...आता बटाट्याचीही टंचाई

यंदा बेळगाव बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत बटाट्याची केवळ चाळीस टक्के आवक बाजार समितीत होत आहे. दर चांगले असले तरी बटाट्याचे उत्पादन अतिशय कमी असल्याने या दराचा नफा शेतकऱ्यांना होत नसल्याची स्थिती आहे. पावसामुळे बटाट्याच्या दर्जावर विपरित परिणाम झाला. मोठ्या आकाराचा बटाटा खूपच कमी प्रमाणात येत आहे. - सुनील अष्टेकर, व्यापारी, बेळगाव बाजार समिती.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर: कांद्यापाठोपाठ आता बाजारपेठांमध्ये बटाट्याचीही चणचण भासत आहे. उत्तर भारतात बटाटा हंगाम संपला आहे. तर कर्नाटकात अतिवृष्टीने बटाट्याचे नुकसान झाले आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून बटाट्याची आवक बहुतांशी बाजारपेठात घटत आहे. दक्षिण महाराष्ट्र उत्तर कर्नाटकात बटाट्याची आवक तब्बल ६० टक्‍क्‍यांपर्यंत घटली आहे. 

देशात गुजरात, इंदूर, आग्रा, होशियारपूर, कर्नाटकातील हसन परिसर आदि ठिकाणी बटाट्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. देशातील बाजारपेठांमध्ये या भागातील बटाटा वर्षभर जातो. व्यापारी कालावधीनुसार वेगवेगळ्या ठिकाणाहून वर्षभर बटाटा मागवत असतात. यंदा अतिवृष्टीमुळे बटाट्याचे मोठे नुकसान झाल्याने त्याचा थेट परिणाम विविध बाजारपेठांवर जाणवत आहे. 

दक्षिण महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या बेळगाव बाजारसमितीत तर बटाट्याची केवळ चाळीस टक्के आवक होत आहे. बेळगाव बाजार समितीत क्विंटलला बटाट्याचा दर २२०० रुपयांपर्यंत पोचला आहे. पावसामुळे बटाट्याचे पीक गेल्याने येत्या काही दिवसांत तरी बटाट्याची आवक खूपच कमी रहाणार असल्याचे बेळगाव बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले. 

बेळगाव बाजारपेठ ही कोल्हापूर जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील भागासाठी सोयीस्कर ठरते. गडहिंग्लज परिसरातील बटाटाही या भागात जातो. परंतु, यंदा पावसाने सगळेच गणित बिघडले. बेळगावबरोबर बेंगळूर परिसरातील बटाट्याच्या पट्ट्यात यंदा अवकाळी पावसाने बटाट्याची काढणी शक्‍य झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले. कर्नाटकात नवा बटाटा नसल्याने आता बाजारपेठांची गरज भागविण्यासाठी कोल्ड स्टोअरेजमधून बटाट्याची आवक व्यापाऱ्यांमार्फत होत आहे.

कोल्हापूरसह परिसरातील बाजारपेठांमध्ये कोल्डस्टोअरजमधील बटाटा येत आहे. तोही अगदी गरजेइतकाच येत आहे उत्तर भारतातला बटाट्याचा हंगाम जानेवारीनंतर सुरू होणार असल्याने जानेवारीपर्यंत मागणीइतक्‍या बटाट्याचा पुरवठा करण्याचे आव्हान व्यापाऱ्यांपुढे असल्याचे कोल्हापूर बाजार समितीतील बटाटा व्यापाऱ्यांनी सांगितले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून थोड्या थोड्या प्रमाणात बटाट्याची आवक घटली. नोव्हेंबर महिन्यात दररोज सुमारे चार हजार पोती बटाटा बाजार समितीत दाखल होत होता. आता हे प्रमाणे दोन ते अडीच हजार पोत्यावर आले. यामुळे कोल्हापुरातही बटाट्याचे दर वाढत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत बटाट्याचे दर पंधरा ते वीस टक्क्‍यांनी वाढत असल्याची माहिती कांदा बटाटा विभागातून देण्यात आली.

प्रतिक्रिया

सध्या उत्तर भारतातील हंगाम संपला आहे. यामुळे बटाटा आवक घटली आहे. जानेवारीनंतरच या भागातून बटाट्याची आवक होईल. तो पर्यंत बटाटा कमी प्रमाणात येणार आहे - मनोहर चूग, कांदा बटाटा व्यापारी, कोल्हापूर बाजार समिती

ऑक्टोबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे बटाट्याचे नुकसान झाले आहे. यामुळे यंदा आमच्या भागातून अगदी नाममात्र प्रमाणात बटाटा बाजारपेठेत जात आहे. - बाबूराव पाटील, कवळीकट्टी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com