बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारी

सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट बियाण्यांचा पुरवठा केल्याने बियाणे उगवण झाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७६८ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट बियाण्यांचा पुरवठा केल्याने बियाणे उगवण झाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत.  नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७६८ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत.

त्यातील ६०८ शेतकऱ्यांच्या तक्रारींनुसार पाहणी करून पंचनामे केल्याची माहिती कृषी विभागाने दिली. मात्र जिल्ह्यात नेमक्या किती क्षेत्रावर बियाणे उगवण झाली नाही, याची माहिती कृषी विभागाकडे अजूनही उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. बियाणे उगवले नसल्याने बाजरी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महाबीज बियाणे बदलून देत आहे, मात्र खासगी कंपन्यांकडून बियाणे घेतलेल्या शेतकऱ्यांबाबत अजून निर्णय झाला नसल्याने अशा शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीसोबत आर्थिक संकट ओढावले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीनची सरासरीपेक्षा चौदा टक्के जादा म्हणजे ६२ हजार हेक्टर तर बाजरीची दीड लाख हेक्टरच्या जवळपास पेरणी झाली. मात्र सोयाबीन, बाजरीच्या बियाणांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या. आतापर्यंत ७६८ तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील ६०४ तक्रारींनुसार कृषी विभागाच्या पथकाने शहानिशा करून पंचनामे केले आहेत. असे असले तरी अजूनही १६० शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षा आहे. बियाणे उगवले नसल्याने किती क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागेल, किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले याबाबात मात्र अजून कृषी विभागाकडेही माहिती नाही. बियाणांच्या तक्रारी कृषी विभाग गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत कृषी विभागाच्या कामावर बहुतांश लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. 

खासगी कंपन्यांबाबत तक्रारी अधिक  निकृष्ट बियाण्यांबाबत आतापर्यंत सोयाबीनमध्ये महाबीजच्या २३६; तर खासगी विविध कंपन्यांच्या २७८ तसेच बाजरीत सर्व खासगी कंपन्यांच्या २४३ तक्रारी आहेत. शासनाने दिलेल्या आदेशानुसार महाबीज बियाणे बदलून देत असले तरी खासगी कंपन्यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा स्वतः खर्च करून बियाणे खरेदी करावे लागणार आहेत. खासगी कंपन्यांनीही बियाणे बदलून देण्याची मागणी असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सोयाबीन, बाजरीचे बियाणे उगवले नसल्याबाबत तक्रारी असलेल्या शेतकऱ्यांना महाबीज बियाणे बदलून देत आहे. मात्र खासगी कंपन्यांचे काय, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोण देणार, सरकारनेही याबाबत हात वर केले आहेत. खासगी कंपन्यांनीही तातडीने बियाणे बदलून द्यावे. शिवाय निकृष्ट बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या सतत तक्रारी असताना त्याकडे जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करतात त्याबाबतही चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी केली.

सोयाबीन बियाण्याच्या तक्रारींची संख्या ः श्रीरामपूर ः ८६, नेवासा ः ३७, कोपरगाव ः २३१, पारनेर ः ७, जामखेड ः ६९. पाथर्डी ः १, राहाता ः ८२, संगमनेर ः ४, राहुरी ः १. 

बाजरी बियाण्याच्या तक्रारींची संख्या ः नगर ः ६, पारनेर ः २२०,संगमनेर ः ११, शेवगाव ः १, राहुरी ः २. पहिल्यांदा बाजरी पेरली, मात्र उगवली नसल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पेरणीची मजुरी, बियाण्यांचा खर्च पुन्हा करावा लागणार आहे. आधीच आर्थिक संकट ओढवले असताना आता पुन्हा नवीन अडचण निर्माण झाली आहे.  - मंगेश कान्होरे, शेतकरी, घारगाव, ता. संगमनेर, जि. नगर.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com