
कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या पिंपळगाव वाघा (ता. जि. नगर) गावाने लोकसहभागातून पावणे दोन कोटीची कामे करून शिवारात समृद्धी आली आहे. टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत असलेल्या गावांत यंदा विहीरी पाण्याने डबडबल्या. बंधारे ओसंडून वाहू लागले. पीक पद्धतीत बदल झाला असून दुग्ध व्यवसायालाही चालना मिळाली आहे. पिंपळगाव वाघा (ता. जि. नगर) हे बाराशे लोकसंख्येचे गाव. शाश्वत पाण्याची उपलब्धता नसल्याने या गावासह परिसराला कायम दुष्काळाशी सामना करावा लागत होता. आदर्श गाव हिवरेबाजारला जोडून हे गाव आहे. साहजिकच येथे झालेल्या विकासकामांची प्रेरणा गावातील युवकांनी घेतली. सन २०१८ मध्ये ग्रामस्थ एकत्र आले. तत्कालीन सरपंच अजय वाबळे, उपसरपंच ललिता नाट, नूतन उरमुडे, नामदेव शिंदे, पारुबाई नाट या सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते दत्ता उरमडे यांनी पुढाकार घेतला. पाणी फाऊंडेशनमध्ये गावाने सहभाग घेतला. त्यासाठी जनजागृती, बैठका घेतल्या. कामांना झाली सुरवात आदर्श गाव योजनेचे पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनातून कामांना सुरवात झाली. श्रमदान, लोकसहभाग, विविध संस्थाची मदत आणि सरकारी योजनांतून नदीवरील वीस वर्षांपूर्वीच्या तीन बंधाऱ्यातील गाळ काढला. पावणे पाच किलोमीटर नदीचे रूंदी- खोलीकरण केले. सीसीटी, गॅबियन बंधारे, दगडी बंधारे, मातीनाला बांध, कंपांडबंडिंग, शेततळी आदी कामे केली. सेवानिवृत्त सैनिक भीमराज वाबळे, बाबासाहेब शिंदे, नामदेव नाट यांची समिती स्थापन करून त्यांना जबाबदारी देण्यात आली. परिसरातील लोकांनी श्रमदानात सहभागी व्हावे यासाठी वर्षातून दोनदा महाश्रमदानही घेतले. गावची २०१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड झाली. त्यातूनही कामे करण्याला मदत झाली. पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना, स्नेहालय, एज्युकेशन फाउंडेशन, मावळा संघटना यांची मदत झाली. पीक पद्धतीत बदल गावाचे ७१४ हेक्टर लागवड क्षेत्र आहे. पूर्वी केवळ १५ हेक्टरपर्यंत कांदा पीक होते. यंदा खरिपात २२५ तर रब्बीत ८० हेक्टरवर कांदा लागवड झाली. पूर्वी पंधरा हेक्टरपर्यंत असलेले चारा पिकांचे क्षेत्र १०० हेक्टरपुढे गेले आहे. रब्बीत ३६० हेक्टर ज्वारी, ४० हेक्टर गहू, ७० हेक्टर हरभरा, २५ हेक्टरवर भाजीपाला लागवड झाली आहे. पूर्वी सुमारे एक हजार लिटर होणारे दूधसंकलन पाच हजार लिटरच्या जवळपास गेले आहे. फळपिके, मका, गहू यांचेही क्षेत्र वाढू लागले आहे. गावाकडून घ्यावयाचे आदर्श
कोरोना संकटातील कामे कोरोना लॉकडाऊन काळात सर्वानुमते जाण्या-येण्याची वेळ निश्चित केली. सुमारे ५०० लोकांच्या ॲटीजेन चाचण्या घेतल्या. अर्थ आयोगाच्या निधीतून मास्क, सॅनिटायझर्सचे वाटप केले. योग्य काळजी घेतल्याने आत्तापर्यंत गावांत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. उल्लेखनीय कामे
प्रतिक्रिया विविध उपक्रमांद्वारे पिंपळगाव वाघा आदर्श गावांकडे वाटचाल करत आहे. सार्वजनिक बळातूनच गाव पाणीदार झाले आहे. -अजय वाबळे, माजी सरपंच, पिंपळगाव वाघा दुष्काळमुक्तीकडे गावाने वाटचाल सुरु केली आहे. ई ग्रामपंचायत करण्याला प्राधान्य दिले आहे. दत्ता उरमुडे, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळगाव वाघा संपर्क- ९८९०११८५३२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.