सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज जोडण्यांची कामे प्रलंबित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या ८५९६ वीज जोडण्यांसाठी ठेकेदारांकडे कामाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, त्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. मागील दीड वर्षांत केवळ २१०६ जोडण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ६४९० शेती पंपांच्या जोडण्या केवळ ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित राहिल्या आहेत. त्यामुळे शेतीपंपांना वीज जोडणी कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांनी शेतीपंपाच्या वीज जोडणीसाठी रीतसर पैसे भरून अर्ज दाखल केले होते. यामध्ये २०१२ ते २०१९ या वर्षातील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. १०,२३९ शेतकऱ्यांच्या वीज जोडण्यांपैकी महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ अखेरच्या प्रलंबित ८५९६ वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत (एचव्हीडीएस) १९८ कोटी रुपयांच्या ५६ निविदा मागविल्या होत्या. त्यापैकी २६ निविदांना प्रतिसाद मिळाल्यामुळे १०६ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, ठेकेदारांकडून कामे सुरू करण्यास कमी प्रतिसाद मिळाला. मागील दीड वर्षांत केवळ दोन हजार १०६ वीज जोडण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे ठेकेदारांनी वेळेत पूर्ण केली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरूनही त्यांची पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत.

दहा हजारांवर वीज जोडण्या सध्या प्रलंबित दरम्यान, मार्च २०१८ पूर्वीच्या जोडण्या प्रलंबित असतानाच २०१८-१९ या वर्षात ९०२ आणि २०१९-२० या वर्षात ९७४ शेतकऱ्यांनी जोडणीसाठी पैसे भरून अर्ज केले आहेत. सध्या महावितरणकडे १०,२५३ जोडण्या प्रलंबित आहेत. एप्रिल २०१२ मध्ये २६७ आणि २०१२-१३ या वर्षात ६१६ शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यांना वीज जोडणी मिळाली नाही. गेल्या दोन वर्षांत सुमारे दोन हजार वीजपंपाच्या जोडण्यासाठी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, या दोन हजार वीज जोडण्यासाठी महावितरण कंपनीने अद्यापही काम हाती घेतलेले नाही. त्यामुळे शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.   

प्रलंबित जोडण्या
इस्लामपूर   ६५९
कवठेमहांकाळ ४२६५
सांगली ग्रामीण २३५०
सांगली शहर   २३
विटा  २९५६
एकूण  १०२५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com