कडवंची : ग्रामविकासाचे सूत्र : जल अन् मन संधारण

कडवंची : ग्रामविकासाचे सूत्र : जल अन् मन संधारण
कडवंची : ग्रामविकासाचे सूत्र : जल अन् मन संधारण

गाव आणि शेती विकासामध्ये ग्रामपंचायत हा महत्त्वाचा केंद्रबिंदू. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एकी आणि नवी दिशा देण्याची दृष्टी असेल तर निश्चितपणे ग्रामस्थांची साथ मिळतेच. असाच काहीसा अनुभव कडवंची गावामध्ये येतो.

जालना ते सिंदखेड राजा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडीक जमिनी दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून देत असताना हळूहळू द्राक्ष बागा दिसू लागल्या की ओळखायचे, कडवंची शिवार सुरू झाले. मुख्य रस्त्यावर द्राक्ष विक्री स्टॉल आणि गावामध्ये शिरताना दोन्ही बाजूला द्राक्ष बाग आणि शेततळे हे दृष्य तुम्हाला मराठवाड्यातील द्राक्ष पंढरीची ओळख पटवते. हे एके काळी पाण्याची तीव्र टंचाई असलेलं गाव. परंतु प्रयोगशील शेतकरी, खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन, पाणलोट समिती आणि ग्रामपंचायतीमधील कार्यक्षम सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नातून शास्त्रीय पद्धतीने जल, मृद संधारणाच्या कामामुळे पावसाचे पाणी चांगल्या पद्धतीने मुरले, विहिरींचा झिरपा वाढला. सोयाबीन, कापूस, तूर पिकावर अवलंबून असणारे गाव टप्प्याटप्प्याने ठिबकच्या माध्यमातून द्राक्ष, डाळिंब, पपई, भाजीपाला लागवडीकडे वळले. संरक्षित पाण्यासाठी गावात सुमारे ५०३  शेततळी, ६०१ विहिरी आहेत. गेल्या वीस वर्षांत दरडोई उत्पन्न ३,२६४ रुपयांच्यावरून १.५० लाखांवर रुपयांवर गेले. शेतकरी गटातून प्रगती माजी सरपंच गणेश जारे आणि ग्रामपंचायत सदस्य भानूदास साळवे म्हणाले की, मनरेगाच्या माध्यमातून गाव तसेच प्रत्येकाच्या शेतापर्यंत चांगले रस्ते झाले. या रस्त्याची लांबी सुमारे ४८ किलोमीटर भरते. रस्त्यांमुळे  द्राक्ष, भाजीपाला वाहतुकीला फायदा झाला, व्यापारी थेट शेतामध्ये खरेदी करत असल्यामुळे गावामध्येच अपेक्षित दर मिळतो. गावामध्ये आठ शेतकरी गट आणि २४ महिला गट कार्यरत आहे. या गटांच्या माध्यमातून पूरक उद्योगाला चालना मिळाली. यामध्ये प्रामुख्याने गाई, म्हशी, शेळीपालन, डाळ मील उद्योग, पीठ गिरणीला सुरवात झाली. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच खासगी कंपन्यांतील तज्ज्ञांची हंगामनिहाय पीक व्यवस्थापन चर्चासत्रे होतात. कृषी विज्ञान केंद्रामध्ये दर महिन्याच्या पाच तारखेला होणाऱ्या चर्चासत्रामध्ये गावातील शेतकरी सहभागी होतात. पशू लसीकरण शिबिराचे आयोजन होते. गावकऱ्यांना विविध व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे उपक्रम, निर्णयाची माहिती दिली जाते.

गावाकडून शेताकडे चला...

