अकोला झेडपी शेतकऱ्यांना अनुदानावर देणार बीटी कपाशी बियाणे  

अकोला ः यंदा विविध संकटांमुळे हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने अकोला जिल्हा परिषद खरीप हंगामात त्यांना मदत करणार आहे. जिल्ह्यातील अल्पभूधारक, सर्वसाधारण शेतकऱ्यांना एक एकरात लागवडीसाठी लागणाऱ्या बीटी कपाशी बियाण्यावर ९० टक्के अनुदान देणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे ५ जूनपर्यंत अर्ज करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. याकरिता १५ लाख रुपयांची सुरुवातीला तरतुद करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता यात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संग्रहित छायाचित्र

यावर्षी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. दुसरीकडे जागतिक परिस्थितीचा विचार करता यावर्षी भारतातील कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यातील अल्पभूधारक सर्वसाधारण शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भोजने आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्या पुढाकाराने २०२०-२१मधील खरीप हंगामात कपाशी बीजी-२ बीटी बियाणे लागवडीसाठी ९० टक्के अनुदान योजनेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

ही योजना अकोला जिल्ह्यातील सर्वसाधारण अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असून प्रतिलाभार्थी कमाल एक एकरासाठी दोन कपाशी बियाणे पाकिटे याप्रमाणे मर्यादित राहिल. यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, नमुना ८अ उतारा, आधार कार्ड संलग्न बँक खाते पुस्तिकेच्या पहिल्या पानाची सत्यप्रत, अपंग असल्यास तसे अधिकृत प्रमाणपत्र अर्जासोबत ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला सादर करावे लागेल.

पंचायत समिती स्तरावर छाननी करून पात्र लाभार्थ्यांची यादीतून कृषी समितीद्वारे लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी अधिकृत परवानाधारक निविष्ठा विक्रेत्यांकडून संकरित कपाशी बीटी बियाणे खरेदी करून विहित खरेदी पावती कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर ९० टक्के अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. पेरणीनंतर कपाशी क्षेत्राची तपासणी करण्यात येईल. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिष अध्यक्षा प्रतिभा भोजने, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com