साताऱ्यातील ११ गावे होणार मॉडेल व्हिलेज 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कऱ्हाड, जि. सातारा  ः शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य तपासणीचे महत्त्व व त्याची माहिती देण्यासाठी आणि त्यांचे एकरी उत्पादन वाढावे यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातून सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्‍यातून ११ गावे तर राज्यातील ३५१ गावे मॉडेल व्हिलेज म्हणून विकसित केली जाणार आहेत. त्या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीच्या नमुन्यांचे विश्‍लेषण करून माहिती देण्यात येणार आहे. उत्पादनवाढीसाठी केंद्र व राज्य शासन ही योजना राबविणार आहे.

शेतातून जास्तीत जास्त उत्पादन मिळावे या हेतूने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनीत रासायनिक खतांचा वापर केला आहे. वर्षानुवर्षे त्याचा वापर सुरूच आहे. त्याचबरोबर शेतीला ठिबकने पाणी देण्याऐवजी पाटपाण्याने पाणी देण्यात येते. गरजेपेक्षा जास्त पाणी देण्यात येत असल्यानेही पाण्याचाही अमर्याद वापर झाला आहे. परिणामी जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा उत्पादन क्षमतेवरही परिणाम होऊन दरवर्षी उत्पादन क्षमता वेगाने घटत चालली आहे. 

शेतकरी दरवर्षी आपल्या शेतातील जमिनीची तपासणी करत नाहीत. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. परिणामी दरवर्षी शेतकऱ्यांची शेती तोट्यात जाऊ लागली आहे. त्यावर मात करून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी आणि त्यांची जमीन क्षारपड होण्यापासून वाचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत जमिनीतील रासायनिक गुणधर्माची स्थिती, प्रमुख अन्नद्रव्याची पातळी, सूक्ष्म मूलद्रव्याची स्थिती तपासण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याच्या अहवालावरून शेतकऱ्यांना पिकांच्या खताच्या मात्रांबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मॉडेल व्हिलेज उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्‍यातील एका गावाची निवड करण्यात येणार आहे.

त्या गावातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माती नमुने तपासून मृद आरोग्य पत्रिका वितरित करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यंदा या योजनेअंतर्गत निवडलेल्या गावातील सर्व शेतकऱ्यांकडून २ लाख ३ हजार ९८६ मृदा नमुने तपासणी घेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत एक लाखांवर नमुने घेण्यात आले आहेत. निवडलेल्या गावातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या एमआयएस संगणकीय प्रणालीमार्फत शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मेळाव्यांचे आयोजन करून जमिनीच्या आरोग्याबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. त्यातुन संबंधित गाव मॉडेल व्हिलेज म्हणून विकसित करण्यात येणार आहे. 

राज्यासाठी १४ कोटी २४ लाखांची तरतूद  जमीन आरोग्य पत्रिका या उपक्रमासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत १४ कोटी २४ लाख ४७ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ६ कोटी ४१ लाखांचा निधी उपलब्ध झाला असून उर्वरित ४ कोटी २७ लाख ३४ हजार रुपयांचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहे. 

जिल्ह्यातील या गावांची निवड सातारा जिल्ह्यात मॉडेल व्हिलेजअंतर्गत ११ तालुक्‍यातून ११ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये कोडोली (ता. कऱ्हाड) गावातून १८९४, वेचले (सातारा) गावातून ७२१, एकसर (वाई) गावातून ९३८, भिवडी (जावली) गावातून ६६९, भोसेमधुन (महाबळेश्‍वर) ३४०, हिंगणे (खटाव) गावातून १३८६, किरकसाल (माण) गावातून १८८४ , सिद्धेश्‍वरनगरमधून (पाटण) ४६७, निगडी (कोरेगाव) गावातून ८४४, मार्वेतून (खंडाळा) ९६६, भवानीनगरमधून (फलटण) ६६९ असे १० हजार ७७८ मातीचे नुमने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com