शेती, पूरक उद्योगावर दिला भर

कुडाळ तालुक्यातील पूर्व भागात आमचे निरुखे हे सुमारे ८८९ लोकवस्तीचे छोटेसे गाव. २०१७ च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी निवडून आले आणि ३१ डिसेंबर २०१७ रोजी मी निरुखे ग्रामपंचायतीचा कार्यभार स्वीकारला. सरपंच होण्यापूर्वी गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात मी पुढाकार घेत असल्यामुळे नेमके कोणते काम करावे लागणार आहे, याची कल्पना आली होती.
शेती, पूरक उद्योगावर दिला भर
शेतकऱ्यांना जीवामृत निर्मितीबाबत प्रशिक्षण

कुडाळ तालुक्यातील पूर्व भागात आमचे निरुखे हे सुमारे ८८९ लोकवस्तीचे छोटेसे गाव. प्रसिद्ध पीठढवळ नदी आमच्या गावशिवारातून वाहते.२०१७ च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी निवडून आले आणि ३१ डिसेंबर २०१७ रोजी मी निरुखे ग्रामपंचायतीचा कार्यभार स्वीकारला. सरपंच होण्यापूर्वी गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात मी पुढाकार घेत असल्यामुळे नेमके कोणते काम करावे लागणार आहे, याची कल्पना आली होती. गावातील बहुतांशी लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. गावशिवारात आंबा, जांभूळ, काजू, भात, कुळीथ यांसह विविध पिकांची लागवड आहे.  ग्रामविकास कामाची आखणी करताना पहिल्यांदा गावात रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले. त्याचबरोबर गावातील शेतीला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला. सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. ग्राम विकासाच्या कामासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कृषी सहायक यांना विश्वासात घेऊन नियोजनाला सुरवात केली. गावातील ५० शेतकऱ्यांचा सेंद्रिय गट आत्मातर्गंत स्थापन करण्यात आला. त्यानंतर या गटाला कृषी तज्ज्ञांमार्फत जिवामृत, दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण घेतलेल्या १०० शेतकऱ्यांना जिवामृत तयार करण्यासाठी २०० लिटरचे एक प्लॅस्टिक बॅरेल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात आले. याशिवाय ९० शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले. त्यातील ५० शेतकऱ्यांनी गांडूळ खत युनिट सुरू केले. गावातील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करणे सुलभ व्हावे यासाठी आठवडा बाजार भरत असलेल्या ठिकाणी विक्री केंद्र स्टॉल सुरू करण्यात आला. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाकडे वळविण्यासाठी गावात डेअरी सुरू करण्यात आली आहे. गावात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड करण्यात आली आहे. या वर्षी पंधराहून अधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली आहे. गावामध्ये १२ बायोगॅस युनिट कार्यरत आहेत. गावात दळणवळणाची चांगली सुविधा तयार करण्यासाठी प्रलंबित रस्त्यांची कामे सुरू आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोहोचपावती म्हणून गावाला पर्यावरण ग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार मिळाले आहेत. ग्राम विकासामध्ये उपसरपंच तुकाराम निरुखेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका स्वप्नजा पेडणेकर यांचे सहकार्य लाभते. याचबरोबरीने आमदार वैभव नाईक यांनी विविध योजना गावात राबविण्यासाठी सहकार्य केले आहे. फळबाग लागवडीला चालना आमच्या गावातून राज्यभरातील बाजारपेठेत जांभूळ विक्रीस जाते. वाढती मागणी लक्षात घेऊन आम्ही त्यामुळे जांभूळ लागवडीसाठी जनजागृती मोहीम राबविली. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते झाली. लुपिन फाउंडेशन आणि फळसंशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्या माध्यमातून गावात नव्याने एक हजार जांभळाच्या कलमांच्या  लागवडीचे नियोजन केले आहे.  गावात उत्पादित होणाऱ्या सेंद्रिय जांभळासाठी प्रमाणपत्र मिळविले आहे. ग्रामपंचायतीमार्फत नुकतेच या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.गावात आंबा, काजूचे मोठे क्षेत्र आहे. परंतु फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे प्रमाण अगदी अत्यल्प होते. हे लक्षात घेऊन आम्ही बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. याचबरोबरीने शेतकऱ्यांना पॉवर टिलर, पॉवर विडर, ताडपत्री, गवत कापणी यंत्र, कृषिपंप आदी अवजारे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. शेळी मेंढी गट, दुभती जनावरे अनुदानावर शेतकऱ्यांना देऊन दूध संकलन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. - मंजिरी रामदास करंदीकर, ९४०५६१५६९९ (सरपंच,  निरूखे, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.