मराठवाड्यासह सोलापुरात वेळा अमावास्येचा उत्साह

दर्शवेळा अमावास्येनिमित्त बुधवारी शेतात पाच पांडवांची प्रतीकात्मक पूजा करण्यात आली.
दर्शवेळा अमावास्येनिमित्त बुधवारी शेतात पाच पांडवांची प्रतीकात्मक पूजा करण्यात आली.

सोलापूर  ः मार्गशीर्ष अमावास्या म्हणजे दर्श वेळा अमावास्येचा उत्सव सोलापूरसह मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत मोठ्या उत्साहात बुधवारी (ता.२५) साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने या भागातील अनेक शेतशिवारे आप्तेष्ट, नातवाईक आणि मित्रमंडळींच्या हजेरीने फुलून गेली.

दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला शेतकरी हा उत्सव साजरा करतात. रब्बी हंगामातील पिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पाच पांडवांवर सोपवण्याच्या उद्देशाने ही अमावास्या शेतकऱ्यांकडून साजरी केली जाते, अशी आख्यायिका आहे. सोलापूर, नगर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर भागात हा उत्सव हमखास साजरा होतो. 

दरवर्षी या दिवशी शेतकरी आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्रमंडळींना या पुजेला आमंत्रित करतात. पुरणपोळी, शेंगापोळी, बाजरीचे उंडे, भाकरी, मेथी, चुका, पालक, बोर, गाजर अशी मिश्रणाची भाजी, भजी, पापड, कडी यासारखे विविध पदार्थ या पुजेसाठी नैवेद्य म्हणून तयार केले जातात. शेतात ज्वारी, गव्हाच्या ताटामध्ये पाच पांडवांची प्रतीकात्मक पूजा करून त्यांना हा नैवेद्य दाखवण्यात येतो. यावेळी देवाची पूजा तर होतेच; पण नातेवाईक-मित्रमंडळींच्या गाठीभेटी आणि शिवारफेरीसह भोजनाचा आस्वाद सर्वजण मिळून घेत असल्याने एक वेगळाच उत्साह यानिमित्ताने पाहायला मिळतो.

यंदा कोरडा आणि ओल्या दुष्काळाची स्थिती शेतकऱ्यांनी अनुभवली; पण त्यातूनही वर्षाची ही परंपरा मात्र आजही कायम ठेवल्याचे चित्र अनेक भागात पाहायला मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com