दुर्गम सावंगी गावात घडले एकीतून कृषी परिवर्तन

गावातील युवकांना दिशा देण्यासोबतच त्यांच्यातील ऊर्जेचा कृषी क्षेत्रात सकारात्मक वापर करूनदुर्गम सावंगी (डाफ) (जि. अमरावती) गावशिवारात परिवर्तन घडले आहे.
दुर्गम सावंगी गावात घडले एकीतून कृषी परिवर्तन
श्रमदान मोहिमेत सहभागी सावंगी ग्रामस्थ.

गावातील युवकांना दिशा देण्यासोबतच त्यांच्यातील ऊर्जेचा कृषी क्षेत्रात सकारात्मक वापर करून दुर्गम सावंगी (डाफ) (जि. अमरावती) गावशिवारात परिवर्तन घडले आहे. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात विजय पाटील या ध्येयवेड्या युवकाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या चार गावांत प्रगतीची ही चळवळ वाहू लागली असून, अन्य गावांना देखील त्यातून बळ मिळाले आहे.   यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गम सावंगी (डाफ) हे कळंब तालुक्‍यातील शेवटचे आणि अवघ्या ३५० लोकवस्तीचे हे गाव गटग्रामपंचायत अंतर्गत समावेशीत आहे. सन २००७ मध्ये विजय पाटील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेअंतर्गत गावात आले. विदर्भातील शेती व शेतकऱ्यांची दुरवस्था या विषयाच्या अभ्यासगटात त्यांचा समावेश होता. विजय हे मूळचे तांदूळवाडी (जि. सांगली) येथील आहेत. त्यांचे आई-वडील शेतकरी तर बंधू शिक्षण क्षेत्रात आहेत. प्रत्यक्ष शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, नैराश्‍य हे त्यांनी सारे जवळून अनुभवले होते. गावातील स्थिती पाहिल्यावर आपण इथेच काम करायचे असे त्यांनी ठरविले. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील समाजकार्य विषयातील पदव्युत्तर शिक्षण संपवून त्यांनी सावंगी (डाफ) गावात काम सुरू केले. शेतकऱ्यांमध्ये रुजविली प्रयोगशीलता ग्रामस्थांना शेतीतील बदलांसाठी प्रोत्साहित करण्यास पाटील यांनी सुरुवात केली. त्यासाठी पुणे, राळेगणसिद्धी, ओतूर, काळदरी, वारणानगर, वर्धा, नागपूर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, चित्रकूट, चेन्नई या ठिकाणी अभ्यास दौरे काढण्यात आले. भोपाळ येथील भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत अभियांत्रिकी संशोधन संस्थेचाही त्यात समावेश होता. दौऱ्यात शेतीत प्रत्यक्ष राबणाऱ्या महिलांना अधिक संख्येने सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होण्यास मदत झाली. सावंगी शिवारात झाले परिवर्तन अभ्यास दौऱ्यातून माहिती मिळाली असली तरी पुढे काय करायचे याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. मजुरांची टंचाई, भांडवलाअभावी दुय्यम दर्जाच्या निविष्ठांची खरेदी, विस्कळीत नियोजन या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. यावर मात करण्यासाठी सामूहिक शेतीचा प्रस्ताव मांडला गेला. गावकऱ्यांनी २००८ मध्ये त्यास सुरुवात केली. त्यासाठी वार्षिक पाच हजार रुपये संकलित करण्याचे ठरले. आर्थिक विवंचना सोसणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना इतकी रक्‍कम उभारणे देखील अशक्‍यप्राय होते. परंतु नवे काही करण्याचा विचार घेऊन पुढे जाणाऱ्या ग्रामस्थांनी पोटाला चिमटा देत हे काम यशस्वी केले. खर्च आणि नफा देखील समान विभागून घ्यायचा असे ठरले. पहिल्या वर्षी ७५ एकरांवर सामूहिक शेतीची अंमलबजावणी