निराशा करणारा अर्थसंकल्प : शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

निराशा करणारा अर्थसंकल्प : शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
निराशा करणारा अर्थसंकल्प : शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

पुणे ः केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला उभारी देणाऱ्या योजनांचा समावेश आहे. परंतू, मार्केटिंग क्षेत्रावर सरकारने अधिक भर द्यायला हवा होता. तसेच या अर्थसंकल्पातील तरतूदींबाबत शेतकरी निराश आहेत,  केवळ स्वप्नरंजन करणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून शेतकरी हिताची सरकारची भूमिका स्पष्ट होत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांची निराशा   केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला खरा, पण शेतकऱ्यांना त्यातून कसा फायदा होणार? हे स्पष्ट दिसत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पण शेतीमालाला दर कोण देणार? केंद्र सरकार फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून अर्थसंकल्पात शेतकरी हित पाहिले जात नाही. तीच परंपरा या वेळीही सुरू राहिली आहे. एकंदर शेतकऱ्यांची निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे. - रमेश कचरे, शेतकरी, पाडळी, ता. पाथर्डी, जि. नगर.

कृषी क्षेत्राला उभारी देणाऱ्या योजना मागील वर्ष आर्थिक मंदीच्या सावटाखाली गेले. किमान यावेळच्या अर्थसंकल्पातून शेतीला उभारी मिळेल, अशी आशा ठेवावी लागेल. शेतीउत्पन्न, हमीभाव, सिंचन, वीज, दुग्ध उत्पादन, फळ, फूल, मत्स्यशेती प्रकल्पांसाठीची तरतूद, शेतमाल बाजारात नेण्यासाठी लागणारे रस्ते, विशेष रेल्वेची तरतूद या योजनांमुळे कृषी क्षेत्राला नवी उभारी देईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. मात्र या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा  आहे. - डॉ. प्रफुल्ल साहेबराव सुलताने, प्रगतिशील शेतकरी, गुंजखेड, जि. बुलडाणा.

या अर्थसंकल्पातही शेतकरी उपाशीच केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारची कोणतीही भूमिका स्पष्ट दिसत नाही. मागील पाच वर्षे शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट करण्याच्या घोषणेत घालवली आणि या आर्थिक वर्षात ते दुप्पट करण्याची घोषणा केली प्रत्यक्षात मात्र, शेतकरी उपाशीच आहेत. कदाचित पुढील अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न अडीचपट करण्याचा वल्गना केल्या जातील. सध्याची धोरणे म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचा भात अशी आहेत. शेतकऱ्यांसाठी कृतिशील कार्यक्रम न राबवता नुसत्या घोषणा करण्याची कामे सुरू आहेत. - अधिकराव यदू देशमुख, शिवाजीनगर, जि. सातारा.

अर्थसंकल्पाबाबत शेतकरी समाधानी नाहीत  यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीपूरक दुग्ध व्यवसाय वाढीसाठी ठोस तरतूद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार हा प्रश्‍न कायम आहे. दुग्ध व्यवसाय विस्तारासाठी फारसे प्रयत्न होत नसल्याने वाढत्या लोकसंख्येची दुधाची गरज भागणार नाही. एकदंरीत या अर्थसंकल्पाबाबत शेतकरी समाधानी नाहीत. - भगवान सावंत, जवळा बाजार, जि. हिंगोली

शेतीकरिता स्वप्नरंजक अर्थसंकल्प शेतीकरिता स्वप्नरंजक असा हा अर्थसंकल्प आहे, असे म्हणता येईल. फर्टीगेशन सिस्टीम महाग आहे. अल्पभूधारक शेतकरी त्यावरचा खर्च पेलू शकत नाही. असेच ऑटोमायझेशन यंत्रणेचेदेखील आहे. अशाप्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुदानासाठी विचार केल्यास शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. सौरऊर्जेचा प्रयोग कृषिपंपांसाठी यापूर्वी महाराष्ट्रात करण्यात आला. परंतु, त्या वेळी ज्यांच्याकडे वीज जोडणी असेल त्यांना सौरऊर्जेवरील पंप नाकारण्यात आला आहे. विजेची उपलब्धता नसल्याने सरसकट सौर पंप मिळणे गरजेचे आहे. या बजेटमध्ये त्यासंबंधीची घोषणा असली तरी अंमलबजावणी कशी होते, यावरच शेतीचे भविष्य अवलंबून राहणार आहे. शेतीकरिता स्वप्नरंजक प्रत्येक बजेटमध्ये केलेले असते. परंतु, त्या स्वप्नांची पूर्तता झाली तरच शेतीचा विकास शक्‍य होईल, असे वाटते.  - आरती पदमावार, शेतकरी, कोहळी, ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर

मार्केटिंग क्षेत्रातील सुधारणेवर भर हवा होता अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार ही घोषणा तशी सुखावह आहे, पण देशाच्या मार्केटिंग क्षेत्रात सुधारणा झाल्याशिवाय दुप्पट उत्पन्न ही घोषणा शक्य नाही, त्यावर अर्थसंकल्पात सरकारने भर द्यायला हवा होता. शेतकऱ्यांसाठी १६ कलमी योजना आणली आहे. त्यातून काही प्रमाणात फायदा होईल, अशी आशा आहे. सौरऊर्जेबाबतीत सरकार सकारात्मकतेने काम करत आहे, हे सोलारपंप योजनेवरून दिसते आहे. पण त्याचा लाभ गतकाळात काही ठरावीक भागाला मिळाला या अर्थसंकल्पाच्या घोषणेने तो परिपूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. ग्रामविकासासाठी केलेली भरीव तरतूद महत्त्वाची आहे. त्याची अंमलबजावणी कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दूध उत्पादन, प्रक्रिया उद्योगासाठी भरीव तरतूद केली आहे, शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेची संकल्पनाही महत्त्वाची वाटते. -दत्ता भोसले, शेतकरी, सरकोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com