लोकसहभागातून दुष्काळावर केली मात

कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई समस्या युवकांनी जल-मृद्संधारणासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून दूर झाली आहे. गेल्या दोन वर्षात शोषखड्डे, नाला खोलीकरण अशी जल-मृदा संधारणाची कामे झाली.
watershed management work
watershed management work

 कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई समस्या युवकांनी जल-मृद्संधारणासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून दूर झाली आहे. गेल्या दोन वर्षात शोषखड्डे, नाला खोलीकरण अशी जल-मृदा संधारणाची कामे झाली. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. विविध स्वयंसेवी संस्थांनी देखील या उपक्रमासाठी मदत केली आहे. कोठली गावाची लोकसंख्या सुमारे साडेपाच हजार आहे. गावात मध्यम व काळी कसदार जमीन आहे. गावातील अनेक शेतकरी कापूस आणि मिरची उत्पादनात अग्रेसर आहेत. परंतु २०१९ पूर्वी सलग पाच वर्षे पाऊस कमी  झाल्याने गावातील लघुप्रकल्प, तलाव कोरडे पडले. मिरचीची शेती उजाड झाली. कुणीही शेतकरी रब्बी हंगाम घेऊ शकत नव्हता. पाणीटंचाई एवढी होती की, एक वेळही सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होऊ शकत नव्हता. हे संकट दूर व्हावे यासाठी गावातील युवक एकत्र आले. त्यांनी पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशनने ज्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत, तेथे भेट दिली. लोकांशी संवाद साधला. गावातील तरुणांना ब्राह्मणपुरी (ता.शहादा, जि.नंदुरबार) येथील जलसंधारणाच्या कामात अग्रेसर असलेले अनिल पाटील, अंशुमन पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. जलसंधारणाच्या कामासाठी गावामधील ३५ युवकांनी जलमित्र टीम स्थापन केली. ब्राह्मणपुरी येथेही युवकांनी भेट देऊन कोठली गावामध्ये सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. जल-मृदा संधारणाला सुरुवात  पाणी फाउंडेशनच्या लामकानी (ता.धुळे) येथे झालेल्या कार्यशाळेत (प्रशिक्षण)  गावातील चार तरुणांनी सहभाग नोंदविला. जलसंधारणातील तांत्रिक बाबी या प्रशिक्षणातून समजून घेतल्या आणि गावशिवारात जल,मृदा संधारणाच्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला गावात ६०० शोषखड्डे तयार केले. त्यातच सांडपाणी जिरवण्याची व्यवस्था केली. नंतर गावातील नाल्याचे खोलीकरण सुरू केले. या नाल्याकाठी गावातील मिरची, कापसाखालील कमाल क्षेत्र असते. सुमारे २२ लाख रुपये वर्गणी ग्रामस्थांनी गोळा केली. तसेच ग्रामपंचायतीनेदेखील पुढाकार घेऊन १० लाख रुपये मदत दिली. नाम फाउंडेशनच्या मदतीने यंत्रणा उपलब्ध झाली. यामुळे नाला खोलीकरणाचे काम जलदगतीने झाले.  गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात नाल्यात चांगला पाणीसाठा झाला, त्याच वर्षी शिवारातील कूपनलिका, विहिरींची जलपातळी वाढली. ज्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या, त्यांनाही पाझर फुटला. गेल्या हंगामात रब्बीमध्ये शेतकऱ्यांनी पीक लागवडदेखील केली. यंदाही चांगला पाणीसाठा जलसंधारणाच्या कामांमुळे दिसत आहे. पाणी फाउंडेशनने युवकांच्या कामाची दखल घेतली. फाउंडेशनने मुंबई येथील जाहीर कार्यक्रमात गावातील जलमित्र टीमचा सत्कार केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com