झाली. काही क्षेत्रावर कपाशी, तूर, सोयाबीन तर चार एकरांत भेंडी, गवार, चवळी, दोन एकर मिरची असे नियोजन झाले. प्रकल्प आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरला. वैयकतिक स्तरावर शेती पहिल्या अनुभवातून बरेच शिकलेल्या शेतकऱ्यांनी वैयक्‍तिक स्तरावर करार शेती करण्याचा निर्णय घेतला. भुईमूग शेती करून गोपुरी येथील तेलघाणीस विक्री करण्यात आली. बाजारात प्रति क्विंटल २२०० ते २३०० रुपये असा दर असताना तेलघाणीकडून ३९०० ते ४००० रुपये दर मिळाला. यामागे शेंगाचा दर्जा हा महत्त्वाचा घटक होता असे ग्रामस्थ सांगतात. या अनुभवातून शेतकरी गटाची स्थापना झाली. सामूहिक निविष्ठा खरेदी हंगामात खरेदी करून शेतीमाल विक्रीनंतर कृषी सेवा केंद्राला रोख पैसे द्यावे लागतात असे सावंगीचे बाबाराव दोड सांगतात. अडीच एकर शेती असलेल्या बाबारावांच्या हाती हंगामाअखेरीस काहीच लागत नव्हते. त्यावर उपाय म्हणून सामूहिक निविष्ठा खरेदीचा विचार पुढे आला. तशी यादी तयार करण्यात आली. जिल्ह्याच्या ठिकाणावरून खरेदी केली. यातून वेळ, पैसा यांची बचत झाली. कृषी सुविधा केंद्र सामूहिक खरेदी अनुभवातून शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यातून गावस्तरावरच ‘कास्तकार शेतकरी सुविधा केंद्र’ शेतकऱ्यांनीच स्थापन केले. रास्त दरात गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता होऊ लागली. अनावश्‍यक निविष्ठा माथी मारणाऱ्या कृषी सेवा केंद्रांना यामुळे चाप लागला आणि पैसेही वाचले. आता बाबाराव दोड यांना १२ एकरांवर करारावर शेती करता आली. त्यांच्या कुटुंबात समृद्धी नांदू लागली आहे. ट्रकभर खतासाठी विकले सौभाग्याचे लेणे खत उद्योगातील एका सहकारी कंपनीला खतांचा थेट पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्या वेळी पैशांचा भरणा करण्यास सांगण्यात आले. परंतु इतकी रक्‍कम उभी करणे शक्‍य नव्हते. ही अडचण लक्षात घेता महिलांनी आपले दागिने, मंगळसूत्र गहाण किंवा विकण्यासाठी दिले. त्यानंतर सावंगीत खताचा पहिला ट्रक पोचला. कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्याचे आश्‍चर्य वाटले. त्यांनी या शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि सहकार्य देण्याची भूमिका आजवर घेतली आहे. पुढे भांडवल वाढत गेले आणि आता बांधावर खत हाच ‘पॅटर्न’ गावात अव्याहतपणे राबविला जात असल्याचे कल्पना दोड सांगतात. श्रमदानातून कामे गावापासून शिवारापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे निविष्ठा, शेतीमाल घरापर्यंत आणणे जिकिरीचे ठरत होते. प्रशासनाकडून हे काम करण्यास वेळकाढूपणा होत होता. ग्रामस्थांनीच श्रमदानातून हे काम करण्याचा निर्णय घेतला. एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे त्यातून खडीकरण झाले. मंदिराची उभारणी लोकवर्गणीतून झाली. त्यासाठी प्रत्येकाकडून एक क्‍विंटल कापसाच्या विक्रीतून आलेल्या पैशांचा उपयोग करण्यात आला. परिवर्तनाचा विचार पेरणाऱ्या या दुर्गम गावात मीना सुधाकर वानखेडे यांच्या सासऱ्यांचे निधन झाले. त्यांच्या तेराव्या दिवसाला या कुटुंबासहित गावाने जलसंधारणाचे श्रमदान करीत नवा विचार पेरला. अवजार बँक, कुक्कुटपालन गावात शेतकरी गटाच्या माध्यमातून अवजार बँक सुरू झाली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले सातबारा गहाण ठेवून १० लाखांची कर्ज उभारणी केली आहे. ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, ट्रॅक्टरचलित अवजारे बँकेत आहेत. त्यातून आता कमी वेळेत शेतीची कामे होत आहेत. जोड व्यवसाय म्हणून महिला आणि तरुणांनी सामूहिक प्रयत्नांतून कुक्कुटपालन सुरू केले आहे. कडकनाथ आणि गावरान पक्षी उत्पादनाची बॅच त्यातून तयार झाली आहे. दिवाळीचा आनंद सर्वांच्या घरात काही कुटुंबांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्यांना दिवाळीच्या काळात किराणा साहित्य खरेदी करता येत नव्हते. ग्रामस्थांनी सामूहिक पर्याय शोधला. आता पाच वर्षांपासून किराणा एकत्रित खरेदी होतो. त्यासाठी पैसे उभे केले जातात. त्यामुळे दिवाळीचा उत्सव खऱ्या अर्थाने या गावासाठी प्रकाशपर्व ठरल्याचे संगीता मोहन शिवरकर सांगतात. सुविधा केंद्रांची साखळी सावंगीच्या शेतकरी सुविधा केंद्रातून आजूबाजूच्या गावातील शेतकरीही निविष्ठा खरेदी करू लागले. पण गावाला रस्त्याची अडचण असल्याने सावरगाव येथे दुसरे सुविधा केंद्र उभारण्यात आले. कामाची गरज वाढत गेली. मेटीखेडा व अकोला बाजार येथील शेतकरी समूहानेही त्यासाठी पुढाकार घेतला. आता दोन्ही गावांत अशी केंद्रे उभारली आहेत. त्याद्वारे बांधावर खतांचा पुरवठा केला जातो. निविष्ठा वापरासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक केंद्राच्या परिसरातील २५ ते ३० गावांचे शेतकरी या प्रक्रियेमध्ये सामील होतात. केंद्रातर्फे पीक परिसंवाद, माती परीक्षण, अभ्यास दौरे, शेतकरी प्रशिक्षण शिबिरे, शिवार फेऱ्या आदी उपक्रम राबवण्यात येतात. त्यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतात. त्यातून त्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होत आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन शेतकरी सुविधा केंद्रांची जबाबदारी त्या त्या गावातील तरुण सांभाळत आहेत. अनिल बाबाराव वानखेडे, सतीश वाघदरे, कुलदीप शेळके, नागेश चहारे, शुभम बेंडे, सुनील वानखेडे या तरुण मंडळीनी या कामातच स्वतःला झोकून दिले आहे. राधेश्‍याम जयस्वाल, नरेंद्र जयस्वाल, नागोराव नंदुरकर, संजय देवतळे, अनिल आडे, सुरेश घोडाम, अरुण प्रधान, किशोर चिंचोळकर ही ज्येष्ठ मंडळी कामांतील सहभागासोबत मार्गदर्शकाची भूमिकाही पार पाडत आहेत. तरुणी ठरल्या दिशादर्शक गावातील विकास कामांमध्ये तीन तरुणींचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. पहूर नस्करी येथील संगीता व भारती वासाडे या दोघी बहिणी तसेच खानगाव येथील अर्चना दवारे असे या रणरागिणींचे नाव आहे. संगीता व अर्चना दोघींनी समाजसेवा विषयात पदवी तर भारतीने वनस्पतिशास्त्र विषयात एमएससी केले आहे. सन २००९ पासून या तिघी अभियानासोबत जोडल्या आहेत. युरियाची जादा दराने विक्री आणि त्याविरोधात चळवळ त्यांनी उभी केली. त्यासाठी पत्रके वाटप करणे व अन्य आघाड्यांवर मोहीम उघडण्यात आली. स्वतः करार शेती करून त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांची लूट कोठे होते हे लक्षात आले. मग कृषी सुविधा केंद्राव्दारे शेतकऱ्यांना कंपनीने निश्‍चीत केलेल्या दरात निविष्ठा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. या तरुणींना