राज्यात द्राक्ष बाग नोंदणीत घट; लांबलेल्या पावसाचा फटका

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम निर्यातीसाठी ‘ग्रेपनेट’वर होणाऱ्या नोंदणीवर झाला आहे. चालू वर्षी राज्यभरातील सुमारे ३२ हजार ६२० द्राक्ष बागांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी राज्यात ४३ हजार १७२ द्राक्ष बागांची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत चालू वर्षी जवळपास २० टक्क्यांनी नोंदणीत घट झाली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी द्राक्षांची निर्यात सुरू केली असून, आतापर्यंत तीस कंटेनरद्वारे ४०२ टन द्राक्षे नेदरलॅन्ड, युके, जर्मनीला पाठवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे फलोत्पादन संचालक शिरीष जमधडे यांनी दिली.

मागील वर्षापासून आॅनलाइन द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता अपेडा फार्मरकनेक्ट मोबाईल अॅप आणि अपेडाच्या बेवसाइटवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चालू वर्षी १ नोव्हेंबरपासून ग्रेपनेट ही आॅनलाइन कार्यप्रणाली राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. युरोपियन युनियन, रशिया, चीन, हाँगकाँग, मलेशिया, दुबई, युके, नेदरलॅन्ड, जर्मनी आदी देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ग्रेपनेटद्वारे बागांची नोंदणी आवश्यक आहे.

निर्यातक्षम द्राक्ष बगांची नोंदणी केल्यानंतर नोंदणी झाल्याचा संदेश संबधित शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चालू वर्षीपासून निर्यातक्षम नोंदणीकृत बागेतील कीड - रोगांचे नियंत्रण करण्याकरिता लेबलक्लेम कीटकनाशकांची यादी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामार्फत अंतिम करून प्रपत्र पाचमध्ये अपेडाच्या संकेतस्थळावर उलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कीडनाशक उर्वरित अंशची हमी देण्याकरिता तपासावयाच्या कीटकनाशकाची यादी अंतिम केली असून, ती पपत्र नऊमध्ये उपलब्ध करून दिली आहे. देशाबरोबरच स्थानिक बाजारपेठेमध्ये ग्राहकांना रासायनिक अवशेष अंशमुक्त द्राक्ष उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून ९० हजार द्राक्ष बागांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा परिणाम द्राक्ष बागांवर झाला आहे. द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दरवर्षी जानेवारीमध्ये काढणीसाठी येणाऱ्या द्राक्षांचे उत्पादन घटणार आहे.

महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातूनही द्राक्षाची निर्यात होते. यंदा या राज्यांमधून ३२ हजार ७३६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कर्नाटकातून १०८, आंध्र प्रदेशातून ८ द्राक्ष बागांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे ४३ हजार ३७२ द्राक्ष बागांची नोंदणी झाली होती. 

नोंदणीसाठी मुदतवाढ यंदा द्राक्षे बागांची कमी झालेली नोंदणी लक्षात घेऊन नोंदणीसाठी २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी अपेडाच्या www.apeda.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी संबधित मंडळ, कृषी अधिकारी, कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

गेल्या पाच वर्षांत झालेली द्राक्ष बागांची नोंदणी
२०१४-१५   २८,०००
२०१५-१६  २९,०००
२०१६-१७ ३२,०००
२०१७-१८ ३८,०००
२०१८-१९  ४३,१७२
२०१९-२० ३२,५९२
  राज्यात द्राक्ष बागांची झालेली नोंदणी 
जिल्हा  गेल्या वर्षी झालेली नोंदणी यंदा झालेली नोंदणी
नाशिक ३८४५९  २८०१४
सांगली २२१५  २०१८
सोलापूर १५८ २४६
पुणे    १५०८ ११२५
नगर  ५०४  ४१७
सातारा  ४७४  ४२७
लातूर १३० १२०
उस्मानाबाद २३७ २५०
बीड  
धुळे
एकूण ४३,१७२ ३२,६२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com