मुळा कालव्याचे पाणी अनेक गावांत पोचलेच नाही 

पाटबंधारे विभागाचे अधिकारी राजकीय दबावापोटी राहुरी व नेवासे तालुक्‍यातील ‘हेड’च्या भागात पाण्याची उधळपट्टी करतात. शेवगाव-पाथर्डीच्या ‘टेल’च्या भागातील शेतकऱ्यांवर प्रत्येक आवर्तनावेळी अन्याय होतो. - शिवाजी भिसे,सदस्य, मुळा कालवा सल्लागार समिती
पाण्याअभावी जळालेले कांदापीक.
पाण्याअभावी जळालेले कांदापीक.

अमरापूर, जि.नगर  : मुळा उजव्या कालव्यातून सध्या सुरू असलेल्या आवर्तनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. आवर्तन सुटून पंधरा दिवसांपेक्षाही अधिक कालावधी उलटला, तरी अमरापूर येथील पाथर्डी शाखा कालव्यांतर्गत येणाऱ्या तीन व भातकुडगाव येथील एक अशा चार वितरिकांखाली येणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाणी मिळालेले नाही. त्यामुळे शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील एकूण ६० गावांतील शेतकऱ्यांची भुईमूग, कांदा, बाजरी, ऊस व चारापिके जळून चालली आहेत.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून २० मार्चला सुरू झालेल्या आवर्तनातून अमरापूर उपविभागातील पाथर्डी शाखा कालव्याअंतर्गत येणाऱ्या तीन वितरिकांतून पाथर्डी तालुक्‍यातील सुसरे, साकेगाव, काळेगाव, चितळी, पाडळी, हनुमान टाकळी, जवखेडे, कासार पिंपळगाव व शेवगाव तालुक्‍यातील अमरापूर, फलकेवाडी, आव्हाणे, वाघोली, वडुले, मळेगाव, बऱ्हाणपूर, गरडवाडी, सामनगाव या गावांना आणि भातकुडगाव वितरिकेअंतर्गत येणाऱ्या ढोरजळगाव, आखतवाडे, जोहरापूर, लोळेगाव, भायगाव, देवटाकळी, हिंगणगाव, खामगाव या ‘टेल’च्या भागातील शेतकऱ्यांना ‘टेल टू हेड’ या प्राधान्याने पाणी मिळणे अपेक्षित होते. पाणीपट्टीची रक्कम भरून तशी मागणी शेतकऱ्यांनी नोंदविलेली आहे; मात्र आवर्तनाचे ‘टेल टू हेड’ या क्रमाने पाणी देण्याचे नियम धाब्यावर बसवून नेवासे व राहुरी तालुक्‍यातील वरच्या भागात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. आवर्तन सुटून १५ दिवस उलटून गेले, तरी पाणी न मिळाल्याने व उन्हामुळे पिके जळू लागली आहेत.

धरणात यंदा मुबलक पाणी असताना पाटबंधारे विभागाच्या ढिसाळपणामुळे शेतकऱ्यांची हातात आलेली पिके हातची गेली आहेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांना जाता येत नाही. त्यामुळे आमदार मोनिका राजळे यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना त्वरित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवाजी भिसे, बाळासाहेब कंठाळी, श्रीकांत मिसाळ, भाऊसाहेब उदागे, दत्तू घुले, विवेक सातपुते, आप्पासाहेब सातपुते, कचरू चोथे, संजय खरड, रामदास कोळगे, भीमराज सागडे, उमेश भालसिंग, राजेंद्र आघाव, दादा कंठाळी, अनिल खैरे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com