पाणलोटाच्या मदतीनं केली दुष्काळावर मात

जालना जिल्ह्यातील कायम दुष्काळी नंदापूर गावच्या शेतकऱ्यांनी शिवारात पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाच्या मदतीने विकासाची गंगा दारी आणली आहे. सिंचनस्त्रोत वाढवले. लगतच्या कडवंची गावाचा आदर्श घेऊन द्राक्ष पिकाला आपलं केलं. अन्य पिकांची विविधता वाढवली. त्यातूनया शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट होत चालल्याचे दिसते आहे.
पाणलोटाच्या मदतीनं केली दुष्काळावर मात
गावशिवारात शेततळी व सौर कृषी पंप उभारलेले दिसतात.

जालना जिल्ह्यातील कायम दुष्काळी नंदापूर गावच्या शेतकऱ्यांनी शिवारात पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाच्या मदतीने विकासाची गंगा दारी आणली आहे. सिंचनस्त्रोत वाढवले. लगतच्या कडवंची गावाचा आदर्श घेऊन द्राक्ष पिकाला आपलं केलं. अन्य पिकांची विविधता वाढवली. त्यातून या शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट होत चालल्याचे दिसते आहे. जालना शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवर डोंगराच्या कुशीत वसलेलं नंदापूर हे साडेचारशे उंबरे असलेलं गाव आहे. भौगोलिक क्षेत्र सुमारे ९४६ हेक्‍टर असून लोकसंख्या अडीच हजारापर्यंत आहे. तीव्र दुष्काळी पट्ट्यातील या शिवारात साडेतीनशे ते साडेचारशे मिमी. पाऊस पडतो. कापूस, तूर, ज्वारी, बाजरी, हरभरा, मका, सोयाबीन आदी हंगामी पिकं २०१२ पूर्वी घेतली जायची. रोजगारासाठी कायमचे स्थलांतर होणाऱ्या गावचे दरडोई उत्पन्न ३२५० रुपये होते. झाली पाणलोटाची कामे सन २०१२ मध्ये भीषण दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या गावाची पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पात निवड झाली. शिवाराचं भाग्य उजळण्याचा तोच ‘टर्निंग पॉइंट ठरला. कृषी विभागाच्या प्रकल्पातून मातीनाला बांध, कंपार्टमेंट बंडिंग, सिमेंट व साखळी बंधारे, नदी खोलीकरण आदी कामे झाली. त्यातून पाण्याची उपलब्धता वाढीस लागली. सामुहिक तसेच विविध योजनांमधून शेततळे, ठिबक सिंचन, रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड व अवजारे उपलब्धता वाढविण्यासाठी मदत करण्यात आली. कामांची फलश्रुती

