नवविवाहीत जोडप्याने केले कामगंध सापळ्याचे वाटप

सांगली ः चिकुर्डे (ता. वाळवा) येथील नवरदेव व नवरीने विवाहानंतर बोहल्यावरून थेट बांधावर जाऊन एकवीस शेतकऱ्यांना कामगंध सापळ्याचे वाटप करुन एक अनोखा उपक्रम राबविला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  ः चिकुर्डे (ता. वाळवा) येथील नवरदेव व नवरीने विवाहानंतर बोहल्यावरून थेट बांधावर जाऊन एकवीस शेतकऱ्यांना कामगंध सापळ्याचे वाटप करुन एक अनोखा उपक्रम राबविला. या उपक्रमाला तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांनी पाठिंबा देत पाटील कुटुंबीयांचे कौतुक केले. विवाहावर लाखो रुपये खर्च करणाऱ्यांपुढे वेगळा आदर्श या निमित्ताने समाजापुढे ठेवला.

चिकुर्डे येथे येथील महेश पाटील या शेतकरी तरुणाचा विवाह नुकताच (ता. १३) अपर्णाशी संपन्न झाला. शेतकरी विष्णू पांडुरंग पाटील यांचा मुलगा महेश पदवीधर झाल्यानंतर त्याने शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. शेतीमध्ये विविध प्रयोग करत उत्पादन वाढवण्यावर भर दिला. सोयाबीन भात, ऊस ही पिके तो घेतो. कोरोनामुळे लग्न समारंभावर उपस्थितीची मर्यादा आहे. त्यामुळे खर्च देखील कमी होणार होता. परंतु यामध्ये वेगळा उपक्रम राबविण्याचा पाटील कुटुंबीयांची इच्छा होती. पाटील कुटुंबीयांनी कृषी विभागाशी थेट संपर्क साधला. लग्न समारंभात खर्चाला बगल देत शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांचे वाटप करण्याची इच्छा तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांच्याकडे व्यक्त केली.

त्यानुसार तालुका कृषी अधिकारी यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये त्यांचे पीक किडीपासून वाचावे या हेतूने महेश यांनी अक्षता पडल्यानंतर पत्नी अपर्णा यांच्या साथीने शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांचे वाटप केले. विवाहावर लाखो रुपये नाहक खर्च करणाऱ्यांच्या पुढे वेगळा आदर्श या निमित्ताने समाजापुढे ठेवला. महेश हा शेतकऱ्यांमध्ये आदराचा विषय ठरला. 

यावेळी भगवानराव माने म्हणाले कि, महेश पाटील यांनी राबवलेला उपक्रम तरुणांना प्रेरणा देणारा आहे. शेतकऱ्यांप्रति सकारात्मकता त्यांनी जोपासली आहे. शेतकरी महेश पाटील म्हणाले की, आपल्या शेतीत सुधारणा करताना अन्य शेतकऱ्यांना ही काहीतरी मदत व मार्गदर्शन व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com