प्राथमिक निवड झाल्यानंतर गाव, संस्थेने करावयाची पूर्वतयारी

आदर्शगाव योजनेमध्ये गावाची प्राथमिक निवड झाल्यानंतर प्रथम सहा महिने हा पूर्व तयारीचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये गावाने व संस्थेने पुढीलप्रमाणे कामे पूर्ण करावीत.
प्राथमिक निवड झाल्यानंतर गाव, संस्थेने करावयाची पूर्वतयारी
villagers meeting

आदर्शगाव योजनेमध्ये गावाची प्राथमिक निवड झाल्यानंतर प्रथम सहा महिने हा पूर्व तयारीचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये गावाने व संस्थेने पुढीलप्रमाणे कामे पूर्ण करावीत.  प्रवेशानुकुल कृती कार्यक्रमाची निवड करावी. किमान दोन लाख श्रम किमतीच्या व ६ महिन्यांत श्रमदानाने पूर्ण करावयाच्या कोणत्याही एखाद्या विशिष्ट कामाची निवड करावी. हे काम गाभा किंवा बिगरगाभा कोणत्याही क्षेत्रातील असू शकेल. प्रत्येक कुटुंबांकडून एक माणूस दोन किंवा दोन माणसे यांनी कमीत कमी एक दिवस श्रमदान प्रत्येक महिन्याला करणे आवश्यक राहील. श्रमदानाचे हजेरीपत्रक संस्थेने ठेवून त्यामधून निर्माण झालेल्या मनुष्य दिवसांची, त्या कामाच्या मूल्यांकनाची माहिती ग्रामसभेत देण्यात यावी. 

 • सप्तसूत्री (नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कु-हाडबंदी, श्रमदान, लोटाबंदी (निर्मलग्राम), बोअरवेलबंदी (पाण्याचा ताळेबंद) अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी. 
 • आदर्शगाव योजनेसाठी त्रिसदस्यीय बॅंक खाते राष्ट्रीयकृत बॅंकेमध्ये उघडावे. ग्रामसभेने निवडलेला ग्राम कार्यकर्ता, संस्थेने ठरावाद्वारे कळविलेला प्रतिनिधी व संबंधित कृषी पर्यवेक्षक यांचा त्रिपक्षीय खात्यात समावेश असेल. 
 • कामासाठी देण्यात येणारी मजुरी व यंत्रसामग्रीचे वेतन त्रिसदस्यीय खात्यातून रेखांकित धनादेशाद्वारे अदा करावी.
 • ग्रामसभेने निवडलेल्या ग्रामकार्यकर्त्यास आस्थापना निधीतून मानधन देता येईल. मानधनाचा निर्णय संस्था व ग्रामसभेने घ्यावा. 
 • संस्थेने घ्यावयाचे ठराव 

 • संस्थेने लवकरात लवकर आपल्या कार्यकारिणीची बैठक बोलावून त्यात खालीलप्रमाणे ठराव सहमत करून घ्यावेत. आदर्शगाव योजनेसाठी निवड झाल्याची माहिती देऊन योजनेनुसार निधी स्वीकारणे व खर्च करण्यासाठी मान्यता व त्रिसदस्यीय बॅंक खाते चालविण्यासाठी प्रतिनिधीची नेमणूक ठरावाद्वारे करून गावाला त्याबाबत कळवावे.
 •  गाव व संस्थेची निवड झाल्याचे कार्यकारी समितीचे पत्र प्राप्त झाल्यावर गावाने व संस्थेने  रीतसर ग्रामसभा बोलावून त्यात खालील बाबतीत ठराव पारीत करून घ्यावेत. 
 •  आदर्शगाव योजनेचा निधी स्वीकारणे व खर्च करण्यासाठी मान्यता घ्यावी.
 •  त्रिसदस्यीय बॅंक खाते चालविण्यासाठी प्रतिनिधीची नेमणूक करावी. याबाबत कार्यकारी समितीस कळवावे. 
 • वरीलप्रमाणे ठराव संस्थेने कार्यकारी समितीस सुध्दा सादर करावा. त्रिपक्षीय बॅंक खाते राष्ट्रीयकृत बॅंकेत उघडून त्यांची नावे व खाते क्रमांक कार्यकारी समितीला कळवावे. 
 • यानंतर पूर्वतयारी टप्प्यातील कामे म्हणजे क्षमता बांधणी व प्रशिक्षण तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. याबाबतची प्रगती व निधीची मागणी राज्यस्तरीय कार्यकारी समितीस करावी. 
 •  त्यानंतरच पूर्वतयारी काळातील करावयाच्या कामासाठीचा पहिला हप्ता समितीकडून वितरित करण्यात येईल. 
 • संस्था व ग्रामसमिती यांनी करावयाची कार्यवाही

