‘शेतकरी सन्मान’मधून तीन हजार कोटी जमा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात आतापर्यंत तीन हजार कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. कोणत्याही मध्यस्थांशिवाय किंवा गैरव्यवहार न होता या रकमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्या आहेत. मात्र, चौथा हप्ता जमा करताना माहितीचा डेटा आणखी कडकपणे तपासून निधी दिला जाईल, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. 

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी अलीकडेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा आढावा घेतला. महसूल विभागाने कामाचा वेग वाढवावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांची बिनचूक नोंद शेतकरी सन्मान योजनेच्या पोर्टलवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आधीच्या नोंदी चुकीच्या असल्यास दुरुस्तीचे कामदेखील महसूल विभागानेच करायचे असल्याने राज्यात संबंधित जिल्हाधिकारी देखील या योजनेचा सतत आढावा घेत आहेत. 

देशातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने आपल्या १०० टक्के निधीतून ही योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना फक्त पाच एकरांपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित होती. मात्र, जून २०१९ मध्ये ही अट काढून सरसकट सर्व शेतकरी कुटुंबांना योजनेत समाविष्ट केले गेले आहे. 

‘‘राज्यात महसूल विभागाने जशा याद्या तयार करून छाननी केल्या त्यानुसार रकमा जमा होत आहेत. सहा लाख शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम पुढील काही दिवसांत जमा होऊ शकते. चौथ्या हप्त्याचा कालावधी मार्च २०२० पर्यंतचा राहील. अर्थात, महसूल विभागाकडून केंद्र शासनाला शेतकऱ्यांच्या याद्या व डेटा जसा हस्तांतरित होईल, त्यानुसार निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत राहील,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कृषी विभागाने देखील गावपातळीवर कृषी सहायकांना या योजनेला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. ‘‘शेतकरी सन्मान योनजेची गावपातळीवरील माहिती संकलित करण्याची मुख्य जबाबदारी तलाठ्याचीच आहे. मात्र, कृषी सहायक व ग्रामसेवकांनादेखील मदत करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

आतापर्यंत जमा झालेली रक्कम

हप्ता शेतकरी संख्या जमा रक्कम
पहिला    ६३ लाख ४२ हजार   १२६८ कोटी रुपये 
दुसरा ५६ लाख १० हजार   ११२२ कोटी रुपये 
तिसरा  ३१ लाख ७९ हजार ६३५ कोटी रुपये 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com