पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदार

पुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील दुष्काळी गावाने उद्दिष्ट, ध्येये ठेवून लोकसहभागातून जलसंधारण व सिंचनाची कामे यशस्वी करीत गावशिवार पाणीदार केले आहे.
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदार
water stored in hill side area

पुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील दुष्काळी गावाने उद्दिष्ट, ध्येये ठेवून लोकसहभागातून जलसंधारण व सिंचनाची कामे यशस्वी करीत गावशिवार पाणीदार केले आहे. सर्वाधिक विंधनविहिरी घेणारे गाव अशी ओळख पुसून टाकण्यात गावकरी यशस्वी झाले आहेत. नगर जिल्ह्यातील दुष्काळी पारनेर तालुक्यातील शेती पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील लोक रोजगारासाठी मुंबई, पुणे शहरात स्थायिक झाले आहेत. पठार भागातील पुणेवाडी गावाने मात्र ही लोकसहभाग आणि सरकारी योजनांच्या मदतीने परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतला. तीन हजार लोकसंख्येच्या पुणेवाडीत सरपंच बाळासाहेब कोंडीभाऊ रेपाळे यांनी सिंचनाच्या कामांना प्राधान्य दिले. रेपाळे तीन वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून आले आहेत. या गावचा तीन वर्षांपासून ‘पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग आहे. जलसंधारणाची कामे

 • ग्रामस्थ, सरकारी यंत्रणा, बायफ संस्था व पाणलोट क्षेत्र विकास समितीचा सहभाग
 • सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्रावर बांधबंदिस्ती
 • गाव शिवारातील सहा पाझर तलावांपैकी चार तलावातील दहा हजार ट्रॉलीहून गाळ काढण्याचे काम
 • गावहद्दीतील दोन मोठे ओढे गाळाने बुजले होते. पात्र अरुंद झाले होते. तीन वर्षांत तीन किलोमीटर अंतरावर रुंदी-खोलीकरण. त्यावर जागोजागी मातीबंधारे उभारले. त्यात पाणी साठून राहात असल्याने परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली.
 • डोंगरावरून वाहून जाणारे पाणी सलग समतल चर व बांध बंदिस्तीद्वारे अडवले. त्याचाही पाणीपातळी वाढीस फायदा.
 • सिंचनाची सोय झाल्याने अन्य हंगामांसह उन्हाळी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा
 • दुष्काळी भाग व अन्य जलस्रोत नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विंधनविहिरी घेतल्या होत्या.
 • आठशेपेक्षा अधिक संख्येने असल्याने सर्वाधिक विंधनविहिरीचे ही गावची ओळख आता पुसली जात आहे. यापुढे त्यांच्या खोदण्याला बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
 • अनुभवी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन गावातील नोकरीतील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली अकरा सदस्यांची ग्राम पाणलोट विकास समिती स्थापन केली आहे. ॲड. बाळासाहेब सोनवणे, पाराजी रेपाळे, भिकाजी रेपाळे, काशीनाथ पुजारी, धोंडीबा पुजारी, मोहन रेपाळे आदींचे मार्गदर्शन घेत कामे केली. ज्येष्ठांच्या मदतीने जलबिंदू फाउंडेशन स्थापन केले आहे. गावचे रहिवासी अभियंता धोंडीभाऊ भिमाजी पुजारी यांनी अनेक वर्षे प्रसिद्ध समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या प्रेरणेतून पैठण (जि. औरंगाबाद) भागातील अनेक गावांत जलसंधारणाची कामे केली. त्यांच्या अनुभवाचा पुणेवाडीला फायदा झाला. सांडव्याचे यशस्वी काम गावात १९९५ साली उभारलेल्या पाझर तलावाला सांडवा नसल्याने पाणी साठणे बंद झाले होते. सरकारी नियमानुसार आठ लाखांचा खर्च अपेक्षित होता. मात्र पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून यावर्षी तीन फूट उंचीच्या व ११० फूट लांबीच्या सांडव्याचे काम केले. यंदा त्यात तब्बल दहा कोटी लिटर पाणी साठले. उपसरपंच विशाल दुस्मान, ग्रामसेवक संजय मते यांचाही प्रत्येक कामात पुढाकार असतो. बायफच्या मदतीने रिचार्ज पीटचा प्रयोग शिवारात डोंगर आहे. त्या भागात बायफ संस्थेच्या मदतीने रिचार्ज पीट विहिरीचा प्रयोग केला. त्यासाठी डोंगराच्या ओहोळात साधारण अर्धा गुंठा जागेवर वीस फूट खोल तब्बल पस्तीस विहिरी खोदल्या. डोंगरावरून वाहून आलेले पाणी त्यात साठून जागेवर जिरले. परिणामी परिसरातील विहिरी पाण्याने डबडबल्या. अन्य स्त्रोतांनाही पाणी वाढले. या भागात हा पहिलाच प्रयोग होता. पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी योजनेला सतत वीज टंचाईला सामोरे जावे लागे. दोन वर्षांपासून पाणीयोजना सौरऊर्जेवर चालवून विजेवरील खर्चात बचत केली आहे. नगर जिल्हा परिषद विभागाकडून पारनेर तालुक्यातील निघोज, ढवळपुरी व पुणेवाडी या गावांत सौरउर्जा उपक्रम राबवला गेला. पुणेवाडीकरांनी तो यशस्वी केला. गावातील चारशेपेक्षा अधिक कुटुंबांना नळयोजनेची जोडणी दिली आहे. पुणेवाडीची वैशिष्ट्य़े

