ग्राम पर्यटन, पर्यावरण संवर्धनातील निसर्गयात्री

गेली पंधरा वर्षे रत्नागिरी येथील निसर्गयात्री ही स्वयंसेवी संस्था कोकणातील जैवविविधता, ग्रामीण परंपरा, चालीरिती यांचा शोध घेऊन त्यांचे संरक्षण आणि संवर्धनाबाबत कार्यरत आहे. ग्रामीण भागात शाश्‍वत पर्यटन, कृषी विकासातून रोजगारनिर्मितीला चालना देण्याचे काम संस्थेतर्फे सुरू आहे.
nature conservation
nature conservation

गेली पंधरा वर्षे रत्नागिरी येथील निसर्गयात्री ही स्वयंसेवी संस्था कोकणातील जैवविविधता, ग्रामीण परंपरा, चालीरिती यांचा शोध घेऊन त्यांचे संरक्षण आणि संवर्धनाबाबत कार्यरत आहे. ग्रामीण भागात शाश्‍वत पर्यटन, कृषी विकासातून रोजगारनिर्मितीला चालना देण्याचे काम संस्थेतर्फे सुरू आहे.

साधारणपणे २००५ मध्ये निसर्गयात्री या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात झाली. सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, प्रणव परांजपे, राहुल सोहनी, प्रदीप डिंगणकर, सौ. उज्ज्वला विध्वंस, ओंकार रानडे यांनी एकत्र येऊन कोकणच्या निसर्गातील वेगळेपण जपणाऱ्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गोष्टी लोकांसमोर आणण्याचे काम सुरू केले. त्याची सुरुवात कोकणातील गड, कोट, किल्ले यांच्या स्केल मॉडेल (कृत्रिम प्रतिकृती) बनविण्यातून झाली. गेल्या चौदा वर्षांत सुमारे तीस गटांमधील पाचशेहून अधिक तरुणांनी गड, किल्ल्यांचा अभ्यास करून त्याच्या प्रतिकृती बनवत इतिहास लोकांपुढे आणण्याचे काम केले आहे.

कोकणातील ३६० पक्ष्यांची नोंद  कोकण हा विविध वनस्पतींनी नटलेला प्रदेश. त्यामुळे या विभागात विविध प्रकारचे पक्षी वास्तव्य करतात. हिवाळा, पावसाळा सुरू झाला, की काही पक्षी स्थलांतर करून कोकण किनारपट्टीवर येतात. संस्थेतर्फे अशा पक्ष्यांची माहिती संकलित केली जाते. संस्थेच्या सदस्यांनी कोकणातील ३६० पेक्षा अधिक पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक किंगफिशर, धनेश, समुद्र गरुड यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आढळत असल्याचे सुधीर रिसबूड यांनी सांगितले. जैवविविधता जपण्यासाठी प्रयत्न  कोकणातील कातळ तसेच डोंगरदऱ्यांमध्ये विविध कातळफुले पावसाळ्यात उगवतात. त्याची माहिती संकलित करून त्याचे वैज्ञानिक महत्त्व जाणून घेतले जात आहे. रत्नागिरी, राजापूर तालुक्यांत आतापर्यंत १५० विविध प्रकारची कातळफुले आणि १०५ फुलपाखरे शोधण्यात संस्थेला यश आले आहे. कातळचित्रांचा शोध  कोकणातील कातळांवर वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या चित्रकृती पाहायला मिळतात. निसर्गयात्रीने जिल्ह्यात यासाठी शोध मोहीम सुरू केली. यामध्ये पुरातत्त्व विभागाची महत्त्वाची साथ मिळाली. आतापर्यंत ७२ गावांतील १२५ ठिकाणी १६०० कातळचित्रे शोधण्यात संस्थेला यश आले. अश्मयुगीन कालखंड, समाजजीवन, भौगोलिक परिस्थिती, वातावरण यावर प्रकाश टाकणाऱ्या आकृत्या कातळावर रेखाटलेल्या आहेत.  कातळचित्रांमध्ये अवाढव्य प्राणी, पक्षी, भौमितिक रचना आढळून येतात. कोकणात न आढळणारे प्राणी या चित्रातून दिसून आले. चौकोनी उभ्या असलेल्या भौमितिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्या आकाराने खूप मोठ्या असून, सर्वच्या सर्व रचना जमिनीवर आडव्या स्वरूपात आहेत. कशेळी, बारसू, साखरकोंड, उक्षी, देऊड येथील चित्ररचना देशातील कातळ चित्रामध्ये सर्वांत मोठी आहे. यामध्ये द्वितीय जांभ्या दगडातील आकृती चुंबकीय विस्थापन दर्शविणाऱ्या आहेत. या संशोधनातून मानवी उत्क्रांतीचा शोध लागू शकतो, असा विश्‍वास रिसबूड यांनी व्यक्त केला. कातळचित्रांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी संस्थेने पावले उचलली. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करताना गावातील लोकांनाही माहिती दिली जात आहे.

