नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर एफआरपी थकीत

 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा कारखान्यांनी यंदाच्या हंगामात गाळप सुरु केले आहे. त्यातील आतापर्यंत दहा कारखान्यांकडून एफआरपीनुसार ८८ कोटी ८७ लाख रुपये शेतकऱ्यांना येणे आहे. नाशिक विभागातील १५ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ऊसउत्पादकांना ७१७ कोटी ५४ लाख रुपये दिले असल्याची माहिती नगर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली. 

नगर, नाशिक भागात उशिरा पाऊस झाला. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर झाला असल्याचे दिसत आहे. उस उत्पादनासह साखर उताऱ्यातही घट झाली आहे. नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये यंदा ३२ पैकी केवळ पंधरा कारखाने सुरू आहेत. नगर, नाशिक जिल्ह्यांसह अनेक भागांत ऊसटंचाई असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा दोन महिने लवकरच साखर कारखान्यांचे गाळप बंद होईल. नाशिक विभागात आत्तापर्यंत ५० लाख टन उस गाळप झाले असून ४८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. 

नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदा दीड ते अडीच टक्क्यांनी साखर उतारा घसरला आहे. गेल्यावर्षी सरासरी सव्वा अकरा टक्के साखर उतारा होता. यंदा आत्तापर्यंत झालेल्या ऊस गाळपानुसार मागील महिन्यात सरासरी साखर उतारा ९.३० टक्के होता, तो या महिन्यात १० टक्के झाला आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत दीड ते अडीच टक्‍क्यांनी साखर उतारा कमी आहे असे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. 

आतापर्यंत गाळप झालेल्या ऊसापोटी एफआरपी नुसार ८०१ कोटी ६४ लाख रुपये शेतकऱ्यांना देणे होते. त्यातील ७१७ कोटी ५४ लाख रुपये दिले आहेत. उर्वरित दहा कारखान्याकडून ८८ कोटी ८७ लाख रुपये शेतकऱ्यांना येणे आहे. एफआरपीपोटी आतापर्यंत ज्ञानेश्वर (भेंडा) कारखान्याने आतापर्यंतचे सर्व ८० कोटी ४३ लाख, शंकरराव काळे कारखान्याने ४५ कोटी ४० लाख, संगमनेर कारखान्याने ११० कोटी ७३ लाख, संजीवनी कारखान्याने ४७ कोटी सात लाख, गंगामाई कारखान्याने ८६ कोटी १२ लाख, द्वारकाधीश कारखान्याने ४४ कोटी ७ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.  

आधीचेही १९ कोटी २ लाख थकीत नगर, नाशिकमधील प्रत्येकी दोन साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे १९ कोटी २ लाख रुपये थकले आहेत. त्यात राहुरी येथील बाबुराव तनपुरे साखर कारखान्याकडे ३ कोटी ८६ लाख, श्रीगोंद्यातील हिरडगाव कारखान्याकडे ७ कोटी २० लाख, केजीएस कारखान्याकडे ५ कोटी ११ लाख, के.के. वाघ कारखान्याकडे २ कोटी ८५ लाख रुपये  थकीत असल्याचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने सांगितले.   अशी आहे एफआरपीनुसार देणे रक्कम (कंसात दिलेली रक्कम) 

  • अगस्ती कारखाना : १३ कोटी ४३ लाख (३० कोटी ५४ लाख)  
  • अशोक कारखाना : १२ कोटी ७३ लाख (२५ कोटी ७५ लाख)
  • डॉ. विखे पाटील कारखाना : २२ लाख (५० कोटी ९ लाख) 
  • मुळा कारखाना : १४ कोटी ७ लाख (२६ कोटी )
  • वृद्धेश्वर कारखाना : सात कोटी ९४ लाख (११ कोटी १४ लाख) 
  • केदारेश्वर कारखाना : ५४ लाख 
  • अंबालिका कारखाना : २८ कोटी ९९ लाख (१२६ कोटी ८१ लाख) 
  • क्रांती शुगर : १ कोटी १९ लाख (१३ कोटी ११ लाख) 
  • युटेक शुगर :  ३ कोटी ३२ लाख (१ कोटी ३८ लाख) 
  • कादवा कारखाना (नाशिक) : ६ कोटी ४० लाख (१८ कोटी ७६ लाख)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com