नगर जिल्ह्यात ज्वारीचे निम्मे क्षेत्र राहणार रिकामेच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात यंदा मॉन्सूनोत्तर पाऊस जोरदार झाला. त्याचा मात्र ज्वारीच्या क्षेत्रावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. यंदा आतापर्यंत रब्बी ज्वारीची सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ५० टक्के म्हणजे २ लाख ३५ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा ज्वारीचे आगार असलेल्या भागातही पन्नास टक्के रिकामेच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र सुमारे ६ लाख ६७ हजार २६१ हेक्टर असते. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारीचे असते. ज्वारीचे जिल्हाभरात दरवर्षी साधारण ४ लाख ६९ हजार ७८५ हेक्टर सरासरी क्षेत्र असते. हे क्षेत्र गृहीत धरून बियाणे मागणी व अन्य बाबींचे कृषी विभागाकडून नियोजन केले जाते.

यंदा खरिपात पुरेसा पाऊस झाला नसल्याने खरिपासोबत रब्बीही अडचणीत येण्याची शेतकऱ्यांना भीती होती. मात्र आॅक्टोबर महिन्यात मॉन्सूनोत्तर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रब्बीच्या आशा उंचावल्या. असे असले तरी जास्तीचा पाऊस, शेतात साचलेले पाणी यामुळे रब्बी ज्वारी पेरणीला उशीर झाला. त्याचा परिणाम पेरणीवर झाला. मुळात अनेक भागात सप्टेंबरमध्ये ज्वारी पेरणीला सुरवात होते. त्यानंतर आॅक्टोबर अखेरपर्यंत पेरणी उरकलेली असते. यंदा मात्र आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्येही पेरणी करता आली नाही. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटले आहे.

यंदा सरासरीच्या पन्नास टक्केच म्हणजे २ लाख ३५ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे. आता ज्वारी पेरणीला उशीर झाला आहे. त्यामुळे यंदा ज्वारीचे पन्नास टक्के क्षेत्र रिकामेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्वारीचे आगार असलेल्या नगर, जामखेड, नेवाशासह सर्वच तालुक्यांत ज्वारीची पेरणी कमी झालेली आहे. अकोले तालुक्यात तर ज्वारीचे क्षेत्र अल्प आहे.   

लष्करी अळीचा प्रादुर्भाव  जिल्ह्यात सध्या पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्वारीचे पीक जोमात आहे. मात्र अनेक भागात ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यंदा ज्वारीचे पीक जोमात असले तरी लष्करी अळीचे संकट धास्ती वाढवणारे आहे. कृषी विभागाने हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.    तालुकानिहाय ज्वारीचे पेरणी क्षेत्र (कंसात एकूण क्षेत्र) ः नगर ः २९,६७६ (१,०७,८४०),पारनेर ः ४३,००८ (८९,१३२),श्रीगोंदा ः ३१,३३१ (७७,२३१),कर्जत ः ४६,०४८ (९४,९६०),जामखेड ः ४१,९६३ (६०,८५२), शेवगाव ः ७,२६८ (३८,८१६),पाथर्डी ः १७,५१४ (३७,९९०),नेवासा ः ३,१५६ (२३,८०३),राहुरी ः ४,३४५ (२०,५२१),संगमनेर ः १,८१६ (२७,१५५),अकोले ः १५६ (७,१४४),कोपरगाव ः २,३३० (१७,१९३),श्रीरामपूर ः ४,१०० (४१,४४७),राहाता ः २,९०० (२३,१७८)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com