पंढरपुरात आज माघ वारी सोहळा

माघी वारीसाठी पंढरपुरात भाविक दाखल झाले आहेत
माघी वारीसाठी पंढरपुरात भाविक दाखल झाले आहेत

पंढरपूर, जि. सोलापूर  ः पंढरपुरात आज (ता. ५) माघ वारीचा सोहळा साजरा होत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची आस मनात ठेवून राज्यभरातून विविध भागांतून निघालेल्या पायी दिंड्यांचे आगमन पंढरीत झाले आहे. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी भक्तिरसात न्हाऊन गेली आहे. मंगळवारी (ता. ४) दुपारपर्यंत सुमारे तीन लाखांपर्यंत वारकरी पंढरपुरात दाखल झाले होते. 

वर्षभरातील प्रमुख चार वाऱ्यांपैकी एक असणाऱ्या या वारीला आषाढी-कार्तिकीप्रमाणेच महत्त्व आहे. विशेषतः मराठवाडा, सोलापूर व कोकणातून सर्वाधिक वारकरी या वारीसाठी पंढरीत येतात. मंगळवारी अनेक पायी दिंड्यांचे आगमन पंढरीत झाले. मंदिर परिसर आणि चंद्रभागा नदीवर वारकऱ्यांची एकच गर्दी झाली आहे. दशमीच्या स्नानाचे पर्व साधण्यासाठी वारकऱ्यांची पहाटेपासूनच नदीवर स्नानासाठी लगबग चालली होती. वारकरी नदीतील स्नान उरकून प्रदक्षिणा फेरी पूर्ण करत असल्याचे चित्र होते.

शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळा, आश्रमशाळांमध्ये प्रवचन, कीर्तन, भजनाचे सूर आळवले जात आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर वारकरी भजन करीत मंदिराकडे दर्शनासाठी जात असल्याचे चित्र दिवसभर राहिले. श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठीची रांग गोपाळपूर रस्त्यावरील शेडपर्यंत पोचली आहे. दर्शनासाठी १५ ते १७ तास लागत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com