पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी वनस्पती केंद्र

औषधी वनस्पतींना देश व विदेशांत वाढती मागणी आहे. मात्र, विविध कारणांमुळे ही दुर्मीळ वनसंपदा नष्ट होऊ लागली आहे. परिणामी, औषधी उद्योगांना कच्च्या मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे. देशाच्या पश्चिम विभागात अनेक महत्त्वपूर्ण व प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळतात. त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. - डॉ. दिगंबर मोकाट, सहयोगी प्राध्यापक, वनस्पतिशास्त्र विभाग.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागास पश्चिम विभागीय औषधी वनस्पती आणि माहिती केंद्राला मंजुरी मिळाली आहे. या केंद्राच्या अखत्यारीत गोवा, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, दादरा-नगर हवेली आणि दीव-दमण ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल. या केंद्राद्वारे औषधी वनस्पतींची लागवड, संवर्धन तसेच त्या अनुषंगाने आवश्यक असलेले संशोधन व विस्तार कार्य केले जाणार असून, यासाठी १ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह देशात केवळ सात औषधी वनस्पती केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. यामध्ये जाधवपूर विद्यापीठ (कोलकाता), आरआयआयएसएम जोगिंदर नगर, शेर-ए-काश्मीर विद्यापीठ, वन संशोधन केंद्र (जबलपूर), केरळा फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, आसाम कृषी विद्यापीठ (जोरहाट) यांचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट हे या केंद्राचे प्रमुख म्हणून तर विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. अविनाश अडे हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

पश्चिम विभागीय केंद्रामार्फत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना पोचवली जाईल. तसेच, विविध स्वयंसेवी संस्था, शासकीय-निम शासकीय संस्थाना सोबत घेऊन त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या केंद्रांतर्गत येणाऱ्या पाचही राज्यांमध्ये बाजारपेठेत मागणी असलेल्या व दुर्मीळ होत असलेल्या औषधी वनस्पतींच्या रोपांची निर्मिती, त्यांची शास्त्रशुद्ध लागवड, काढणीपश्चात तंत्रज्ञान, बाजारपेठ उपलब्धता, औषधी वनस्पतींच्या बागांची निर्मिती, रोपवाटिकांची निर्मिती यासाठी प्रशिक्षणे, कार्यशाळा, परिसंवाद, सहली आदींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही डॉ. मोकाट यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com