 • शेती आणि गावाच्या विकासाबाबत माहिती देताना सरपंच चंद्रकांत क्षीरसागर म्हणाले की, प्रयोगशील शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यातून आम्ही गेल्या २४ वर्षांत प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे वाटचाल केली. मी २०१५ पासून सरपंच आहे. ग्रामस्थ, प्रशासनाचे सर्व विभाग आणि खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून वाटचाल सुरू आहे. गाव विकासाच्यादृष्टीने रस्ते, शिवार रस्ते, वीजपुरवठा, अंगणवाडी, शाळा इमारत, ग्रामपंचायत कार्यालय, सौर उर्जेवरील मोटारपंप या कामांना प्राधान्य दिले.
 • आर्थिक प्रगतीसाठी पीक बदलाशिवाय पर्याय नव्हता. जल, मृद संधारणातून शिवारात पाणी मुरविले. संरक्षित पाण्यासाठी शेततळी घेतली. ठिबक सिंचनातूनच पाणी पिकापर्यंत नेले. गेल्या पंधरा वर्षांत द्राक्षामुळे आलेली समृद्धी गावातील लहानात लहान शेतकऱ्यांपर्यंत पोचवली. दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे बजेट मांडूनच शेती हिरवीगार होईल याचे चिंतन सुरू असते. नाले खोलीकरण, रुंदीकरणातून पाण्याची उपलब्धता वाढविण्यावर भर आहे. एकेकाळी दरवर्षी परजिल्ह्यात ऊसतोडीला ५० गाड्या जाणाऱ्या आमच्या गावात, आता राज्यासह परराज्यातील शेकडो मजुरांना वर्षभर काम मिळते. साधारणपणे ८० च्या दशकात ९५ टक्‍के गावकरी शेतात रहायला गेले. त्यामुळे द्राक्ष बागेत काटेकोर लक्ष ठेवणे सोपे झाले. द्राक्ष बागांच्या उभारणीपूर्वी गावाचे शेतीतील उत्पन्न होते ७७ लाख, ते आता कोट्यवधीच्या घरात पोचले आहे. गावाकडून शेताकडे चलण्याच्या गावकऱ्यांच्या निर्णयामुळेच ही समृद्धी आली.
 • कडवंचीतून सुरू झालेली द्राक्ष लागवड आज जालना जिल्ह्यात सुमारे १५ हजार एकरावर पोचली. एकट्या कडवंचीत सहाशे हेक्‍टरवर द्राक्ष बागा उभ्या आहेत. गावात पाऊस किती पडला, त्यातून पाणी किती उपलब्ध होणार, शेततळ्यात किती पाणी आहे, याचा ताळेबंद ठेवला जातो. त्यानुसार पीक लागवडीचे नियोजन होते. उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे गणित शेतकऱ्यांना उमगले आहे. त्यामुळे इतरत्र जाणविणारी चिंता आमच्या शिवारात नाही. १९८ मिलिमीटर इतक्‍या अत्यल्प पावसातही आम्ही पिकांचे नियोजनपूर्वक उत्पादन घेऊन दाखवले. घेतला वसा टाकायचा नाही या उक्‍तीप्रमाणे समृद्धी हवी असेल तर गावाकडून शेताकडे चला हा आमचा वसा इतरांनीही घ्यावा, असा आमचा प्रयत्न आहे.
 • शेततळ्यात मत्स्यपालन दोन वर्षांपूर्वी ‘आत्मा’च्या माध्यमातून गावातील शंभर शेततळ्यात मासे सोडण्यासाठी सहायक आयुक्‍त मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे निधी देण्यात आला होता. कडवंची गावासाठी जिल्हांतर्गत प्रशिक्षण वर्ग मत्स्य विभागाकडून राबविण्यात आला. येत्या जुलै महिन्यात शेततळ्यामध्ये मत्स्यबीज सोडण्यात येणार आहेत. यातून नवा आर्थिक स्त्रोत मिळणार आहे.

