पुणे जिल्ह्यात भात उत्पादन घटण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः दोन ते तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील भात पट्ट्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले असून, भात उत्पादनात सुमारे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.  

जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे भात उत्पादक तालुके म्हणून ओळखले जातात. यंदा पश्चिम भागात उशिराने पाऊस झाला. परिणामी भात लागवडीही उशीराने झाल्या होत्या. भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांच्या पश्चिम भागात भाताचे सरासरी क्षेत्र ७२ हजार ९५३ हेक्टर आहे. त्यापैकी ५७ हजार ८१७ हेक्टरवर म्हणजेच जवळपास ७९ टक्के क्षेत्रावर भाताची पुनर्लागवड झाली होती. यात सर्वाधिक क्षेत्र इंद्रायणी या वाणाचे होते. यंदा अनेक भात उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन खरिपाची तयारी केली होती.

परंतु, पीकवाढीच्या आणि काढणी करण्याच्या अवस्थेत असताना जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पीक निसवण्याच्या अवस्थेत असताना अनेक ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव झाला. त्याचाही परिणाम पिकावर झाला. नुकसान झालेल्या भात पिकाचे पंचनामे करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी अधिक नुकसान झाले नाही, तेथील भात पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. पावसामुळे झालेले नुकसान पाहता अनेक ठिकाणी भात पिकाच्या उत्पादनात घट येत असल्याचे चित्र आहे.

 प्रतिक्रिया  यंदा मी चार एकरांवर भात लागवड केली होती. ऐन काढणीच्या अवस्थेत असताना पिकाचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात ३०-४० टक्के घट येण्याची शक्यता आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.   - बजाबा मालपोटे, शेतकरी, आंदरमावळ, ता. मावळ.

अनेक भागांत तयार झालेले भात पीक पावसामुळे लोळले. त्यामुळे भाताच्या दाण्याची प्रत खालावली. परिणामी उत्पादनात घट होईल. - डॉ. नरेंद्र काशिद, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ, पुणे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com