
बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि ग्रामविकासामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लोक सहभागाच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्थांनी चांगली साथ दिली आहे. धुळे जिल्ह्यातील बारीपाडा हे निसर्गरम्य गाव हे शाश्वत ग्रामविकासाची पंढरी समजले जाते. गावाला दिशा देण्याचे काम प्रयोगशील शेतकरी चैत्राम पवार यांनी केले आहे. एक हजार लोकवस्तीच्या या गावाला चांगले भौगोलिक क्षेत्र लाभले आहे. गावकऱ्यांनी शेती, जंगल आणि पर्यावरण जपले आहे. आता गावाने सौरशक्ती चळवळ सुरू केली आहे. गावातील विविध उपक्रमांना विविध स्वयंसेवी संस्थांची चांगली साथ आहे. पर्यावरण सुविधा केंद्र बारीपाडा गावाने १९९२ पासून विविध प्रयोग करण्यास सुरूवात केली. या ग्रामविकासाच्या चळवळीची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्याने देशभरातील अभ्यासक, तज्ज्ञ, शेतकऱ्यांच्या भेटी वाढल्या. त्यामुळे २०१४ मध्ये गावातील पर्यावरण उपक्रमांची माहिती करून देणारे पर्यावरण सुविधा केंद्र उभारले गेले. आदिवासी विकास विभागाने यासाठी २५ लाखांचा निधी दिला. या केंद्राला पाणी पुरविण्यासाठी सौर प्रणाली बसविण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्याला देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशनने मदत केली. संस्थेने २०१४ मध्ये दोन अश्वशक्तीचा पहिला सौर पंप गावात बसविला. हा पंप गावकऱ्यांना प्रेरणादायी ठरला. तेथून पुढे बारीपाडा आणि आजूबाजूच्या गावात सौरशक्ती चळवळीची बीजे रोवली गेली, असे चैत्राम पवार सांगतात. सौरऊर्जेच्या दिशेने प्रवास सौरऊर्जेचे महत्त्व शेतकऱ्यांना कळल्यामुळे गावाने याचा पाठपुरावा करण्याचे ठरविले. आदिवासी विकास विभागाने गावात सौर गृहदीप योजना आणली. त्यातून २०० घरांवर ७५ वॅटचे सोलर पॅनेल लावले गेले. प्रत्येक पॅनलवर १२ वॅटची बॅटरी बसवली. त्यातून घरात चार दिवे दिले गेले. या योजनेमुळे लोडशेडिंग असतानाही गावात वीज मिळू लागली. ग्रामविकास चळवळींना पाठिंबा देणारे अहमदाबादमधील सुनील त्रिवेदी यांनी अहमदाबादमधील मिनाक्षी मेहता फाउंडेशन या संस्थेशी जोडून दिले. या संस्थेने शेतकरी गटांना ३२ सौर पंप पुरविण्याचा निर्णय घेतला. तांत्रिक उभारणी सहज सोलर कंपनीने केली. पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी पाणी पुरवण्याकरीता सौरशक्तीचा वापर करण्याचा संकल्प गावाने सोडला. सहा शेतकऱ्यांचे २२ गट तयार झाले. शासनाच्या अटल सौर कृषीपंप योजनेची मदत या उपक्रमाला मिळाली. पंचक्रोशीत पोहोचली सौर ऊर्जा चैत्राम पवार यांनी स्वतःच्या गावाबरोबरीने आजूबाजूच्या गावांनाही सौर प्रकल्प योजनेत आणण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत ते म्हणाले की, गावामध्ये उद्योग कंपनीच्या सीएसआर फंडातून मोफत सौर प्रकल्प मिळणार होता. गावाने पाच ते दहा अश्वशक्तीची साधने खरेदी करावी, असा सल्ला आम्हाला दिला होता. मात्र, आम्ही त्याला नकार दिला. मोठ्या मोटारी वापरल्या तर शेतीसाठी खूप पाणी उपसले जाईल, पाणी साठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आम्ही २ ते ३ अश्वशक्तीच्या मोटारींची निवड केली. बारीपाड्यात पहिल्या टप्प्यात सौरशक्ती चळवळीतून शेतीसाठी ११ युनिट तर पिण्याच्या पाण्यासाठी दोन सोलर युनिट उभारले गेले. याचबरोबरीने मापलगाव, तावरीपाडा, मोहगाव, कालदरमध्ये सोलर युनिट बसविण्यात आले. शेतकऱ्यांच्या शिवारात वीज पुरवठा नसतानाही भरपूर पाणी मिळू लागले. गावपरिसरात ट्रॉलीवरील फिरते सोलर युनिट कार्यरत आहे. या युनिटला ट्रॅक्टर जोडून कोणत्याही शेतात नेले की बिनाविजेचा पाणी उपसा होतो. ५०० रुपये भाडे देवून ही ट्रॉली शेतकऱ्यांना वापरता येते.
संस्थांच्या सहभागातून विविध उपक्रम
- चैत्राम पवार, ९८२३६४२७१३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.