 • प्रवेशानुकूल कृती कार्यक्रम पूर्ण करावे. 
 •   ग्रामसभेने मंजूर केलेल्या श्रमदानातून करावयाचे काम करून घ्यावे.
 • स्थानिक कार्यकर्ते व ग्रामसमिती सदस्य, कर्मचारी इ. चे प्रशिक्षण पूर्ण करावे. 
 •  स्वयंसहाय्य गट तसेच उपभोक्ता गट संघटित करावा.
 •  गाव विकासाची कामे लोकसहभागातून उत्तमरित्या पार पाडलेली गावे, ग्रामीण विकासाबाबत प्रगतिशील गावे, ग्रामीण विकास विषयक कार्य करणाऱ्या संस्था, कृषी विद्यापीठे इत्यादी ठिकाणी स्त्रिया व पुरुष ग्रामस्थांच्या भेट-सहली आयोजित कराव्यात. 
 • आदर्शगाव व पाणलोट क्षेत्र विकास व सप्तसूत्री पालन याबाबत जाणीव-जागृती व प्रबोधनात्मक विविध कार्यक्रम आयोजित करावेत.
 •  विविध प्रकारची माहिती, पी.आर.ए. व इतर माध्यमातून गोळा करून प्रकल्प आराखडा तयार करावा.
 •  दरमहा कार्य प्रगतीचा मासिक अहवाल विहित नमुन्यात संबंधितांना सादर करावा.
 •  दर तीन महिन्यांतून ग्रामसभा आयोजित करून कार्य प्रगतीचा अहवाल ग्रामसभेत सादर करावा.
 •  जिल्हा पातळीवर बैठकांना उपस्थित राहून सक्रिय सहभाग घ्यावा.
 •  योजनेअंतर्गत निवड केलेल्या गावांमध्ये सर्व स्तरावरील कामांची व इतर आनुषंगिक माहिती, माहिती अधिकारात मागितली असल्यास संस्थेने माहिती देणे बंधनकारक आहे. त्यासाठी संस्थेने माहिती अधिकाऱ्याची नेमणूक करून कार्यकारी समितीस संपूर्ण पत्यासह कळवावी.
 •   गावांची निवड अंतिम करणे 
 •  सहा महिन्यांचा पूर्वतयारी कालावधी पूर्ण होण्याअगोदर किंवा त्यातील सर्व कामे पूर्ण झाल्यास तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प आराखड्यास ग्रामसभेची मान्यता घेऊन संस्थेने वरील सर्व कामकाजाचा अहवाल संबंधित तालुका कृषी अधिकारी व राज्यस्तरीय कार्यकारी समितीस द्यावा. 
 •  तालुका कृषी अधिकारी यांनी झालेल्या कामांची पाहणी करून अहवाल जिल्हा समितीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे द्यावा. नंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी योग्य जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन योग्य शिफारशीसह अहवाल आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीकडे सादर करावा. 
 •  या अहवालाच्या आधारे गांव व संस्था निवड अंतिम करण्याबाबत योग्य तो निर्णय राज्यस्तरीय कार्यकारी समिती घेईल. सदर निर्णय सर्व संबंधितास कळविण्यात येईल. यानंतर गावांचा प्रकल्प आराखडा अंतिम करण्याचे काम सुरू होईल. या वेळी संस्था कार्यकारी समितीच्या वतीने करार करण्यात येईल.   
 • - गणेश तांबे, ०२०-२५५३७८६६,

  ( कृषी उपसंचालक, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती कार्यालय, पुणे)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.