ग्राम, आरोग्य अन् शेती विकासामधील ‘अन्नपूर्णा’

सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था शेती, पाणी, पर्यावरण, आरोग्य, कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकास आणि बचत गट सक्षमीकरणामध्ये दहा वर्षांपासून कार्यरत आहे.
farmers training in field
farmers training in field

सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था शेती, पाणी, पर्यावरण, आरोग्य, कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकास आणि बचत गट सक्षमीकरणामध्ये दहा वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेने ग्रामीण भागात शेतकरी गट, महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीवर भर दिला आहे.

चिखली (ता. कराड, जि. सातारा) येथील प्रमोद विष्णू सावंत हे समाजकार्य विषयातील तरुण पदवीधर. मुंबई येथे नोकरी करत असताना त्यांना सेवाभावी संस्थाच्या कामकाजाचा चांगला अनुभव आला. शालेय जीवनापासून समाजकार्याची आवड, ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरण, शेती पूरक उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांनी फेब्रुवारी, २०१० मध्ये चिखली येथे अन्नपुर्णा सेवाभावी संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत विविध प्रकारे ग्रामीण भागाचा विकास साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या कामात त्यांना शीतल सावंत (सचीव), रवींद्र सावंत तसेच सर्व संचालकांचे चांगले योगदान मिळाले आहे.  उद्योजकता विकास  संस्थेने खेरवाडी सोशल वेलफेअर असोसिएशन, निलिमा एज्युकेशन सोसायटी, बार्टी़, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या समन्वयातून सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना स्वयंरोजगार विषयक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ, दिल्ली यांच्या समन्वयाने सेंद्रिय शेती विकास, दुग्धोत्पादन आणि प्रक्रिया उदयोगाविषयी कराड तालुक्यामध्ये उद्योजकता विकास कार्यक्रम राबविला. याच बरोबरीने तेलंगणामध्ये एमईपीएमए अंतर्गत निवासी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुरू केले होते. महिला सक्षमीकरण कार्यशाळा  संस्थेने महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामध्ये महिलांविषयक कायदे व डिजिटल साक्षरता या विषयक माहिती दिली जाते. या कार्यशाळेमध्ये २५० महिला सहभागी झाल्या होत्या.अन्नपूर्णा संस्था आणि ग्रामपंचायतीच्या समन्वयातून बहुतांशी गावातील महिला बचत गट व महिला लाभार्थी यांना विविध प्रकारचे कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये विविध प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती, शिवणकाम, पिलो निर्मितीबाबत प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. संयुक्त महिला गट  संस्था, नाबार्ड तसेच विदर्भ कोकण बँक यांच्या समन्वयाने पाली, नागठाणे आणि कातरखटाव या ठिकाणी संयुक्त महिला गट तयार करून त्यांना व्यवसायाठी कर्जवाटप व व्यवसाय मार्गदर्शन करण्यात आले होते. या प्रकल्पात ४०० महिला गटांचा समावेश आहे. तसेच नाबार्ड सलग्न इ-शक्ती प्रकल्पामध्ये संस्थेने सातारा जिल्ह्यातील २०० गटांचे डिजिटायझेशन केले आहे.  गावांचे आराखडे   डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत संस्थेने सहा गावांचे आराखडे बनविले. यामध्ये गावनिहाय संपूर्ण माहिती नोंदविण्यात आली आहे. संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यातील पाच गावांमध्ये ‘यशदा’मार्फत माहिती अधिकार सप्ताहाचे आयोजन केले होते. यामध्ये पथनाट्ये व जनजागृतीवर भर देण्यात आला होता.  जैवविविधतेची नोंदणी  संस्थेने जैवविविधता मंडळ, नागपूर यांच्या समन्वयातून कऱ्हाड तालुक्यातील ४० गावांमध्ये जैवविविधता समित्या स्थापन केल्या आहेत. कऱ्हाड तालुक्यातील ६९ गावांतील लोकजैवविधता नोंदवह्या तयार केल्या आहेत. यामध्ये गावातील जैवविविधतेची सर्व माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. 

शेती आणि पूरक व्यवसायाला चालना  संस्थेच्या माध्यामातून शेती पूरक तसेच सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले जाते. यासाठी शेतकरी गटांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. याचबरोबरीने दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अभ्यास सहलींचे आयोजन केल्या जातात. या उपक्रमातून शेतकरी तसेच महिला बचत गटांनी शेतीपूरक तसेच अन्नप्रक्रिया व्यवसायांना सुरुवात केली आहे. संस्थेने परळी खोऱ्यात सेंद्रिय खपली गहू उत्पादनाला शेतकरी गटांच्या माध्यमातून चालना दिली आहे.    क्षारपड जमीन विकास  सातारा जिल्ह्यात बागायती क्षेत्रामध्ये अनियंत्रित पद्धतीने पाणी आणि रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनी क्षारपड होऊ लागल्या आहेत. या जमिनी क्षारपड होऊ नयेत यासाठी संस्थेने कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्यामध्ये जागृतीचे काम सुरू केले आहे. क्षारपड जमीन सुधारणेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच ठिबक सिंचनाच्या वापराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  

पाणलोट विकासामध्ये सहभाग  कोरडवाहू भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांच्याशी संलग्न प्रकल्प प्रशिक्षण संस्था आणि उपजीविका संस्था म्हणून वेगवेगळ्या दहा प्रकल्पांमध्ये संस्था कार्यरत आहे. सातारा जिल्ह्यात सात आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तीन प्रकल्पांचा समावेश आहे. संस्थेने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गावांचे जलयुक्त शिवार अंतर्गत कामांचे मूल्यमापन करण्याचे काम यशस्वीपणे केले आहे. 

आरोग्य शिबिरांचे आयोजन  ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य समस्या लक्षात घेऊन संस्थेने निरोगी आरोग्य हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.  संस्थेच्या माध्यमातून महिला, किशोरवयीन मुली, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरात आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले आहे. सांगली व सातारा जिल्ह्यांत स्वच्छ भारत मिशन -२ अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांच्या संदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. 

 - प्रमोद सावंत,  ९९२३२६७७५४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com