कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली किर्ती

बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण शेतीत अग्रेसर राहिले आहे. दरवर्षी गाव शिवारात कांद्याचे सुमारे साडेतीनशे हेक्टरवर तर लसणाचे चाळीस हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पंचवीस ते तीस वर्षांपासून या दोन्ही पिकांचे उत्पादन घेणारे या भागातील बहिरवाडी हे एकमेव गाव असावे.
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली किर्ती
onion cultivation

बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण शेतीत अग्रेसर राहिले आहे. दरवर्षी गाव शिवारात कांद्याचे सुमारे साडेतीनशे हेक्टरवर तर लसणाचे  चाळीस हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पंचवीस ते तीस वर्षांपासून या दोन्ही पिकांचे उत्पादन घेणारे या भागातील बहिरवाडी हे एकमेव गाव असावे. दुष्काळी पट्यातील या गावच्या परिसरात पाणलोटाची कामे झाली. कांदा, लसूण उत्पादनातील गावची किर्ती ऐकून येथे दरवर्षी हजारो शेतकरी येथे भेटी देतात. 

नगर- औरंगाबाद रस्त्यावर पूर्वेला पाच किलोमीटरवर बहिरवाडी गाव आहे. हा भाग पूर्वी तसा दुष्काळी होता. मात्र गाव शिवारात अलीकडे झालेल्या पाणलोटाच्या कामांमुळे गावाला बरकत येऊ लागली आहे. गावात साधारण तीनशे कुटुंबे आहेत. एखादा अपवाद वगळला तर बहुतेक शेतकरी कांदा उत्पादन घेतात. लसणाच्या प्रायोगिक शेतीत गावातील विष्णू जरे यांनी ओळख तयार केली आहे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कांदा-लसूण संशोधक केंद्रातील शास्त्रज्ञांसह विविध भागातील शेतकऱ्यांनी गावाला भेटी दिल्या आहेत. कांदा, लसणाची परंपरा   गावातील ज्येष्ठ शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीस वर्षापेक्षा अधिक काळ गावाला कांदा व लसूण शेतीची परंपरा आहे. दरवर्षी एकूण साधारण आठ ते दहा हजार टनांपर्यंत कांदा तर लसणाचे दीड ते दोन हजार टन उत्पादन मिळते. गावासह परिसरातील ससेवाडी, जेऊर, इमामपुर आदी गावेही या शेतीत प्रसिद्ध आहेत. कांदा, लसणाची विक्री नगर, घोडेगावसह अन्य बाजार समित्यांमध्ये केली जाते. काही वेळा व्यापारीही गावात खरेदीसाठी येतात. कांदा- लसणाच्या शेतीतून गावातील अर्थकारण दरवर्षी कोट्यावधीच्या घरात जाते. गेल्यावर्षी राज्यात व देशातही कांद्याला मागणी आणि दरही चांगला राहिला. गावाला कांदा विक्रीतून सुमारे वीस कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. कांद्याचे दर पडले तर मात्र  उत्पादकांना आर्थिक फटका सोसावा लागतो. 

बीजोत्पादन आणि रोपवाटिका  साधारण डिसेंबर, जानेवारीत कांद्याला बऱ्यापैकी दर असतो हा कांदा उत्पादकांचा अनुभव. त्यामुळे बहिरवाडी शिवारात लेट खरीप लागवडीवरच अधिक भर असतो. मृगाचा पाऊस पडला की मुगाची पेरणी केली जाते. त्याच वेळी कांदा रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार केली जाते. अनेक शेतकरी स्वतःच रोपे तयार करतात. येथे अनेक वर्षे कृषी साहाय्यक म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब आठरे यांच्या प्रयत्नातून रोपे तयार करून त्याची लागवड करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यातून उत्पादनात वाढ झाली. पूर्वी एकरी साधारण सात ते नऊ टन कांदा उत्पादन व्हायचे. आता ते योग्य व्यवस्थापन व अनुकूल हवामानातून बारा ते पंधरा टनांपर्यंत पोचले असल्याचे आठरे यांनी सांगितले. लसणाचेही येथे कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत ग्राम बीजोत्पादन घेतल्याचे मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे यांनी सांगितले.  

