शिक्षण, कृषी, ग्रामविकासामध्ये ‘समता प्रतिष्ठान’ची साथ

नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुष्काळी तालुक्यात शिक्षणातून सामाजिक परिवर्तन हा विचार घेऊन समता प्रतिष्ठान ही संस्था ३४ वर्षांपासून कार्यरत आहे.
watershed development work
watershed development work

नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुष्काळी तालुक्यात शिक्षणातून सामाजिक परिवर्तन हा विचार घेऊन समता प्रतिष्ठान ही संस्था ३४ वर्षांपासून कार्यरत आहे. संस्था शिक्षण, ग्रामविकास, पर्यावरण जागृती, रोजगारनिर्मिती आणि कृषी क्षेत्रात काम करत आहे. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणून मूकबधिरांना शिक्षणासोबत रोजगार शिक्षण देऊन संस्थेने त्यांना पाठबळ दिले आहे.

येवला तालुक्यातील अर्जुन कोकाटे यांनी ३ जानेवारी १९८७ रोजी परिसराची गरज लक्षात घेऊन शिक्षण, ग्रामविकासातून समाज प्रगतीचा ध्यास घेत समता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना केली. स्थापनेपासून सामजिक उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले. प्रचलित शिक्षणाबरोबरच निरंतर लोकशिक्षण, कृषिनिष्ठ शिक्षण, विषमतेविरुद्ध शिक्षण, आत्मभान व आत्मविश्‍वास वाढविणारे शिक्षण आणि ग्रामोद्योगावर आधारित शिक्षण अशी पाच उद्दिष्टे निश्‍चित करून समता प्रतिष्ठान येवले तालुक्यात शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या सर्वच शाळांमधील मुलांच्या आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक परिसराच्या वैशिष्ट्यांना अनुसरून जाणिवपूर्वक काम केले जाते. यास लोकसहभागाची चांगली साथ मिळाली आहे.        शिक्षण कार्य हाती घेतल्यानंतर कुसूर या गावात संस्थेने जून १९८७ मध्ये क्रांतिवीर महात्मा फुले माध्यमिक विद्यालय या नावाने पहिली शाळा काढली. त्यानंतर चिचोडी बु. येथे आदर्श माध्यमिक विद्यालय, सुरेगाव येथे १९९१ मध्ये समता माध्यमिक विद्यालय, २००१ मध्ये ठाणगाव येथे राजा शिवाजी माध्यमिक विद्यालय सुरू केले. त्यामुळे ग्रामीण भागात मुलीही शिक्षण घेऊ लागल्या. यासह येवले शहरात सावित्रीबाई फुले बाल मुक्तांगण आणि जिजाऊ बाल मुक्तांगण नावाने बालकांसाठी सुविधा उभारली आहे. संस्थेच्या विविध शाळांच्या कार्यक्षेत्रात सुमारे २५ गावांचा समावेश असून, बालवाडीपासून ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. मूक-बधिर मुलांसाठी निवासी शाळा समता प्रतिष्ठानने ११ जून १९९५ रोजी मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालय ही दिव्यांग मुलांची शाळा सुरू केली. त्यास नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अवघ्या ५ मुलांवर सुरू झालेल्या शाळेत आज १२० विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेत आहेत. १२० कर्ण-बधिर मुलांपैकी फक्त ४० निवासी मुलांसाठी शासनाचे अनुदान मिळते. अत्यल्प अनुदानामुळे या विशेष मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षणात सातत्याने अडथळे आले. मात्र संस्थेने सर्वांगीण पुनर्वसन या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी संघर्ष सुरूच ठेवला. त्यांच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी डॉ. जगन्नाथ वाणी, सचिन तेंडूलकर, जीवन कायंदे यांसारख्या समाजातील दानशूर हात पुढे आले. जलसंधारण कार्यात सहभाग  येवला तालुक्यातील अनेक गावे दुष्काळी आहे. त्यामुळे पाणीसाठा मर्यादित असतो. ही अडचण ओळखून संस्थेने गेल्या तीन वर्षांत अभ्यास करून जलसंधारणाची कामे हाती घेतली. माती बंधारे फुटले असल्याने पाणी गळती होत होती. त्यास दगड, मातीचा वापर करून विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून विनाखर्च बंधाऱ्याची गळती बंद केली. यामध्ये माजी विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग होता. आत्तापर्यंत सहा बंधाऱ्यांच्या पुनर्बांधणीचे काम झाल्याने पावसाचे पाणी अडविण्याच्या कामात यश आले. त्यामुळे परिसरात पाणीसाठा वाढला. यामुळे शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध झाली. कुसूर, सुरेगाव, चिचोंडी येथे जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. 

अपंगांना दिले आत्मभान  दिव्यांगांनी आपल्यातील अपंगत्वावर मात केल्याखेरीज त्यांचे आयुष्य आत्मनिर्भर होणार नाही. त्यांना आत्मभान देण्यासाठी शिक्षणाबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण देणे ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. या अनुषंगाने दिव्यांगांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. जून २०१८ पासून पैठणी विणकाम, संगणक प्रशिक्षण, शिलाई काम, वेल्डिंग, बेकरी, प्रिंटिंग प्रेस, मोबाईल दुरुस्ती व सेंद्रिय शेती आदी विषयांवर व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अनेकजण स्वतःच्या पायांवर उभे राहिले आहेत.

शेती विकासासाठी प्रशिक्षण ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाबरोबरच श्रमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेतील मुलांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख कार्यानुभवसारख्या विषयातून करून दिली जाते. पारंपरिक शेतीपद्धतीत बदल करून फळबागाबरोबरच आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार शेती पद्धती शाळकरी विद्यार्थ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी दरवर्षी मार्गदर्शक चर्चासत्रे, शिबिरे व प्रक्षेत्र भेटींचे आयोजन करण्यात येते. यामध्ये कृषी तज्ज्ञ, अभ्यासक, प्रयोगशील शेतकरी व कृषी अधिकारी मार्गदर्शन करतात. यासह प्रतिष्ठानच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे दिले जात आहेत.

संस्थेचे मुख्य उद्देश 

  • ग्रामीण भागातील व्यक्तिमत्त्व विकासास प्रोत्साहन.
  • माती, जलसंधारण आणि कचराभूमीवर वृक्षारोपण.
  • सर्वांगाने विकास होण्यासाठी संपूर्ण गाव साक्षर होण्यासाठी शिक्षण.
  • जलसाक्षरता निर्माण होण्यासाठी जनजागृती.
  • शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशिक्षण व चर्चासत्रे.
  • रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन.
  • समाजात विवेकाचा जागर ज्ञान आणि श्रम याची सांगड घालून शिक्षण व समाजविचार यांची जाणिवपूर्वक बांधिलकी निर्माण होण्यासाठी समता प्रतिष्ठानने सन १९९७ पासून ‘प्रागतिक विचार व्याख्यानमाला’ सुरू केली. या व्याख्यानमालेत माजी शिक्षणमंत्री प्रा. सदानंद वर्दे, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव, मृणालताई गोरे, मेधाताई पाटकर, निळू फुले, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे, शेतकरी नेते विजय जावंधिया, रझिया पटेल, प्रा. हेरंब कुलकर्णी, प्रा. रमेश पानसे, प्रा. हरी नरके, प्रा. राजा शिरगुप्पे, डॉ. राजन गवस, प्रा. प्रशांत मोरे, दत्तप्रसाद दाभोलकर आदींनी लोकांना मार्गदर्शन केले आहे.  - अर्जुन कोकाटे,  ९४२३०३४४६५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com