तूर विक्रीपोटी शेतकऱ्यांचे पावणेदोनशे कोटी रुपये अडकले

खरीपहंगाम तोंडावर आला असल्याने तूर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळण्याची व्यवस्था करावी. शेतकरी आर्थिक अडचणीत असून पैसे थकवून शेतकऱ्यांना अजून अडचणीत आणू नये. याबाबत मार्केटींग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. - बाळासाहेब पटारे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः शासकीय हमीभाव केंद्रांवर तूर विक्री केलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचे पावणेदोनशे कोटींपेक्षा अधिक रुपये अडकले आहेत. नाफेड व भारतीय अन्न महामंडळामार्फत आतापर्यंत सात लाख ५३ हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. खरिपाच्या तोंडावर तातडीने पैसे मिळाले नाही तर शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांकडील तूर, हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. सध्या भारतीय अन्न महामंडळामार्फत सोलापूर, चंद्रपूर, उस्मानाबाद, वर्धा, बीड या पाच जिल्ह्यांतील ४१ केंद्रांवर तूर खरेदी सुरु आहे. तसेच राज्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत नाफेड तर्फे १५७ केंद्रांवर तुरीची ५ हजार ८०० रुपये क्विंटल या हमीभावाने खरेदी सुरु आहे. खरेदीनंतर साधारण आठ ते पंधरा दिवसांत पैसे मिळणे गरजेचे असताना वेळेवर पैसै मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

आतापर्यंत केंद्रांवर खरेदी केलेल्या सात लाख ५३ हजार क्विंटल तुरीपैकी चाळीस टक्के म्हणजे तीन लाख क्विंटल तुरीचे पैसे येणे बाकी आहे. आतापर्यंत २५० कोटी वितरित केले असून अजून साधारण १७५ कोटींचे वितरण रखडले आहे. नगर जिल्ह्याचा विचार करता आतापर्यंत ११ हजार ४०४ शेतकऱ्यांकडून ७० हजार ६०५ क्विंटल तूर खरेदी झालेली आहे. त्यापैकी ४९ हजार ९७२ क्विंटल तुरीचे २८ कोटी ९८ लाख ३७ हजार ६०० रुपये वितरित केले असले तरी अजून १२ कोटी रुपये रखडले आहेत.

खरीप हंगाम वीस दिवसांवर आला आहे. त्याआधी खते, बियाणे व अन्य बाबींची खरेदी केली जाते. शेती मशागतीची कामे याच पैशांवर होतात. त्यामुळे तूर विक्रीचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर खरिपावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तुरीचे राहिलेले पैसै तातडीने शेतकऱ्यांना देण्याबाबत नाफेडकडून प्रक्रिया सुरु आहे. चार दिवसांत बहुतांश शेतकऱ्यांना पैसे वितरित होतील असे मार्केटींग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com