तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची प्रगती

औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी विज्ञान- तंत्रज्ञानावर आधारीत विविध पिकांची शेती यशस्वी केली. जोडीला विविध पूरक उद्योगही उभारले.
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची प्रगती
Solar energy project in Dwarakbai Veer's farm

औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी विज्ञान- तंत्रज्ञानावर आधारीत विविध पिकांची शेती यशस्वी केली. जोडीला विविध पूरक उद्योगही उभारले. गावशिवार समृद्ध करण्यासह कुटुंबाचे व पर्यायाचे गावचे अर्थकारण त्यातून उंचावले आहे. सुमारे साडेतीनशे उंबरे व साडेसातशे हेक्टर क्षेत्र असलेल्या लाखेगावचे (ता. पैठण, जि. औरंगाबाद) प्रमुख पीक कपाशी आहे. मका, तूर, बाजरी, मूग, उडीद आदी पिकांना मोसंबी, आंबा, चिकू, पेरू, सीताफळ आदी पिकांची जोड मिळाली आहे. भाजीपाला पिकांत शेवगा, हादगा, वांगे, भेंडी, मिरची, टोमॅटो, कांदा, गिलके, दोडके, कोथिंबीर, मेथी आदींचा उल्लेख करावा लागेल. प्रगतीकडे वाटचाल गावात सुमारे २० कार्यरत गट असून महिला गटांची संख्या ११ आहे. बचतीच्या माध्यमातून कुटुंबाच्या अर्थकारणाला बळ देण्याचे काम हे गट करतात. ४०० हेक्टरच्या आसपास शिवार सिंचनासाठी विहीर, बोअरवेल, शेततळी व गावालगत वाहणाऱ्या वेलगंगा नदीचा आधार मिळतो. सुमारे २०० च्या आसपास विहिरी, शंभरच्या आसपास बोअरवेल्स व २७ शेततळी शेतकऱ्यांच्या दिमतीला आहेत. केव्हीकेने गाव घेतले दत्तक प्रयोग करण्याची आस व धडपड असलेल्या शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राने हे गाव दत्तक घेतले. विज्ञान- तंत्रज्ञान, पूरक उद्योग, जमीन सुपीकता तंत्र आदींची जोड देऊन गाव शिवाराला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. केव्हीकेने राबविलेली प्रात्यक्षिके

 • सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, तूर, गहू, चारापीक सुधारीत वाण, एकात्मिक पीक तंत्रज्ञान
 • प्लॅस्टिक आच्छादनावर कापूस, मिरची लागवड
 • आले पिकास भर लावणे, कापूस पऱ्हाटी कुट्टी, ऊस पाचट कुट्टी करून जमिनीत कुजवणे
 • टोमॅटो क्रॉप कव्हर
 • ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान
 • बाजरी पोषणमूल्य वृद्धी कार्यक्रमांतर्गत एएचबी १२०० वाण
 • सर्व उपक्रमात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा सहभाग
 • युवा माउली गट अग्रस्थानी गावातील युवा माउली शेतकरी गटाने ८० सदस्यांसोबत सेंद्रिय शेतीवर भर देत फळे, भाजीपाला उत्पादन केले. शेतकरी आठवडे बाजारात कायम सहभाग घेत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये थेट विक्रीतून २० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले. गटाने रासायनिक खतांचा वापर पाच ते दहा टक्क्यांवर आणला आहे. बारमाही भाजीपाला उत्पादनासाठी विशेष नियोजन केले जाते. मल्चिंगवर पीक घेण्याकडे कल आहे. फळभाज्या, पालेभाज्या, वेलवर्गीय तसेच मोसंबी, चिकू, पेरू, कलिंगड, खरबूज, केशर व गावरान आंबे, द्राक्ष, चिंच आदी विविधता सदस्यांनी ठेवली आहे. हादग्याची शेती आठवडी बाजारात थेट विक्रीचा अवलंब करताना हादगा फुलांना मोठी मागणी असल्याचे लक्षात येताच गटाचे अध्यक्ष निवृत्ती कागदे यांनी आपल्या अर्ध्या एकरात हादग्याच्या एकहजार झाडांची लागवड केली. त्यांना शंभर रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतो. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत दरवर्षी हादगा त्यातून एक ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे कागदे सांगतात. येत्या काळात फुले वाळवून भुकटी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गटातील सदस्यांकडून निश्‍चित दराने माल खरेदी केला जातो. प्रतवारीनंतरच विक्री होते. लाखेगावातील उपक्रम

 • संपूर्ण क्षेत्राची बांधबंदिस्ती
 • वेलगंगा नदीवर तीन किलोमीटरपर्यंत खोलीकरण
 • नदीवर पाणी अडविण्यासाठी सुमारे १० बंधारे
 • अझोला, मुरघास निर्मितीवर भर
 • २५ ते ३० शेतकऱ्यांकडून गांडूळ खत निर्मिती
 • तेवढेच शेतकरी करतात तुती व रेशीम उद्योग
 • सुमारे दीडशे हेक्टर क्षेत्र ठिबकवर
 • शास्त्र व तंत्र जागरासाठी शेतकरी कायम सजग
 • ८ ते ९ शेतकऱ्यांकडे कांदा चाळ
 • २० ते २२ शेतकऱ्यांकडे सौर ऊर्जा प्रकल्प
 • युवा माउली गटाची ५० एकरांवर भाजीपाला शेती
 • नारळाच्या २०० झाडांची लागवड
 • सुमारे पंधरा जणांकडे शंभरावर दुभत्या म्हशी व गायी
 • ३० शेतकऱ्यांकडून २५० ते ३०० पर्यंत गावरान कोंबडीपालन
 • सुमारे ३० ते ४० शेतकऱ्यांकडून शेळीपालन
 • किमान एकपासून ४० पर्यंत शेळ्यांची संख्या
 • ट्रॅक्टर, अवजारे, मळणी यंत्र, बैलचलित कापूस वा पेरणी यंत्रांचा वापर
 • सुमारे ७० ते८० कुटुंबांकडे विहिरीत आडवे बोअर घेणारी यंत्रे. मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्र व राज्याच्या अन्य भागांतील लोक ही सेवा घेतात. प्रति यंत्राआधारे तीनजणांना रोजगार मिळतो.
 • पोषणमूल्य आधारित शेती प्रकल्प

 • शिवारात शंभर महिला शेतकऱ्यांच्या माध्यमातून पोषण मूल्यावर आधारित एकात्मिक शेती पद्धती प्रकल्प मागील वर्षी राबविण्यात आला. ‘युनिसेफ’, महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद, पुणे व ‘अटारी’, पुणे यांचा त्यात समावेश राहिला. सुमारे २६ प्रकारच्या भाजीपाल्यांचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले.
 • परिपाक म्हणून भाजीपाल्यावरील होणारा खर्च वाचला. चालू खरिपातही ही पिके घेतली आहेत. त्याद्वारे आरोग्याचे होणारे फायदे नोंदवण्यात येत असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे यांनी सांगितले.
 • प्रतिक्रिया  जिल्हा परिषद, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून विज्ञान- तंत्रज्ञानाआधारे गावातील शेती समृद्ध होत आहे. त्यातून अर्थकारणाला बळकटी आणण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे त. - अंकुश रहाटवाडे,  (सरपंच, लाखेगाव ता पैठण. जि औरंगाबाद.)

  संपर्क- निवृत्ती कागदे-९०९६४७४१९९ (प्रमुख, युवा माउली शेतकरी गट) डॉ किशोर झाडे-९९२१८०८१३८

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.