परभणी जिल्ह्यात रब्बीतील पेरणी क्षेत्र पोचले एक लाख हेक्टरवर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी  ः जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात पाऊस झाला. परिणामी जमिनी तयार नसल्यामुळे यंदा रब्बी पेरणी रखडत चालली आहे. अजून प्रस्तावित पेरणी क्षेत्राच्या तुलनेत निम्म्या क्षेत्रावरदेखील पेरणी झालेली नाही. बुधवारपर्यंत (ता. २७) १ लाख ४ हजार ७३६ हेक्टर (३७.७६ टक्के) क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. मानवत तालुक्यात सर्वाधिक ८४.९१ टक्के क्षेत्रावर तर पालम तालुक्यात सर्वात कमी ५.१७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात ज्वारीची १ लाख ५९ हजार ७८, गव्हाची ३० हजार ४७६, हरभऱ्याची ५३ हजार २६४, जवसाची १ हजार १९९, सूर्यफुलाची १ हजार ९३ हेक्टर मिळून एकूण २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्यात साधारणतः सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते आॅक्टोबर अखेरपर्यंत ज्वारी, करडई, हरभरा या पिकांची पेरणी केली जाते. १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत गव्हाची पेरणी उरकली जाते. 

परंतु यंदा सप्टेंबर, आॅक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस पाऊस सुरू होता. त्यामुळे सोयाबीनची सुगी खोळंबली होती. त्यामुळे यंदा रब्बीची पेरणी देखील लांबली. अनेक शेतकऱ्यांनी मूग, उडीद या पिकांच्या काढणीनंतर वेळेवर पेरणी केली. परंतु पावसामुळे उगवण व्यवस्थित झाली नाही. पाणी साचून राहिल्याने पिकांची वाढ खुंटली. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. पाऊस उघडल्यानंतर तणकटाची वाढ झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे जिल्ह्यात यंदा रब्बी पेरणी अजूनही रखडत चालली आहे. 

बुधवारपर्यंत एकूण १ लाख ४ हजार ७३६ म्हणजेच ३७.७६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ४५.७६, गव्हाची ११.४२, हरभ-याची २९.५६, करडईची ५.५५, जवसाची १ टक्का क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सेलू, मानवत तालुक्यात पेरणीक्षेत्राने ८० टक्क्यांचा, जिंतूर तालुक्यात पेरणी क्षेत्राने ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. सोनपेठ, गंगाखेड तालुक्यातील पेरणी क्षेत्र ४५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. परभणी, पूर्णा तालुक्यातील पेरणीक्षेत्र ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे. पाथरी, पालम तालुक्यातील पेरणी क्षेत्र २० टक्क्यांच्या आतच आहे.   

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक  सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
ज्वारी    १,५९,०७८  ७२,७८३ ४५.७५
गहू  ३०,४७६ ३४८१ ११.४२ 
हरभरा ५३,०६४ २०,९९७ ३९.५६
करडई २५,२०९ १४०० ५.५५
जवस   ११९९ १२ १.००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com