पायाभूत सुविधांसह शेतीतून प्रगतिपथावर ब्राह्मणवाडा

रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायत भवन अशा मूलभूत सोयीसुविधांसह ब्राह्मणवाडा थडी (जि. अमरावती) या गावाने प्रगतीकडे वाटचाल केली आहे. याशिवायकृषी क्षेत्रातून विकास साधताना संत्रा, केळी, दवणा आदी पिकांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करण्यास सुरवात केली आहे.
ब्राम्हणवाडा गावात फुललेल्या केळी व संत्रा बागा
ब्राम्हणवाडा गावात फुललेल्या केळी व संत्रा बागा

रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायत भवन अशा मूलभूत सोयीसुविधांसह ब्राह्मणवाडा थडी (जि. अमरावती) या गावाने प्रगतीकडे वाटचाल केली आहे. याशिवाय कृषी क्षेत्रातून विकास साधताना संत्रा, केळी, दवणा आदी पिकांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करण्यास सुरवात केली आहे. अमरावती जिल्ह्यात चांदुर बाजार या तालुक्‍याच्या ठिकाणापासून १८ किलोमीटरवर असलेले ब्राह्मणवाडा थडी हे सुमारे साडे १२ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावचे वहितीखाली सुमारे ८३३. ८० हेक्टर क्षेत्र आहे. सतरा सदस्य संख्येच्या ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जल व्यवस्थापन, पायाभूत सुविधा व शेती या मुद्यांवर गावाने प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. गाव शिवारातून वाहणाऱ्या पूर्णा नदीवर दोन बंधारे बांधले आहेत. त्यामुळे शेत शिवारातील भूजल पातळी वाढली आहे. प्रत्येक बंधारा उभारणीसाठी ६० हजार रुपये खर्च होता. त्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे लोकवर्गणी जमा करण्यात आली. उर्वरित खर्च ग्रामपंचायतीने स्वनिधीतून केल्याचे ग्रामविकास अधिकारी एस. एच. देशमुख यांनी सांगितले. विहीर व कालव्याच्या माध्यमातून गावाला सिंचन होते. तालुक्यात वसुंधरा अभियानासाठी या गावाची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धनावर भर दिला जाणार आहे. लोकवर्गणीतून पहिल्या टप्प्यात ३० ‘ट्री गार्डस’ मिळाले आहेत. शोष खड्ड्याच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापन पोलिस ठाण्यासमोर बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ता आहे. या भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी नालीकाम दुरापास्त होते. आता सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता शोषखड्डा घेण्यात आला आहे. नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजनांवर भर दिला आहे. ग्रामपंचायतीची वास्तू चौदाव्या अर्थ आयोगाच्या निधीतून २०१६-१७ मध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बांधण्यात आली. त्यातून गावच्या वैभवात आता भर पडली आहे. जिल्हा परिषदेच्या सहा शाळा आहेत. त्यामध्ये फरशा, रंगकाम, थंड पाणी, पटांगणात पेव्हर ब्लॉक्स, टीव्ही आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. पंधरा अंगणवाड्यांपैकी नऊंची दुरुस्ती करून त्या ठिकाणी खेळण्याचे साहित्य उपलब्ध केले आहे. त्यामुळे चिमुकल्यांमध्ये शैक्षणिक गोडी वाढण्यास मदत झाली आहे. कृषीक्षेत्रात घेतली आघाडी मूलभूत आणि भौतिक सोयीसुविधांची उपलब्धता याबरोबरच गावाने कृषी क्षेत्रातही आपले अस्तित्व तयार केले आहे. संत्रा रोपवाटिका व्यवसाय या भागात बहरला आहे. जून ते ऑगस्ट कालावधीत संत्रा- मोसंबी रोपांना मागणी राहते. या व्यवसायात चार शेतकरी व्यस्त आहेत. सरासरी दीड लाख रोपांची विक्री दरवर्षी होती अशी माहिती त्यापैकी एक दादाराव घायर यांनी दिली. या वर्षी संत्रा रोपांना हंगामातील सर्वात उच्चांकी ३० ते ३५ रुपये प्रति कलम दर मिळाला. कलम निर्मिती व्यवसायात पंचवीस- तीस वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांचे सातत्य आहे. दादाराव शासकीय रोपवाटिकेला देखील कलमांचा पुरवठा करतात. संत्रा उत्पादकांचे गाव एकूण वहितीखालील क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. एकरी उत्पादकता झाडांच्या वयानुसार १५ टनांपासून २५ टनांप्रमाणे मिळते. संत्रा बागायतदारांना पूर्वी फायटोप्थोरा रोगाची समस्या अधिक होती. ठिबक व पाणी व्यवस्थापनातून ही समस्या बऱ्याच अंशी नियंत्रणात आली आहे. केळीचा विस्तार अलीकडील काळात गावातील शेतकरी केळी लागवडीकडे वळले आहेत. सद्यःस्थितीत तीस एकर क्षेत्र आहे. पैकी १४ एकर क्षेत्र एकट्या दादाराव घायर यांचे आहे. सन २००९ पासून या पिकात त्यांनी सातत्य ठेवले आहे. राजस्थानचे व्यापारी अमरावती जिल्ह्याच्या विविध गावातून ऊस खरेदी करतात. त्यासोबतच केळी व अन्य शेतमालही ते घेतात. खानदेशातील दरांनुसार येथील केळीला दर दिला जातो. संत्रा विक्री हुंडा आणि मोजून देणे या दोन पद्धतीने होते. औषधी गुणधर्माचा दवणा औषधी गुणधर्म असलेल्या दवणा पिकाची लागवडही गावात होते. गुढीपाडव्याच्या सुमारास घेतले जाणारे हे पीक सुमारे १२० दिवसांचे हे पीक आहे. ४५० ते ५०० रुपये प्रति वाफा दराने व्यापारी सरासरी पाच ते आठ वाफे खरेदी करतात. या पिकातून चांगले पैसे होतात असा ग्रामस्थांचा अनुभव आहे. दवण्याचा वापर धार्मिक विधीसाठी होतो. उत्तर प्रदेशात या पिकाची लागवड करणारे शेतकरी मोठ्या संख्येत आहेत. त्या भागात प्रक्रिया उद्योग देखील आहेत.

गावची वैशिष्ट्ये

 • मध्यम पूर्णा प्रकल्पातून सिंचन.
 • विर्सोळी गावात सिंचन प्रकल्प.
 • ब्राह्मणवाडासह ४९ गावांमध्ये सिंचन सोय.
 • पाण्यामुळे संत्रा, गहू, हरभरा या सारखी पिके घेणे शक्य
 • संत्रा व्यवहारात हंगामात कोट्यवधीची उलाढाल.
 • नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून कृषीपंप व ठिबक अनुदान योजनेला सर्वाधिक प्रतिसाद
 • पूर्णा नदी काठावर नागनाथाचे मंदिर
 • पयोष्णी तीर्थ पंचक्रोशीत प्रसिद्ध
 • संपर्क- एस.एच. देशमुख- ९८८१९५५५७५ ग्रामविकास अधिकारी - दादाराव घायर- ७०२०२०९७५०  

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com