लसणाच्या बियाण्याची सर्वदूर विक्री बहिरवाडीत लसूण उत्पादक कांद्याच्या तुलनेत कमी आहेत. येथे साधारण ऑक्टोबरमध्ये लागवड केली जातो. साधारण पंधरा हेक्टरवर लसूण बीजोत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रासह देशातील विविध भागातून येथील लसणाच्या बियाण्याला मागणी असते. मागणीनुसार शेतकरी बियाणे पॅकिंग करून पाठवतात.    शेकडो मजुरांना रोजगार   बहिरवाडीतील माणसे कधीकाळी रोजगारासाठी अन्य गावी जायची. आता गावानेच कांदा- लसणाच्या शेतीतून शेकडो मजुरांना रोजगार दिला आहे. लागवडीसाठी येथे दोन ते अडीच महिने विविध भागातून  पाचशेपेक्षा अधिक मजुरांची येथे नियमित रेलचेल असते.   

जलसंधारणातून गावाला आली बरकत  नगर तालुक्यातील बहुतांशी दुष्काळी भागात हुलगे, बाजरी, तूर, मूग, ज्वारी अशी पावसावर अवलंबून असलेली पिके घेतली जातात. या भागाचे तत्कालीन लोकप्रतिनिधी माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या प्रयत्नातून १९७९ साली जलसंधारणाची कामे झाली. त्यानंतरही वेळोवेळी सिमेंट बंधारे, नाला बंडीग, गतिमान पाणलोट, बांधबंदिस्ती, नाला रुंदीकरण, जलयुक्त शिवार अभियानातून विविध कामे झाली. गावच्या शिवारातून वाहून जाणारे पाणी गावकऱ्यांनी एकोप्याने अडवले. त्यामुळे पाणी उपलब्ध झाले आणि गाव शिवाराला बरकत आली. पडीक जमीन वहितीखाली आली. कोरडवाहू पिके घेणारे शेतकरी कांदा, लसणासारख्या पिकांकडे वळले असे सरपंच विलास काळे यांनी सांगितले. 

बहिरवाडी दृष्टिक्षेपात  

 •   भौगोलिक क्षेत्र- ९७३ हेक्टर
 •   वनविभागाचे क्षेत्र- २५० हेक्टर
 •   पेरणीयोग्य क्षेत्र- ६५६ हेक्टर
 •   रब्बीत लसूण लागवडीखालील क्षेत्र- ४१ हेक्टर 
 •   शेतकरी संख्या- सुमारे ७०
 •   खरिपातील कांदा लागवड -   ८ हेक्टर
 •   रब्बी कांदा लागवडीचे क्षेत्र -  ३२० हेक्टर 
 •   शेतकरी संख्या -  सुमारे ३९५
 • आम्ही गावांत पाणलोट, जलसंधारणाची कामे करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे गावशिवार पाणीदार झाले. त्याचा कांदा, लसूण शेतीला फायदा होत आहे. गावाची त्यातूनच वेगळी ओळख निर्माण झाली.  — विकास काळे, सरपंच, बहिरवाडी 

  कृषी विभागाने गावात सातत्याने विविध उपक्रम राबवून कांदा, लसूण शेतीला चांगली चालना दिली आहे.   — शिवाजीराव जगताप,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

  आमच्या गावाने अनेक वर्षांपासून कांदा, लसणाच्या शेतीतून जिल्ह्यात नाव तयार केले आहे याचा आम्हांला अभिमान आहे. गावाचा अन्य शेतकऱ्यांनी आदर्श घेऊन कांदा व लसूण लागवड सुरू केली आहे.  — विष्णू जरे, ९७६४०३८२५५ लसूण उत्पादक, बहिरवाडी   

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.