चला, झाडांच्या गावाला जाऊया...

रेन वॅाटर हार्वेस्टिंग करणारं, सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणारं आणि लोकसहभागाच्या बळावर फळे, फुले, वनौषधी व जंगली झाडांच्या सुमारे सात हजार वृक्षराजीने पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसित चिंचणी गाव समृद्ध झाले आहे. आज तर झाडांवर प्रेम करणारं गाव अशी स्वतंत्र ओळख चिंचणीने मिळवली आहे.
चला, झाडांच्या गावाला जाऊया...
गावातील आबालवृद्धांसह सर्वजण झाडे लावण्याच्या कामात गुंतली असताना

गावातील सर्व घरावरील छताच्या पाण्याचे रेन वॅाटर हार्वेस्टिंग करणारं, सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणारं आणि लोकसहभागाच्या बळावर फळे, फुले, वनौषधी व जंगली झाडांच्या सुमारे सात हजार वृक्षराजीने पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसित चिंचणी गाव समृद्ध झाले आहे. आज तर झाडांवर प्रेम करणारं गाव अशी स्वतंत्र ओळख चिंचणीने मिळवली आहे. सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणाच्या निर्मितीनंतर चिंचणी गावाचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. साधारण १९७८ ची ही गोष्ट. सोलापूर जिल्ह्यात पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील टप्पा या ठिकाणच्या ओसाड माळरानाची जमीन गावकऱ्यांच्या वाट्याला आली. टप्पा हे वारकऱ्यांसाठी श्रद्धा आणि आदराचे स्थान असल्याने मोठ्या श्रद्धेने ग्रामस्थांनी या जागेला पसंती दाखवली. सुमारे ६५ कुटुंबे आणि ३७५ लोकसंख्येचे हे गाव वसवण्यात आलं. पुनर्वसनात प्रत्येक कुटुंबाला दोन एकर शेती मिळाली. गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सह्याद्री व जावळी खोऱ्यात महाबळेश्वरच्या पायथ्याला हिरवाईने नटलेलं निसर्गसंपन्न चिंचणी गाव थेट सोलापूरसारख्या दुष्काळी भागात वसलं. ही बाब ग्रामस्थांसाठी तशी असह्य आणि वेदनादायी होती. सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्याही हा बदल गावकऱ्यांसाठी कठीणच होता. पण त्यांनी तो स्वीकारला.आपल्या मूळच्या गावाप्रमाणेच हा परिसर नव्याने उभारण्याची धडपड सुरु केली. सन २००६ नंतर खऱ्या अर्थाने दुसऱ्या पिढीने विकासकामांवर अधिक लक्ष केंद्रित केलं. श्रमिक मुक्ती दलाचे डॅा. भारत पाटणकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर सोशल फाउंडेशन, फेसबूक फ्रेंडस फाउंडेशन, रोटरी क्लब यांचे साह्य सातत्याने मिळाले. त्यातून पुढे जाण्यास मदत मिळाली. प्रति महाबळेश्वरचा ध्यास आता पुन्हा ‘महाबळेश्वर’ चे सांनिध्य नाही. पण चिंचणीमध्ये प्रति महाबळेश्वर उभे करूया केवळ या ध्यासानं गाव झपाटलं. पुनर्वसनामुळे गाव आधीच आखीव रेखीव वसलं होतंच. पण मुख्य रस्ते, चौक आणि रिकाम्या जागा पाहून प्रत्येक ठिकाणी झाडं लावण्याचा उपक्रम सुरु झाला. त्यातून काही वर्षांत बघता-बघता सात हजारांहून अधिक झाडं लावून ती जगवली देखील आहेत. वृक्षवल्ली आम्ही सोयरी