  कृषी विभागाची मोलाची साथ सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाला कडवंचीने शह देण्याचे काम केले. हे घडले केवळ गावशिवारातील जल-मृद संधारण, शेततळे, तंत्र आणि यंत्रांच्या स्वीकारामुळे. यासाठी कृषी विभागाची चांगली साथ मिळाली. आजपर्यंत गावशिवारात ९५ सामूहिक शेततळी तयार झाली. आरकेव्हीवाय अंतर्गत १७८ आणि मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत १८४  शेततळ्यांची निर्मिती झाली. बावीस शेतकऱ्यांना वैयक्‍तीक प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी शासन योजनेतून मदत मिळाली. सुमारे ६१० हेक्‍टरवर ठिबक सिंचन झाले आहे.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी नुकतीच कडवंचीला भेट देऊन शेती विकास आणि तंत्रज्ञान विस्ताराची माहिती जाणून घेतली. मंडळ कृषी अधिकारी आणि कडवंचीमधील कृषी सहाय्यक एन. बी. सौंदरे यांच्या प्रयत्नातून ‘आत्मा’ अंतर्गत सहा गट स्थापन झाले आहेत. शेती, यांत्रिकीकरणाचा विस्तार   रोजगार हमीतून २५.५० हेक्‍टरवर फळबाग लागवड.    एनएचएम अंतर्गत १२ शेडनेट उभारणी.     कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत फवारणी यंत्र, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, ट्रॅक्‍टरचलीत यंत्र, ट्रॅक्‍टरचलीत ब्लोअर, कपाशी उपटण्याचे श्रेडर, कडबा कुट्‌टी यंत्राचा पुरवठा.   सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती युनिट, नॅडेप खत निर्मिती योजनेस सुरवात.

  येत्या काळातील नियोजन

 •   स्वयंचलीत हवामान केंद्र, शीतगृहाची उभारणी.
 •   माती, पाणी आणि पान तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारणी.
 •   शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमाल विक्रीचे नियोजन.
 •   पशूपालन, बेदाणा निर्मितीला चालना.
 •   गायरानामध्ये पाणी साठवण तलावाचे नियोजन. पाणंद रस्त्यांचे डांबरीकरण.
 • ग्रामसभेतून विकासाला चालना ग्रामसेविका अलका धांडे म्हणाल्या की, गावामध्ये सुसज्ज ग्रामपंचायत आहे. यामध्ये सरपंच कार्यालय, संगणक कक्ष, सचिव कक्ष, तलाठी कक्ष आणि लहानसे सभागृह आहे. ग्रामपंचायतीच्या दारातील फलकावर ग्रामविकास योजना, कृषी विषयक योजनांची माहिती दिली जाते. ग्रामपंचायतीमध्ये दरमहा मासिक सभा होते. वर्षांतून चार वेळा ग्रामसभा होतात. त्यापूर्वी महिला सभा घेतली जाते. ग्रामसभेच्या माध्यमातून विविध कामांना चालना देण्यात येते.

  दृष्टिक्षेपात कडवंची

 •   स्थापना ः १९६१
 •   लोकसंख्या ः सुमारे ४,०००
 •   सदस्य संख्या ः ९ ( ४ पुरुष सदस्य, ५ महिला सदस्य)
 •   आरोग्य  सुविधा ः १ आरोग्य उपकेंद्र
 •   शिक्षण सुविधा ः
 • अंगणवाडी ः ३
 • शाळा ः ४ . यातील दोन वस्ती शाळा. शाळांमध्ये इ-लर्निंगची सुविधा. शाळेमध्ये विद्यार्थांसाठी पाणी पिण्यासाठी टाकीची व्यवस्था.
 •   राबविलेल्या योजना ः
 • सौरपंपाची उपलब्धता.
 • राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी वितरण 
 • चंद्रकांत क्षीरसागर (सरपंच) ९७६५७७०६०५    गणेश जारे,( माजी सरपंच) ९९२३७६६६०५ एन. बी. सौंदरे (कृषी सहाय्यक) ७४९८०८५६७४

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com