जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे मान्हेरेची प्रगत वाटचाल

मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह तालुक्यातील अन्य गावांमध्ये हवामान बदलावर आधारित शेती व्यवस्थापन, जलसंधारण, आधुनिक तंत्र, पशुधन आदी विषयांमध्ये विविध संस्था व लोकसहभागातून प्रकल्प राबवण्यात आले. पीकबदल, शाश्‍वत शेती, आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल, पाणी उपलब्धता आदींच्या माध्यमातून येथील शेतकरी प्रगतीकडे वाटचाल करू लागला आहे.
-मान्हेरे येथील महिला शेतकरी भाताला खते देताना.
-मान्हेरे येथील महिला शेतकरी भाताला खते देताना.

मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह तालुक्यातील अन्य गावांमध्ये हवामान बदलावर आधारित शेती व्यवस्थापन, जलसंधारण, आधुनिक तंत्र, पशुधन आदी विषयांमध्ये विविध संस्था व लोकसहभागातून प्रकल्प राबवण्यात आले. पीकबदल, शाश्‍वत शेती, आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल, पाणी उपलब्धता आदींच्या माध्यमातून येथील शेतकरी प्रगतीकडे वाटचाल करू लागला आहे.   नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील अनेक आदिवासी गावांमध्ये शेती व पाणी या प्रमुख समस्यांवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी विविध प्रकल्पांतर्गत प्रयत्न झाले. लोकसहभाग, नाबार्ड, बायफ संस्था, जनरल मिल्स, प्रशासन, कृषी विद्यापीठ व केव्हीके (कृषी विज्ञान केंद्र) आदींचे त्यामध्ये योगदान राहिले. प्रकल्पांत गावांमध्ये मान्हेरेचे प्रातिनिधीक उदाहरण घेता येईल. जलसमृद्धी उपक्रम पावसाचे पाणी विविध माध्यमांतून अडवून त्याचा शेतीसाठी वापर करण्यात आला. जुने बंधारे दुरुस्त केले. त्यातील गाळ काढण्यात आला. माती- पाणी थोपविण्यासाठी विविध क्षेत्र उपचार करण्यात आले. पाच शेततळ्यांची निर्मिती झाली. तीन बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. सलग समपातळी चर, दगडी बांध, वृक्षलागवड आदी उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले. या सर्व नियोजनात गावातील पाणलोट क्षेत्र समितीचे सदस्य अग्रभागी राहिले. बांधावर विविध वृक्षांचे रोपण झाले. तीन बंधारे दुरुस्ती करून सुमारे ७५ ते ८० एकर क्षेत्र ओलिताखाली आणले. त्याचा उपयोग करून शेतकरी गहू, हरभरा, वाटाणा, मसूर, टोमॅटो, मिरची, वांगी, कांदा, लसूण, बटाटा, कलिंगड यासारखी पिके घेत आहेत. त्याद्वारे रोजगार निर्माण होत आहे. ‘स्मार्ट शेती’ उपक्रम वातावरणीय बदल लक्षात घेऊन शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्याचे प्रयत्न झाले. वीस शेतकऱ्यांकडे गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सुमारे ३७२ शेतकऱ्यांकडील मातीचे नमुने संकलित करून पृथक्करण व आरोग्य पत्रिका देण्यात आली. त्याचा उपयोग करून मुख्य व सूक्ष्मअन्नद्रव्यांचे नियोजन शेतकरी करू लागले आहेत. भुईमुगासारख्या तेलबिया पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. हवामान बदलानुसार शेतीतंत्रात करावयाच्या बदलांमध्ये विविध प्रात्यक्षिके ३४४ शेतकऱ्यांना देण्यात आली. सुमारे १२ शेतकऱ्यांना पॉली मल्चिंग वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्या तंत्राआधारे क्षेत्र वाढत आहे. सूक्ष्मसिंचनाचा वापर सुमारे १९ एकर क्षेत्र व सुमारे २९ शेतकऱ्यांकडे जांभूळ व आंबा या फळपिकांच्या लागवडी झाल्या. सुमारे १९ सहभागधारकांना ठिबक व तुषार सिंचन उपक्रमाचा लाभ देण्यात आला. बदलत्या वातावरणातही चांगले उत्पादन देणाऱ्या स्थानिक पीक वाणांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यात गहू, हरभरा, भुईमूग, भात आदींचा पिकांचा समावेश होता. पशुधन विकास पशुधनाचे उत्तम संगोपन होऊन आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने नेपियर गवत, ओट, अझोला, मका, ज्वारी आदी चारा पिकांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. गावातील एका शेतकऱ्याकडे प्रात्यक्षिक म्हणून ‘क्लायमेट स्मार्ट कॅटल शेड’ उभारण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे शास्त्रीय पद्धतीने संगोपनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर आणि त्यांची ‘टीम’ वेळोवेळी प्रकल्प कार्यक्षेत्राला भेटी देऊन मार्गदर्शन करीत आहेत. हवामान केंद्राची उभारणी प्रकल्पांतर्गत अकोले तालुक्यातील टिटवी गावात अद्ययावत हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. त्याद्वारे हवामानाचे अंदाज प्रत्येक दिवशी माहीत होणे व त्यानुसार शेतीचे नियोजन करणे शक्य झाले आहे. अवकाळी पाऊस, अवेळी येणाऱ्या नैसर्गिक संकटांची आगाऊ सूचना मिळाल्याने त्याप्रमाणे शेतकरी सज्ज राहू शकतात. प्रशिक्षण व क्षमता विकास शेतकऱ्यांची क्षमता बांधणी व ज्ञान वाढवण्यासाठी नियमितपणे प्रशिक्षण द्यावे लागते. शेतीतील तांत्रिक विषयांसह महिला बचत गटांद्वारे रोजगार संधी, आर्थिक गरजा गावपातळीवर सोडवणे, आरोग्य आणि शेती विमा योजना, त्याचा लाभ मिळवण्याच्या पद्धती याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. गावात पडणारा पाऊस व उपलब्ध होणारे पाणी त्यानुसार पाण्याचा ताळेबंद याबाबतही जागरूक करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनीही प्रशिक्षणात महत्त्वाचा वाटा उचलला. अन्य ठळक उपक्रम

