो कमी होऊन ४.२२ टक्क्यांवर आला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com