पुणे विभागात रब्बीत पावणेसात लाख हेक्टर क्षेत्र राहिले नापेर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा रब्बी पेरणीवर परिणाम झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी उशिराने पेरणीस सुरुवात झाली. त्यातच प्रतिकूल हवामानामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पुणे विभागात रब्बीत सहा लाख ८८ हजार ३६६ हेक्टर म्हणजेच ३९ टक्के क्षेत्र नापेर राहिल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

चालू वर्षी पुणे विभागात चांगला पाऊस झाला होता. यामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज होता. त्यानुसार कृषी विभागानेही नियोजन केले होते. मात्र, सप्टेबर व आॅक्टोबरमध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पेरणीसाठी पुरेसा वाफसा न मिळाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळले. नोव्हेबर, डिसेंबरमध्येपोषक हवामान नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा रब्बी पिकांच्या पेरणीऐवजी कांदा लागवडीकडे वळवला. त्यामुळे रब्बी हंगामात कांद्याच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. विभागात रब्बीचे सरासरी क्षेत्र १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टर आहे. त्यापैकी १० लाख ९२ हजार ६६९ हेक्टर म्हणजेच ६१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सध्या नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पिक पोटरी अवस्थेत असून अल्प प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यावर कृषी विभागाने शेतीशाळेचे नियोजन करून शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. गहू पिकास पोषक वातावरण असले पेरण्या अंतिम टप्यात आल्या आहेत. हरभरा पिके वाढीच्या अवस्थेत असून त्यावरही रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. 

पुणे जिल्ह्यातही रब्बी ज्वारीची एक लाख ५२ हजार २४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र, त्यावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून उपाययोजना सुचविण्यात येत आहेत. मका पिकाची पेरणी चालू आहे. मात्र, पेरणी झालेल्या मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

सोलापूरमध्ये ज्वारी पीक चांगल्या अवस्थेत असले तरी प्रतिकूल हवामानामुळे काही प्रमाणात रोग व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. गहू, हरभऱ्याची पेरणी अंतिम टप्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

जिल्हानिहाय पेरणी स्थिती (हेक्टर)
जिल्हा   सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र नापेर क्षेत्र
नगर  ६,६७,२६१   ४,१२,०४१ २,५५,२२०
पुणे  ३,९१,८९७   २,१२,०७१ १,७९,८२६
सोलापूर ७,२१,८७७ ४,६८,५५७ २,५३,३२०
एकूण १७,८१,०३५ १०,९२,६६९ ६,८८,३६६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com