पुणे जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी थेट बियाण्यांचा वापर

मी दरवर्षी कांद्याची पाच ते सहा एकरांवर लागवड करतो. यंदा तीन ते चार एकरांवर कांद्याची लागवड केली आहे. मात्र, मी मजुरांद्वारे रोपे तयार करून कांद्याची लागवड केली आहे. आता कांद्याचे दर वाढल्यामुळे आमच्या भागात काही शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी थेट बियाण्यांचा वापर केला आहे. त्यामुळे आर्थिक खर्चातही बचत होत आहे. - भाऊसाहेब पळसकर,कर्डे, ता. शिरूर, जि. पुणे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः सप्टेंबर, ऑक्टेबर महिन्यांत झालेल्या अतिपावसामुळे जमिनीतच सडलेली कांद्याची रोपे, वाढलेले कांद्याचे दर, वाढत्या बाजार भावामुळे रोपांना आलेला चांगला भाव आणि रोपांची टंचाई यांमुळे जिल्ह्यातील शेतकरी थेट बियाण्यांचा वापर करून कांदा लागवड करीत आहेत.

बहुतांशी शेतकरी रोपवाटिका तयार करून मजुरांद्वारे कांद्याची लागवड करतात. काही शेतकरी पेरणी यंत्राच्या साह्यानेही कांदा लागवड करतात. मात्र, सध्या वाढलेले बाजारभाव आणि कांद्याची असलेली टंचाई यामुळे कमी कालावधीत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी थेट बियाण्यांचा वापर करून कांद्याचे उत्पादन घेण्यावर भर देत आहेत. यामुळे कमी वेळात आणि कमी मशागतीत कांदा लागवड होत असून, शेतकऱ्यांनी सुरू केलेला हा प्रयोग यशस्वी झाला तर खर्चातही बचत होणार आहे. सारे पाडणे, वाफे बांधणे हा खर्च टाळून शेतकरी यंत्राच्या साह्याने कांदा बियाणे पेरणी करीत आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी खरीप, लेट खरीप आणि रब्बी या हंगामात सुमारे ५० ते ६० हजार हेक्टरवर कांदा लागवड होते. यंदा रब्बी कांद्याची आत्तापर्यंत २५ हजार ४९० हेक्टरवर लागवड झाली आहे. अजूनही अनेक ठिकाणी रब्बी कांदा लागवडी सुरू आहेत. लेट खरिपात लागवड झालेला कांदा वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले गेले आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने कांदा रोपे वाया गेली, तर कांदा अति पाण्यामुळे सडल्याचे चित्र आहे. परिणामी हातात येणारे पीक वाया गेले आहे.

पुन्हा नव्याने कांदा रोप तयार करावयाचे झाल्यास त्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर कांदा लागवड होईल. हा कांदा ऐन उन्हाळ्यात काढणीस येईल. त्यातही अधिक ऊन असल्याने काही प्रमाणात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेक शेतकरी कांदा लागवडीसाठी थेट बियाण्यांचा वापर करत असल्याचे दिसून येते.  

तालुकानिहाय कांदा लागवड (हेक्टर) ः हवेली १४८२, जुन्नर ३५००, खेड १७३०, आंबेगाव ९७७, शिरूर ७६१२, बारामती ४७६५, इंदापूर १५४७, पुरंदर ३८७७. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com