
मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई, त्यातून उजाड होत चाललेले शिवार या समस्यांवर एकी अर्थात लोकसहभाग, प्रयत्नवाद व उपक्रमशीलतेतून मात केली आहे. तीन-चार वर्षे सतत जलसंधारणाची कामे त्यांनी प्रभावीपणे राबविली. त्यातून कूपनलिका, विहिरींचे पुनर्भरण झाले. सातपुडा पर्वतातून येणाऱ्या नदीवर बंधारे उभारून पाणी अडविण्याचा कार्यक्रम गतीने पूर्ण केला. त्याआधारे गावशिवारात भाजीपाला, फळपिके फुलू लागली आहेत. मामलदे (ता.चोपडा, जि.जळगाव) हे चोपडा शहरापासून सुमारे सात किलोमीटरवरील गाव आहे. गावापासून सातपुडा पर्वतरांगा नजीक आहेत. शिवारात काळी कसदार, मध्यम स्वरूपाची जमीन आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ३१०० असून शिवार ८६९ हेक्टर आहे. शिवारात पूर्वी पारंपरिक पद्धतीने केळीची शेती व्हायची. कापूस हे इथले प्रमुख पीक आहे. परंतु पावसाचा लहरीपणा, बेसुमार पाणी उपसा यामुळे कूपनलिका, विहिरींची पाणी पातळी कमी होत गेली. शिवार हळूहळू उजाड झाले. कोरडवाहू शेती परवडेनाशी झाली. पुढे अशी स्थिती आली की नजीकच्या गावातून चार किलोमीटर अंतरावर जलवाहिनी टाकून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी लागली. गावातून एकेकाळी केळीची हिवाळ्याच्या दिवसात ३०० क्विंटलपर्यंत काढणी व्हायची. परंतु केळीचे क्षेत्रही पाण्याअभावी संपुष्टात आले. गाव एकवटले आलेले संकट दूर करण्यासाठी सारे गाव एकवटले. त्यांनी जलसंधारणाची कामे करण्याचा निश्चय केला. सातपुडा पर्वताकडून नवर नदी, वडमी आणि पीरबाबा नाले येतात. गावात या नदी- नाल्यांची लांबी प्रत्येकी चार किलोमीटर आहे. सातपुड्यातून पाणी वेगात येते व पुढे वाहून जाते. हे पाणी संथ करून जिरते करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, बॅंका, लोकसहभाग यांची मदत घेण्यात आली. अशी झाली कामे
फलित मिळाले जलसंधारणाच्या कामांमधून सुमारे ४०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. परंतु अलीकडील दोन वर्षांत नाले, नदीकाठच्या कमाल क्षेत्राला लाभ झाला आहे. सुमारे १७ कूपनलिकांचे पुनर्भरण झाले. त्यांची जलपातळी वाढली. गावात जलसाठे मुबलक झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली. बागायती शेती वाढली, मात्र पाणी बचतीवर भर पाण्याची शाश्वती होऊ लागली तशी पीकपद्धती सुधारू लागली. पूर्वहंगामी कापसाची लागवड वाढली. मोसंबी, पेरूच्या बागा उभारल्या जाऊ लागल्या. सुमारे आठ शेतकऱ्यांनी मोसंबी तर १० जणांनी लिंबू बागा फुलविल्या. भेंडी, काकडी, कांदा, सोयाबीन, उडीद, मूग आदींची विविधता दिसू लागली आहे. सुमारे १०० एकर क्षेत्र बागायती पिकांखाली आले आहे. पाण्याचा योग्य वापर व बचत व्हावी यासाठी मिनी तुषार सिंचन, तुषार सिंचन, ठिबक आदी यंत्रणेचा वापर शेतकरी करू लागले आहेत. विक्री व्यवस्था भेंडी व काकडीची थेट जागेवर विक्री होते. इंदूर (मध्य प्रदेश), वाशी (मुंबई) येथील काही खरेदीदार मध्यस्थांच्या मदतीने खरेदी करतात. पावसाळा हंगामात घेतल्या जाणाऱ्या भेंडीला मागील दोन वर्षे जागेवर किलोला सरासरी २५ रुपये दर मिळाला आहे. पावसाळ्यात भाजीपाल्याची आठ ते १० टन विक्री होते. काहीजण केळीकडे वळले आहेत. खरिपातील कांद्याचे एकरी पाच टन तर रब्बीतील कांद्याचे एकरी सरासरी आठ टनांपर्यंतचे उत्पादन शेतकरी साध्य करतात. पपईची लागवडही फेब्रुवारी, मार्च महिन्यात केली जाते. विक्रीही जागेवरच केली जाते. मागील दोन वर्षे एकरी २० टन उत्पादन काही शेतकऱ्यांना मिळाले आहे. त्याला प्रति किलो आठ रुपये दर राहिला आहे. खरेदीसाठी इंदूर, राजस्थान, बऱ्हाणपूर, धुळे, शिंदखेडा भागातील व्यापारी येतात. कापसाची उल्लेखनीय शेती
आध्यात्मिक वातावरण गावात दरवर्षी खंडेराव महाराज व मरीआईची यात्रा भरते. त्यासाठी सारे गाव एकत्र येते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचा प्रचार, संत मंडळीचे आशीर्वाद यासाठी हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजीत होतो. यात जुन्या पिढीसह युवक, महिलांचा सक्रिय सहभाग असतो. संपर्क- भरत इंगळे (शेतकरी)-९९२२०७८०७८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.