  • सुमारे पाचशे घरांना नियमितपणे वीस लिटर स्वच्छ पिण्याचे पाणी अल्प दरात देण्यासाठी प्रकल्प.
  • महिलांसाठी नियमित आरोग्य शिबिरे. ग्राम स्वच्छता अभियान.
  • सुधारित शेगडीचा वापर करून स्वयंपाकासाठीच्या इंधनात ३५ टक्क्यापर्यंत बचत. धूर कमी होऊन डोळ्यांचे आजार त्यामुळे कमी होऊ शकले.
  • घरोघरी स्वच्छ स्वयंपाकगृह संकल्पना राबविली.
  • वीजभारनियमन समस्येमुळे घरांमध्ये सौर दिवे उपक्रम या भागात लोकप्रिय झाला.
  • घरटी परसबाग उभारून त्याद्वारे सकस व कसदार अन्न आहारात कसे येईल यावर विशेष भर.
  • शाळा हा विकासाचा केंद्रबिंदू मान्हेरे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा व आश्रम शाळा यांनाही उपक्रमात सहभागी करण्यात आले. मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ‘पासवर्ड’ नावाचा उपक्रम राबवण्यात आला. यात पुणे येथील प्रसिद्ध संस्थेच्या माध्यमातून मुलांसाठी तयार केलेल्या पुस्तकांचे वितरण चारशे विद्यार्थ्यांना करण्यात आले. प्रत्यक्ष कृतीतून विविध गोष्टींचे आकलन व्हावे यासाठी शिक्षणमित्र नावाचा उपक्रम दोन्ही शाळांत राबवण्यात आला. परसबाग, गांडूळ खत निर्मिती, भाजीपाला लागवड, ठिबक सिंचन, रोपवाटिका उभारणी आदी उपक्रम विद्यार्थी प्रत्यक्ष शेतात काम करून शिकले. प्रत्येक उपक्रमाची नोंद ठेवून त्याचा भविष्यात वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com