 • सातशेच्यावर कुटुंबांकडून दहा वर्षापासून वैयक्तिक शौचालयाचा वापर
 • सन २०११ मध्ये गाव हागणदारीमुक्त
 • तीन वर्षांत शाळेचा परिसर, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर परिसर, रस्त्याच्या दुतर्फा चार हजार वृक्षांची लागवड. लोकवर्गणीतून सुमारे पाचशेपेक्षा अधिक झाडांना संरक्षण जाळ्या.
 • ग्रामविकासाच्या जोरावर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन. कार्यालयाच्या परिसराचे वित्त आयोगाच्या निधीतून सुशोभीकरण तसेच शाळेची संरक्षण भिंत उभारली.
 • जिल्हा परिषद शाळेत लोकसहभागातून साडेतीन लाख रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वर्ग (क्लासरुम)
 • सांडपाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देत ६०० च्या जवळपास कुटुंबांना सांडपाण्यासाठी शोषखड्डे
 • जिल्हा परिषद निधीतून डांबरीकरण, दलितवस्तीत हायमॅक्स दिवे, सिमेंट रस्ता कॉँक्रीटीकरण.
 • आगामी नियोजन

 • पठार भाग असून या भागात कांदा, ज्वारी, बाजरी, मूग, तूर ही पिके होतात. पाणी उपलब्ध झाल्याने ठिबक, तुषार सिंचनाखालील क्षेत्र वाढवून फळबाग क्षेत्रवाढीसाठी पुढाकार घेणार.
 • वीज टंचाई होऊ नये यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजनातून एक मॅगेवॉट वीज तयार करणारा सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव दिला आहे. पाठपुरावा करून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार.
 • जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्यांचे बांधकाम, वीज उपकेंद्र मंजूर. पाठपुरावा करून तो पूर्ण करण्याचे नियोजन
 • दलितवस्तीत समाजमंदिर, दारूबंदी, कुऱ्हाड बंदी, चराईबंदी
 • प्रतिक्रिया दुष्काळी गाव अशी ओळख असलेल्या पुणेवाडीचा विकास साधला जात आहे. जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची मदत झाल्याने गावशिवार पाणीदार करता आले. - बाळासाहेब रेपाळे, ९४२३३८७५८२ (सरपंच, पुणेवाडी, ता, पारनेर. जि. नगर)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.