
गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन याद्वारे वाशीम जिल्ह्यातील हिवरा गणपती गावचा चेहरामोहरा बदलला आहे. शेतकरी बियाणे बदल, बीजप्रक्रिया, गांडूळ खतनिर्मिती, रेशीम, दुग्ध व्यवसाय, कुक्कुट, शेळी पालनाकडे वळले आहेत. त्यातून अर्थकारण उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वाशीम जिल्ह्यातील हिवरा गाव करडा येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) २०१७-१८ मध्ये दत्तक घेतले. केव्हीकेचे विषय विशेषज्ज्ञ तथा गाव प्रकल्प संयोजक डी. एन. इंगोले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गावचे मूल्यांकन करताना भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, एकूण क्षेत्रफळ, पशुधन, यांत्रिकीकरण, शेती पद्धती, उत्पादकता, लघू उद्योगांबाबत माहिती संकलित करण्यात आली. दुग्ध व्यवसाय रुजला दुग्ध व्यवसायात अनावश्यक खर्चात बचत, वाढते उत्पादन, त्यातून मिळणारा नफा यातून गावाचे अर्थकारण सुधारत असल्याचे दिसून आले. सन २०१७-१८ पूर्वी ५० ते १०० लिटर असलेले दूध संकलन ८०० लिटरच्या पुढे गेले आहे. गावात चारा पिकांची अत्यंत वानवा होती. केव्हीकेच्या आद्यपीक प्रात्यक्षिकांतर्गत काही शेतकऱ्यांकडे प्रायोगिक तत्त्वावर सीओ-४ नेपिअर, ल्युसर्न, बरसीम आदींची लागवड करण्यात आली. त्याद्वारे चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यात आला. नवीन वाणांकडे कल सोयाबीन, तूर, हरभरा, गहू आदींच्या पारंपरिक वाणांपासून कमी होत चाललेले उत्पादन गावकऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. या पिकांच्या सुधारित वाणांचा प्रसार सुरू झाला. तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने शेतकरी वाण बदलाबाबत सकारात्मक झाले. पूर्वी कीडनाशकांचा वापर असंतुलित असायचा. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालीच शिवाय पर्यावरणाचा ऱ्हासही होत होता. त्यासाठी एकात्मिक कीड- रोग व्यवस्थापन पद्धतीला चालना दिली. पीक प्रात्यक्षिके, नवीन तंत्र तंत्रज्ञान चाचण्या, विविध प्रशिक्षणे घेण्यात आली. परिणामी, प्रमुख हंगामी पिकांत रसायने वापरात ५० टक्क्यांपर्यंत कपात झाली. शेतकरी मंडळे आता स्वतःचे बियाणे तयार करू लागली आहेत. उपक्रमशील शेतकरी
उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न खर्च कमी करून उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. घरटी पाच फळझाडे हा पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला. गावकऱ्यांच्या दैनंदिन आहारामध्ये किमान एक फळ असावे या दृष्टीने कृषी कल्याण अभियानाची कटाक्षाने अंमलबजावणी झाली. पडीक जमिनी, शेताचे बांध यांचा उत्पन्नस्रोत म्हणून वापर करण्यात आला. परसबाग निर्मिती
पीकविमा, जलसंधारण गावातील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेबाबत पूर्वी कमालीची उदासीनता होती. जागृती केल्यानंतर शेतकरी १०० टक्के खरीप व रब्बी पिकांचा विमा उतरवीत आहेत. गावशिवारात मृद् व जलसंधारणाचे उपाय एकात्मिक, सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून राबविण्यात आले. हिवरा गावाविषयी
प्रतिक्रिया माझे एमएपर्यंत शिक्षण झाले आहे. तीन वर्षापासून दुग्ध व्यवसायात आहे. दिवसाला १०० लिटर दूध वाशीममध्ये नेऊन ५० ते ५५ रुपये प्रतिलिटर दराने विक्री करतो. महिन्याला ३० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. शेणापासून गांडूळ खत तयार करतो. साडेसहा एकर बागायती शेतीत नव्या वाणांची लागवड होते. -विशाल मंचकराव इंगळे दोन वर्षांपासून शेळीपालन करतो. लॉकडाउनमध्ये त्यातून ६५ हजार रुपयांची मिळकत झाली. सहा शेळीपासून सुरू केलेल्या या व्यवसायाने आतापर्यंत अडीच लाखांचे उत्पन्न दिले आहे. ब्रॉयलर पोल्ट्रीही सुरू केली आहे. स्वतःच मार्केटिंग करीत आहे. -अक्षय बबनराव देशमुख, हिवरा ढाळीचे बांध, गॅबियन, भूमिगत बंधारे, जुने सिमेंट नाला, बंधारे खोलीकरण, गाळ काढणे, रिचार्ज शाप्ट, पुनर्भरण चर, वृक्ष लागवड अशी कामे झाली. - भागवत देशमुख, कृषी सहायक, हिवरा गावकरी, केव्हीके, कृषी, पशुधन, विभाग असे सर्वांचे प्रयत्न, सातत्याने पाठपुरावा यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत झाली आहे. ग्रामसेवक संजय इढोळे देखील तत्परतेने कार्यरत आहेत. - गजानन देशमुख- ९५५२१२७७०४ सरपंच, हिवरा संपर्क- डी. एन. इंगोले- ९०११९२७८४२ प्रकल्प संयोजक, केव्हीके, करडा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.