ग्राम विकासाला चालना  कातळचित्र हे देशातीलच नव्हे तर परदेशातील अनेक संशोधकांना न उलगडणारे कोडे आहे. रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथील कातळचित्र पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. उक्षीतील ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर कातळ चित्रांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली. कातळचित्राला बाजूने दगड लावून संरक्षित केले . गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी चाळीस हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. या माध्यमातून गावामध्ये पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. स्थानिकांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे.  उक्षीतील ही कातळचित्रे गावच्या विकासाला कारणीभूत ठरली. 

चवेदेऊड येथे संग्रहालय कोकणातील कातळ चित्रांचे महत्त्व, ठिकाणांची माहिती, त्याच्या प्रतिकृती यांचे संग्रहालय रत्नागिरी तालुक्यातील चवेदेऊड येथे उभारण्याचा निर्णय निसर्गयात्री संस्थेने घेतला आहे. त्यासाठी सुमारे १८ लाख रुपयांचा खर्च आहे. ही इमारत जुन्या पद्धतीने म्हणजेच दगड, विटा, गूळ, चुना यांचा वापर करून उभारली जाणार आहे. यासाठी रत्नागिरीतील उद्योजक दीपक गद्रे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. आतापर्यंत ५० टक्के काम झाले असून, निधी गोळा करण्यात येत असल्याचे रिसबूड यांनी सांगितले.

औषधी वनस्पती,मधमाशीपालनाला चालना कातळावर आढळणाऱ्या जैवविधतेमध्ये वैज्ञानिक महत्त्व दडलेले आहे. कातळावरील गवत हे आंबा, काजू लागवडीसाठी पोषक असल्याचे आढळून आले आहे. देवाचे गोठणे येथील बागायतदार नीलेश आपटे यांनी याचा अनुभव घेतला. याचबरोबरीने शेतकऱ्यांना वनौषधी लागवड तसेच मधमाशीपालनाबाबत मार्गदर्शन केले जाते. काही शेतकऱ्यांनी फळबागेत वनौषधींची लागवड केली आहे.

कासव संवर्धन आणि पर्यटन प्रकल्प  रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्र किनारी कासव अंडी देण्यासाठी येत असल्याची माहिती संस्थेला मिळाली. या कासवांचे संवर्धन आणि सुरक्षेसाठी निसर्ग यात्रीचे सदस्य प्रदीप डिंगणकर यांनी वन विभागाच्या सहकार्याने कासव संवर्धन मोहीम हाती घेतली.  कासवांच्या अंड्यांना प्राणी आणि मानवापासूनही धोका असतो. कासव आणि अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी रात्र-रात्र जागून पहारा दिला जातो. ऑलिव्ह रिडले या कासवाच्या जातीला समुद्रातील सफाई कामगार म्हणून ओळखले जाते. २०१६ साठी गावखडी येथे संवर्धन मोहीम सुरू झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. आतापर्यंत संस्थेच्या सदस्यांनी लोकसहभागातून चार हजार पिले सुरक्षितरीत्या समुद्रात सोडली आहेत. कासवांच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी नैसर्गिक पद्धतीने हॅचरी तयार केली जाते. पर्यटनाची जोड  गावखडी येथे कासव संवर्धनाचा प्रकल्प स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभागाच्या सहकार्याने यशस्वीपणे सुरू आहे. शासनाकडून गावखडी किनारा कासवांसाठी संरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाला पर्यटनाची जोड देण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. या किनाऱ्यावर पर्यटकांचे वास्तव्य वाढावे यासाठी जैवविविधता केंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामस्थ आणि वन विभागाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामध्ये कासवांच्या २५२ प्रजातींची मॉडेल्स आणि माहिती उपलब्ध असणार आहे. पर्यटकांसाठी ग्रामीण परंपरांचे कार्यक्रमही आयोजित करण्याचे नियोजन संस्थेने केले आहे. या उपक्रमातून ग्रामीण पर्यटनाला चालना मिळेल, तसेच गावकऱ्यांना आर्थिक स्रोत उपलब्ध होणार आहे.

‘हेरिटेज टुरिझम’ संकल्पना

ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कोकणामध्ये कृषी, जल पर्यटनाला चालना देणे शक्य आहे. संस्थेच्या माध्यमातून ‘हेरिटेज टुरिझम’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यातून रोजगार निर्माण होणार असून, त्यासाठी स्थानिक तरुणांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याचे नियोजन संस्थेने केले आहे.    - सुधीर रिसबूड, ९४२२३७२०२०  (सदस्य, निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com