महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद लागवडीला चालना

सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर तालुक्यातील सुमारे दीडशेहून अधिक बचत गटांनी सुमारे सात हेक्टरवर हळद लागवड केली आहे.
Tarmaric cultivation
Tarmaric cultivation

सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर तालुक्यातील सुमारे दीडशेहून अधिक बचत गटांनी सुमारे सात हेक्टरवर हळद लागवड केली आहे. गतवर्षीच्या लागवड क्षेत्राच्या तुलनेमध्ये यावर्षी सुमारे तीन हेक्टरने वाढ झाली आहे. या लागवडीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून सुमारे चारशे महिला कुटुंबे सहभागी झाली आहेत. लहरी पाऊस, बदलते वातावरण, खर्चापेक्षा उत्पन्न कमी, मजुरांची कमतरता आदी विविध कारणांमुळे काही भागात शेती पडीक राहू लागली आहे. सहकाराच्या धर्तीवर गठित झालेल्या बचत गटांमधील महिला शेतीला पुन्हा नव्याने ऊर्जितावस्था देताना उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यातून तालुक्यातील सुमारे दीडशेहून अधिक बचत गटांनी सुमारे सात हेक्टरवर हळद लागवड केली आहे. कोकणातील हवामान हळदीच्या सेलम जातीच्या लागवडीसाठी पोषक आहे. त्यामुळे तालुक्यातील दीडशेहून अधिक बचत गटांनी या जातीची लागवड केली आहे. त्यामध्ये चारशेहून अधिक कुटुंबांचा सहभाग आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी हळद लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. सध्या हळद पिकाची चांगली वाढ झालेली आहे. बचत गटातील महिलांना गट शेतीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचा नवा आणि शाश्‍वत स्रोत सापडला  आहे. या गटाला पीक लागवड आणि व्यवस्थापनाबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा अभियान सहसंचालक नितीन माने, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, तालुका अभियान व्यवस्थापक साक्षी वायंगणकर, तालुका व्यवस्थापक अवधूत टाकवडे, अमित जोशी यांनी मार्गदर्शन केले आहे.  याचबरोबरीने प्रभाग समन्वयक प्राजक्ता कदम, ओंकार तोडणकर, मंदार पवार यांच्यासह प्रभाग संघ व्यवस्थापक यांनीही सहकार्य केले. बचत गटातील महिलांनी हळद लागवडीच्या बरोबरीने पारंपरिक आणि चारसूत्री पद्धतीने भात लागवड देखील केली आहे. यामध्ये पाचशेहून अधिक कुटुंबे बचत गटाच्या माध्यमातून सहभागी झाली आहेत. पन्नासहून अधिक गटांनी झेंडू लागवड केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com