 • प्रत्येकाच्या घरासमोर दिसतात आंबा, जांभूळ ,सीताफळ, पेरू,चिकू, नारळ, कढीपत्ता अशी झाडे
 • फळे, फुले, वनौषधी, जंगली झाडांचाही समावेश
 • प्रत्येक हंगामात फळे हाताने तोडून खाण्याची पर्वणी
 • विशेष म्हणजे सर्व झाडांची लागवड शासनाच्या मदतीविना व ‘ट्री गार्ड’ व्यतिरिक्त.
 • बहुतांश झाडांना ठिबक सिंचन
 • यंदाच्या वर्षी एक हजार उतीसंवर्धित बाबू लागवड सुरू
 • लोकसहभाग वाढत गेला पिण्याचे पाणी, रस्ते, वीज या सारख्या प्राथमिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र लोकसहभाग हा घटक त्यात महत्त्वाचा ठरला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्ती अभियानात पहिल्याच वर्षी चिंचणीने भाग घेतला. जिल्ह्यातलं पहिलं 'हागणदारीमुक्त गाव' म्हणून ओळख निर्माण केली. त्यानंतर परस्परांमध्ये अजूनच विश्‍वास निर्माण होत प्रत्येक उपक्रमात लोकसहभाग वाढत गेला. त्यातूनच अनेक कामे उभी राहिली. ‘रेन वॅाटर हार्वेस्टिंग’ ग्रामस्थांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला असून पाच रुपयांमध्ये वीस लीटर शुध्द पिण्याचे पाणी दिले जाते. पाण्याच्या बचतीचे महत्त्व देखील गावकऱ्यांनी जाणले आहे. कुटुंबांनी आपापल्या घरावरील छताचे पाणी संकलित करून (रेन वॉटर हार्वेस्टिंग) ते जमिनीत जिरवले आहे. या माध्यमातून वर्षाकाठी सुमारे तीन लाख कोटी लीटर पाणी भूगर्भात मुरते आहे. रोजगारनिर्मितीसाठी कृषी पर्यटन केंद्र गावातच तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, स्थलांतर थांबून गाव स्वयंपूर्ण व्हावं या उद्देशानं कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचं ठरवलं आहे. ग्रामीण जीवनशैली, खाद्यसंस्कृती, खेळ, सांस्कृतिक ठेवा आदींमध्ये शहरी लोकांना सहभागी करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्पाची मालकी व उत्पन्न हे सार्वत्रिक राहील असा प्रयत्न आहे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य गावातील बहुतेक कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. अलीकडील वर्षांत पाण्याची बऱ्यापैकी सोय झाल्याने ऊस, डाळिंब, पपई, मका अशी पिके घेतली जातात. आता सेंद्रिय शेतीलाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी विशेष मोहीम घेऊन शेतकऱ्यांत जागृती करण्यात येणार आहे. काही शेतकरी हे प्रयोग करीतही आहेत. राजकारणापासून दूर पिराचीकुरोली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पुनर्वसित चिंचणीचा समावेश होतो. चिंचणीचा स्वतंत्र वॉर्ड आहे. त्यातून तीन सदस्य निवडून देता येतात. मात्र गावकऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले नाही. जाणीवपूर्वक राजकारण आणि निवडणुकांपासून दूर राहणे पसंत केले. जे करायचं ते स्वयंफूर्तीने व एकमेकांच्या विचाराने असं ठरवण्यात आलं. ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारतही उभारली आहे. स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी शासनाकडे प्रस्तावही दिला आहे. लवकरच त्यास मान्यता मिळेल. झाडांचे गाव ते पुस्तकांचे गाव शासनाच्या सहकार्यातून सातारा जिल्ह्यात भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून पुढे आले. त्याच धर्तीवर कोणतंही अनुदान न घेता चिंचणीने झाडाचं गाव हा उपक्रम राबवला आहे. यापुढे कर्मवीर भाऊराव पाटील सार्वजनिक वाचनालय व अभ्यास केंद्र उपक्रमालाही गावाने सुरुवात केली आहे. त्यामाध्यमातून पुस्तकाचे गाव अशीही ओळख आता गावाची होणार आहे.   फटाके वाजवण्यास बंदी लोकवर्गणीतून गावात ग्रामदैवत वरदायिनी माता मंदिर उभारले आहे. तरुण मुलांसाठी खुली व्यायामशाळा आहे. जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीची सुसज्ज शाळा आहे. झाडांमुळे पक्षांचा भरपूर वावर आहे. त्यांना प्रदूषण होऊ नये म्हणून दिवाळी, यात्रा, लग्न समारंभात फटाके वाजवले जात नाहीत.

  प्रतिक्रिया  जगण्याची लढाई सुरू असताना हे जगणं स्वच्छ, सुंदर, समृध्द, निरोगी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गावातील तरुणांना इथेच उद्योग उभे करून देण्याचा प्रयत्न आहे. गाव सर्व अंगाने स्वयंपूर्ण करण्याचा मानस घेऊनच चिंचणीकर कार्यरत आहोत. -मोहन अनपट, ग्रामस्थ, चिंचणी संपर्क- ९८६०९५९५६५, ७०२०९९४१५३   पर्यावरण संतुलित विकास या ध्येयाने आम्ही कार्यरत आहोत. झाडांच्या अनुषंगाने आम्ही ओळख तयार केलीच पण सेंद्रिय शेतीतही ओळख तयार करणार आहोत. -चंद्रकांत पवार, ग्रामस्थ सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातात. यात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असतो. आदर्श गाव म्हणून आमचे गाव लवकरच पुढे येईल. -.शशिकांत सावंत, ग्रामस्थ

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.