एचटीबीटी कापूस पीक शिवार फेरी; शेतकरी संघटनेचा तंत्रज्ञान स्वातंत्र्य लढा

एचटीबीटी कापूस पीक शिवारफेरीत माहिती घेताना शेतकरी
एचटीबीटी कापूस पीक शिवारफेरीत माहिती घेताना शेतकरी

अकोला  ः शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जैवतंत्रज्ञान स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून या हंगामात शेतकऱ्यांनी एचटीबीटी तंत्राने युक्त कापसाची लागवड केली आहे. या कपाशी पीक पाहणीचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ३) अडगाव येथे झाला.  

अकोली जहाँगीर या गावात दहा जूनला शेतकरी संघटनेने पुढाकार घेत तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलन सुरू केले होते. या वेळी प्रतीकात्मक आंदोलन करीत एचटीबीटी कपाशीची लागवड करण्यात आली. यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी या कापसाची लागवड केली. अशीच लागवड अडगाव बुद्रुक गावात लक्ष्मीकांत कौठकर यांनीही केली आहे. या कपाशी पीक पाहणीसाठी शुक्रवारी शिवार फेरी आयोजित करण्यात आली. 

शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ललित बहाळे, माहिती तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर, सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड, माजी जिल्हाध्यक्ष सतीश देशमुख, प्रमिलाताई राम भारसाकडे, नीलेश नेमाडे तसेच अकोला, बुलडाणा, अमरावतीसह लगतच्या जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते.  एचटीबीटी विषयी काय म्हणतायेत शेतकरी.. जरूर पहा video

या वेळी श्री. कौठकर म्हणाले, की २६ जूनला एचटीबीटी कपाशीची एक एकरात लागवड केली. या शेतात आतापर्यंत साडेआठ क्विंटल कापूस आला आहे. आता दुसरी वेचणी करणार असून किमान पाच क्विंटलपेक्षा अधिक कापूस उत्पादन होईल. या एचटीबीटी कपाशीचे व्यवस्थापन करताना आपण पिकावर थेट तणनाशकाची फवारणी केली. यामुळे तणावर प्रतिबंध मिळवता आला. त्याशिवाय एकही डवरणी केली नाही. यामुळे व्यवस्थापनाचा खर्च सामान्य शेतकऱ्यांच्या खर्चाच्या तुलनेत कमी लागल्याचे त्यांनी सांगितले.

या कपाशीच्या लागवडीमुळे निंदणीचा खर्च तर वाचला शिवाय तणामुळे येणाऱ्या किडीही पिकापासून दूर राहिल्या. यावर्षी या भागात अतिपाऊस झाला होता. या पावसामुळे इतर शेतकऱ्यांचा व्यवस्थापनाचा खर्च एकरी १५ हजारांवर गेला आहे. सततच्या पावसामुळे निंदणासाठी वेळ मिळाला नाही. एचटीबीटी कपाशी लागवड केलेल्या शेताशेजारीच दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील केवळ बीटी कपाशीचे पीक शेतकऱ्यांना दाखवत दोन्ही कपाशीमधील फरकही उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आला.   ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य द्या’ शासनाने नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले पाहिजे. हवामानात सहजपणे टिकेल असे वाण दिले पाहिजे. जीएम तंत्रज्ञान खुले करावे, शेतमालाला योग्य भाव मिळेल, अशा प्रकारचे दर दिले पाहिजेत, आदी मागण्या श्री. कौठकर, श्री. देशमुख यांनी केल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com