कुटुंबीयांचेही मानसिक बळ मिळाले. सन २०११ ते २०१३ या वर्षात सावंगी येथे दहा एकर शेती करारावर झाली. त्यावेळी भुईमूग पीक संरक्षणासाठी देखरेख तसेच वीजभार नियमनात रात्री पाणी देण्याचे काम त्यांनी केले. थरारक अनुभव अशा अनुभवांतून शेतकरी भोगत असलेल्या यातना अनुभवता आल्या. त्यामध्ये काही थरारक अनुभवही आज गाठीशी आहेत. रात्री सिंचन करताना पाणी शेतात साठत होते. अशावेळी नाल्याच्या काठावर जाऊन रात्रीच्या वेळी एकीने कृषिपंप बंद केला. त्या वेळी रस्त्याने अनेकदा जंगली डुकरे नजरेस पडली. परंतु न घाबरता हिमतीने हे काम केले अशी आठवण सांगताना अर्चना दवारे यांनी घडलेल्या रोमांचक अनुभवाचा थरार वर्णन केला. अर्चनाचे आईवडील मजुरी करतात. भारती, संगीता यांचे भाऊ देखील शेती करतात. सामान्य कुटुंबातील या तरुणींनी विजय पाटील यांच्यासोबत या अभियानात झोकून देत कार्य चालविले आहे. भुईमुगाची थेट विक्री शेतकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून सामूहिक शेती व गट शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. या अभियानातील दुसरे गाव म्हणजे मेटिखेडा. सन २०२०-२१ मध्ये पावसामुळे सोयाबीन पीक उद्‍ध्वस्त झाले. परिणामी, तुरीत भुईमूग लागवडीचा प्रयोग शेतकऱ्यांनी केला. पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. किलोला ६० रुपये दराने ओल्या शेंगांची विक्री करण्यात आली. थेट ग्राहक विक्री करण्यात आली. ग्राहकांचाही प्रतिसाद मिळाला. तब्बल एक लाख रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले. सद्यःस्थितीत बियाण्यासाठी २२ पोती भुईमूग शिल्लक ठेवण्यात आला आहे. तुरीचेही चांगले उत्पादन होण्याची शक्‍यता असून ते बोनस ठरणार आहे. अशी माहिती समूहातील संजय देवतळे, दुर्गेश जयस्वाल, राहुल चौधरी, प्रफुल खडसे, महेश कचरे यांनी दिली. मुलगा झाला प्रयोगशील दुर्गम गाव असल्याने रस्त्यांची वानवा आहे. परंतु इच्छा तिथे मार्ग असतो असे म्हणतात. गावात नजीकच्या काळात भाजीपाला क्षेत्र वाढते आहे. सौरभ राजेंद्र बेंडे या युवकाने मिरची लागवड केली आणि अवघ्या काही गुंठे क्षेत्रातून चांगले पैसे झाले. मुलाचीही प्रयोगशीलता पाहून भारावलेल्या त्याच्या आई कल्पना यांचा आनंद गगनात मावत नव्हता. माझा मुलगा व्यसनाधीन न होता चांगल्या कामाकडे वळला याचा आनंद होतोय असे सांगताना त्या माउलीचे डोळे अक्षरशः पाणावले होते. अशाच उत्स्फूर्त प्रतिक्रिया गावातील आशा श्रीराम बेंडे, योगिता दिलीप बेंडे, स्वाती प्रवीण वानखेडे यांनीही नोंदविल्या. विस्तारतेय मोहीम मेटिखेडा, सावंगी, सावरगाव, अकोला बाजार तसेच आजूबाजूच्या २०-२५ गावपरिसरांत ही मोहीम राबविली जात आहे. यातून पाच हजारांच्या आसपास शेतकरी त्यास जोडले गेले आहेत. पुढील काळात कापसाचे मूल्यवर्धन करण्याची साखळी उभी करण्याचा मानस विजय पाटील यांनी व्यक्‍त केला. पाणी बचतीसाठी ठिबकवर लागवड, नगदी व व्यावसायिक शेतीमालाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले जाणार आहे. आत्महत्यग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात विजय पाटील यांनी पेरलेला परिवर्तनवादी विचार नक्‍कीच नवा आशावाद घेऊन आला आहे. संपर्क- विजय पाटील, ९९२३१८२३५३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com