 • पूर्वी शिवारात वहीत क्षेत्र ३५० हेक्‍टर, पडीक क्षेत्र ११६ हेक्‍टर, बारमाही सिंचीत क्षेत्र १५० हेक्‍टर तर दुबार सिंचीत क्षेत्र १५० हेक्‍टर होते. पाणलोट कामांनंतर वहितीखालील क्षेत्र ५२५ हेक्‍टर, पडीक ५२ हेक्‍टर, बारमाही सिंचीत ५२५ हेक्‍टर तर दुबार सिंचीत क्षेत्र ४५० हेक्‍टरवर पोचले.
 • पावसाच्या अपधावेचा वेग कमी होऊन भूगर्भातील पाणी पातळी वाढली.
 • सुमारे ३७५ हेक्‍टरवर ठिबक सिंचनाची सोय
 • 'रोहयो’ मधून २५.५० हेक्‍टरवर सीताफळ, पेरू आदी फळबाग लागवड
 • विविध योजनांमधून २८४ शेततळ्यांची उभारणी. पैकी ४० सामुहिक.
 • ६०० हेक्‍टरवर कंपार्टमेंट बंडिंग
 • २२ मातीनाला बांध
 • चार सिमेंट बंधारे, गाव शिवारात ३३५ विहिरी
 • बचत गटातून महिला झाल्या आर्थिक सक्षम व साक्षर
 • शिवारात फावडेमुक्‍त अभियान
 • तीन वर्षांपासून २० हेक्‍टर गायरान संवर्धनासाठी सामाजिक वनीकरणकडे
 • सुमारे २० शेततळ्यांत मत्स्यपालन
 • डाळिंब, टोमॅटो, मिरची, भेंडी आदी भाजीपाला पिकांना प्राधान्य
 • गलांडा, झेंडू, गुलाब, बिजलीची लागवड.
 • ३० ते ४० शेतकऱ्यांकडे सौर कृषीपंप
 • केव्हीकेचा पुढाकार खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) तीन वर्षे दत्तक घेऊन शेतकऱ्यांना तंत्रज्ञान पुरवले. द्राक्षाचे क्षेत्र वाढल्यानंतर पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. चारा पिकांच्या प्रात्यक्षिकांमुळे दुग्धव्यवसायाला चालना मिळाली. कोरोना संकटात द्राक्षाच्या थेट विक्रीतही केव्हीकेची भूमिका महत्त्वाची राहिली. द्राक्षातून उत्पन्न पूर्वी १० हेक्‍टरच्या आसपास द्राक्षक्षेत्र आज १२५ हेक्‍टरवर पोचले आहे. मजूरांना रोजगार देवून स्थलांतर थांबविण्यात या पिकाचे महत्त्व आहे. एकरी सुमारे १२ ते १५ टन उत्पादन व सरासरी ३० ते ४० रुपये प्रति किलोचा दर मिळतो आहे. एकरी सुमारे दोन ते अडीच लाख रुपये या पिकातून मिळत असल्याचे नंदापूरचे शेतकरी सांगतात. द्राक्षाच्या थेट विक्रीचाही प्रयत्न शेतकरी करताहेत. काहीजण जालना ते सिंदखेडराजा मार्गालगत स्टॉल उभारून तर काही जालना शहरात द्राक्षासह मनुके विक्री करीत आहेत. मजुरांचे गट नंदापूर गावातून शंभरपेक्षा जास्त मजूर जालना शहरात रोजगाराच्या शोधासाठी जायचे. आता तो शोध थांबला आहे. गावात मजुरांचे सुमारे २० गट तयार झाले आहेत. प्रत्येक गटात किमान १० ते १२ मजूर आहेत. प्रतिक्रिया नंदापूर प्रति कडवंची म्हणून पुढे येते आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले असून शेतीतील प्रयोगशीलताही वाढली आहे. एस. व्ही. सोनुने कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, खरपुडी दुष्काळ संधी घेऊन आला. पाणलोटानं शिवार हिरवं करण्याचं स्वप्न बऱ्यापैकी साकार झालं. द्राक्षासारख्या पिकातून अर्थकारणाला बळकटी मिळाली. दत्तात्रेय चव्हाण सरपंच संपर्क- ९४२३७११४३१ माझ्या साडेआठ एकर शेतीत साडेपाच एकर द्राक्षे तर दोन एकरांत दोन शेततळी आहेत. टॅंकरनं पाणी देऊन २०१४ मध्ये पहिल्यांदा द्राक्ष घेणारे आम्ही आता चांगले आर्थिक सक्षम झालो आहोत. रामेश्‍वर भगवानराव उबाळे शेतकरी संपर्क- ९७६५८७७९७१ मुलग्यासोबत मजुरी करायचो. आता द्राक्षबाग व सोबत शेळीपालनाची जोड देत आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झालो आहे. -तुकाराम एकनाथ कुरधने शेतकरी सात वर्षांपूर्वी बचत गट स्थापन केला. पंधरा सदस्य आहेत. गटातील सदस्यांना व गरजवंतांना मदत करतो. -भगवान कारभारी उबाळे अध्यक्ष, सम्राट स्वयंसहाय्यता शेतकरी गट तीन एकर जमिनीपैकी अर्धे क्षेत्र समृद्धी महामार्गासाठी गेले. त्यातून पैसे मिळाले. पण ते इतरत्र न गुंतविता चार एकर शेती घेतली. द्राक्षबाग उभी केली. इलेक्र्टोस्टॅटिक यंत्र घेतले. त्याचा उपयोग द्राक्ष बागायतदारांनाही होतो. त्याद्वारे रोजगारही मिळतो. -विलास टेकाळे शेतकरी नंदापूर. सात वर्षांपासून बचतीचे महत्त्व ओळखले. त्यातून आर्थिक साक्षर व सक्षम झालो. काही महिला शेळीपालन करतात. गिरणीही घेतली. -सविता मुळे गणपती महिला बचत गट

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.