राज्याचे नवीन वीज धोरण तीन महिन्यांत : ऊर्जामंत्री नितीन राऊत

शेतीसाठी सकाळी चार तास वीज देता येईल का, याबाबतही अभ्यास सुरू आहे. वीज उत्पादन खर्च कमी झाल्याशिवाय वीज दर कमी करणे शक्य नाही; त्यामुळे वीज उत्पादन खर्च कमी करणे, वीज गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. - नितीन राऊत, ऊर्जामंत्री
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्याचे नवीन वीज धोरण येत्या तीन महिन्यांत निश्चित केले जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.

देशात सर्वात महाग वीज महाराष्ट्रात असल्याबाबत विधान परिषदेत मंगळवारी (ता. ३) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. मंत्री राऊत म्हणाले, की विजेचे दर कमी करण्यासंदर्भात, सवलती देण्यासंदर्भात त्याचप्रमाणे वीज गळती रोखण्यासाठी आणि तूट कमी करण्याबाबत ऊर्जा विभाग अभ्यास करत आहे. हा अभ्यास अहवाल तीन महिन्यांत प्राप्त होईल. राज्यातील नागरिकांना १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा सरकारचा प्रयत्न असून ऊर्जा विभागाचा हा अहवाल आल्यानंतरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल. 

‘सारथी’मधील गैरव्यवहाराचा  अहवाल दहा दिवसांत ः वडेट्टीवार मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल येत्या दहा दिवसांत प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन बहुजन विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेत दिले. मंत्री वडेट्टीवार म्हणाले, की वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सीताराम कुंटे यांच्या नेतृत्वाखाली तीनसदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे. येत्या १० दिवसांत या समितीवर प्रशासकीय दर्जाचा अधिकारी नेमण्यात येईल. तसेच पूर्ण वेळ निबंधक, लेखाधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नेमण्यात येईल. सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवली जाईल. या संस्थेचे पैसे येत्या १५ दिवसांत दिले जातील. सारथी संस्थेच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असणे, अधिकाऱ्यांमध्ये वाद असल्याने कामकाज ठप्प असणे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यादरम्यान, भाजपचे भाई गिरकर यांनी मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण विषयावर निर्णय दिल्याशिवाय आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलकांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेता येणार नाही, असे संगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com